창세기 5장 마라티 IRV
- 1 आदामाच्या वंशावळीची नोंद अशी आहे. देवाने मनुष्य निर्माण केला त्या दिवशी त्याने आपल्या प्रतिरूपाचा म्हणजे आपल्यासारखा तो केला.
- 2 त्यांना नर व नारी असे उत्पन्न केले. त्यांना आशीर्वाद दिला व त्यांना निर्माण केले त्या वेळी त्यांना आदाम हे नाव दिले.
- 3 आदाम एकशे तीस वर्षांचा झाल्यावर त्यास त्याच्या प्रतिरूपाचा म्हणजे त्याच्या सारखा दिसणारा मुलगा झाला. त्याने त्याचे नाव शेथ ठेवले;
- 4 शेथ जन्मल्यानंतर आदाम आठशे वर्षे जगला आणि या काळात त्यास आणखी मुले व मुली झाल्या.
- 5 अशा रीतीने आदाम एकंदर नऊशें तीस वर्षे जगला; नंतर तो मरण पावला.
- 6 शेथ एकशे पाच वर्षांचा झाल्यावर त्यास अनोश झाला
- 7 अनोश झाल्यानंतर शेथ आठशेसात वर्षे जगला, त्या काळात त्यास आणखी मुले व मुली झाल्या;
- 8 शेथ एकंदर नऊशेंबारा वर्षे जगला, मग तो मरण पावला.
- 9 अनोश नव्वद वर्षांचा झाल्यावर त्यास केनान झाला;
- 10 केनान झाल्यानंतर अनोश आठशेपंधरा वर्षे जगला; त्या काळात त्यास आणखी मुले व मुली झाल्या;
- 11 अनोश एकंदर नऊशेंपाच वर्षे जगला; त्यानंतर तो मरण पावला.
- 12 केनान सत्तर वर्षांचा झाल्यावर तो महललेलाचा पिता झाला;
- 13 महललेल झाल्यावर केनान आठशेचाळीस वर्षे जगला; त्या काळात त्यास आणखी मुले व मुली झाल्या;
- 14 केनान एकंदर नऊशेंदहा वर्षे जगला, नंतर तो मरण पावला.
- 15 महललेल पासष्ट वर्षांचा झाल्यावर तो यारेदाचा पिता झाला;
- 16 यारेद जन्मल्यानंतर महललेल आठशेतीस वर्षे जगला; त्या काळात त्यास आणखी मुले व मुली झाल्या;
- 17 महललेल एकंदर आठशे पंचाण्णव वर्षे जगला; त्यानंतर तो मरण पावला.
- 18 यारेद एकशे बासष्ट वर्षांचा झाल्यावर तो हनोखाचा पिता झाला;
- 19 हनोख झाल्यावर यारेद आठशे वर्षे जगला; त्या काळात त्यास आणखी मुले व मुली झाल्या;
- 20 यारेद एकंदर नऊशें बासष्ट वर्षे जगला; त्यानंतर तो मरण पावला.
- 21 हनोख पासष्ट वर्षांचा झाल्यावर त्यास मथुशलह झाला;
- 22 मथुशलह जन्मल्यावर हनोख तीनशे वर्षे देवाबरोबर चालला. त्या काळात त्यास आणखी मुले व मुली झाल्या;
- 23 हनोख एकंदर तीनशे पासष्ट वर्षे जगला;
- 24 हनोख देवाबरोबर चालला, आणि त्यानंतर तो दिसला नाही, कारण देवाने त्यास नेले.
- 25 मथुशलह एकशेसत्याऐंशी वर्षांचा झाल्यावर लामेखाचा पिता झाला.
- 26 लामेखाच्या जन्मानंतर मथुशलह सातशे ब्याऐंशी वर्षे जगला. त्या काळात त्यास आणखी मुले व मुली झाल्या.
- 27 मथुशलह एकंदर नऊशें ऐकोणसत्तर वर्षे जगला. त्यानंतर तो मरण पावला.
- 28 लामेख एकशेब्यांऐशी वर्षांचा झाल्यावर तो एका मुलाचा पिता झाला.
- 29 लामेखाने त्याचे नाव नोहा ठेवून म्हटले, परमेश्वराने भूमी शापित केली आहे तिच्यापासून येणाऱ्या कामात आणि आमच्या हातांच्या श्रमात हाच आम्हांला विसावा देईल.
- 30 नोहा झाल्यावर लामेख पाचशे पंचाण्णव वर्षे जगला; त्या काळात त्यास आणखी मुले व मुली झाल्या.
- 31 लामेख एकंदर सातशे सत्याहत्तर वर्षे जगला. नंतर तो मरण पावला.
- 32 नोहा पाचशे वर्षांचा झाल्यावर त्यास शेम, हाम व याफेथ नावाचे पुत्र झाले.