열왕기하 3장 마라티 IRV
- 1 यहूदाचा राजा यहोशाफाट याच्या कारकिर्दीच्या अठराव्या वर्षी, अहाबाचा मुलगा योराम शोमरोनात इस्राएलावर राज्य करू लागला; त्याने बारा वर्षे राज्य केले.
- 2 यहोरामाने परमेश्वराच्या दृष्टीने दुष्ट अशी कृत्ये केली, पण आपल्या आई-वडिलांसारखे त्याने केले नाही; त्याने त्याच्या वडिलांनी बआलमूर्तीच्या पूजेसाठी केलेला स्तंभ काढून टाकला.
- 3 असे असले तरी नबाटचा मुलगा यराबाम ज्याने इस्राएलास पाप करायला लावले, त्याच्या पापास तो चिकटून राहिला. ती त्याने सोडली नाहीत.
- 4 आता मवाबाचा राजा मेशा कळपांचा धनी होता. तो इस्राएलाच्या राजाला एक लक्ष मेंढया आणि एक लक्ष एडके लोकरींसूद्धा देत असे.
- 5 पण अहाबाच्या मूत्यूनंतर, मवाबाच्या राजाने इस्राएलाच्या राजाविरूद्ध बंड केले.
- 6 त्या वेळेस राजा योराम शोमरोन मधून बाहेर पडला आणि त्याने सर्व इस्राएल लोकांस एकत्र केले.
- 7 यहूदाचा राजा यहोशाफाट याच्याकडे त्याने असा निरोप पाठवला की, “मवाबाच्या राजाने माझ्याविरुध्द बंड केले आहे. तू माझ्याबरोबर मवाबाविरूद्ध लढाईला येशील काय?” यहोशाफाटाने सांगितले, “होय, मी जरुर येईन, जसा तू तसा मी, जसे तुझे लोक तसे माझे लोक, जसे तुझे घोडे तसे माझे घोडे.”
- 8 नंतर तो बोलला “कोणत्या वाटेने हल्ला करायला जायचे?” यावर, “अदोमच्या वाळवंटाच्या दिशेने” असे यहोशाफाट ने सांगितले.
- 9 मग इस्राएलचा राजा, यहूदा आणि अदोमाच्या राजाबरोबर चालत सात दिवसाच्या वाटेचा फेरा केल्यावर, तिथे त्यांच्या सैन्याला, घोड्यांना, तसेच त्यांच्याबरोबरची जनावरे याकरिता पाणी सापडले नाही.
- 10 तेव्हा इस्राएलाचा राजा यहोराम म्हणाला, “हे काय आहे? मवाबांच्या हातून पराभव पत्करावा म्हणून परमेश्वराने आम्हा तीन राजांना एकत्र आणले काय?”
- 11 परंतू यहोशाफाट म्हणाला, “ज्याच्याकडून आपण परमेश्वराचा सल्ला घ्यावा असा येथे परमेश्वराचा एखादा संदेष्टा नाही काय?” तेव्हा इस्राएलाच्या राजाच्या एका सेवकाने उत्तर दिले, “शाफाटाचा मुलगा अलीशा इथेच आहे, जो एलीयाच्या हातावर पाणी घालत असे.”
- 12 यहोशाफाट म्हणाला, “परमेश्वराचे वचन त्याच्या सोबत आहे.” तेव्हा इस्राएलाचा राजा व यहोशाफाट आणि अदोमचा राजा खाली त्याच्याकडे गेले.
- 13 अलीशा इस्राएलाच्या राजाला म्हणाला, “तुझे माझे काय आहे? तू आपल्या वडिलांच्या किंवा आईच्या संदेष्ट्यांकडे जा.” तेव्हा इस्राएलाच्या राजा अलीशाला म्हणाला, “नाही, कारण परमेश्वराने आम्हा तीन राजांना एकत्र आणले, ह्यासाठी की मवाबाकडून आम्ही पराभूत व्हावे.”
- 14 अलीशा म्हणाला, “ज्या परमेश्वराच्या सान्निध्यात मी उभा राहतो, तो सैन्याचा परमेश्वर जिवंत आहे. जर यहूदाचा राजा यहोशाफाट ह्याच्या उपस्थितीचा मी आदर केला नसता, तर खरोखर मी तुझी दखल घेतली नसती व तुझ्याकडे पाहिलेही नसते.
- 15 तेव्हा आता एखादा वीणावादक माझ्याकडे आणा.” आणि असे झाले की वीणावादक वाजवत असता, परमेश्वराचा हात अलीशावर आला.
- 16 मग अलीशा म्हणाला, “परमेश्वर असे म्हणतो: या कोरड्या नदीच्या खोऱ्यात जागोजागी खणून ठेवा.
- 17 कारण परमेश्वर असे म्हणतो, तुम्हास वारा, पाऊस काही दिसणार नाही पण तरीही हे खोरे पाण्याने भरुन जाईल, आणि तुम्ही प्याल, तुम्ही व तुमच्या जनावरांनाही पाणी मिळेल.
- 18 कारण हे तर परमेश्वराच्या दृष्टीने सोपे आहे. तो तुम्हास मवाबांवरही विजय मिळवून देईल.
- 19 प्रत्येक तटबंदीच्या व चांगल्या बंदोबस्त असलेल्या अशा निवडक नगरांवर तुम्ही हल्ला कराल. प्रत्येक चांगला वृक्ष तुम्ही तोडून टाकाल, पाण्याचे झरे, विहिरी बुजवून टाकाल. दगडफेक करून चांगल्या शेतांची नासाडी कराल.”
- 20 मग सकाळी, अर्पणाच्या वेळी, अदोमाच्या बाजूने पाण्याचा लोंढा आला आणि देश पाण्याने भरला.
- 21 राजे आपल्यावर हल्ला करायला आले आहेत हे मवाबाच्या लोकांनी ऐकले तेव्हा, त्यांनी आपल्याकडच्या युध्दात उतरता येण्याजोग्या सर्व पुरुषांना एकत्र केले. युध्दासाठी सज्ज होऊन ते सीमेवर जाऊन थांबले.
- 22 ते लोक त्या दिवशी भल्या पहाटे उठले तेव्हा उगवत्या सूर्याची लाली पाण्यात प्रतिबिंबित होती. मवाबी लोकांस त्यांच्या विरूद्ध दिशेला असलेले पाणी दिसले असता, ते त्यांना रक्तासारखे लाल दिसले.
- 23 ते म्हणाले, “हे रक्त आहे! या राजांची नक्कीच आपापसात लढाई झालेली दिसते, त्यांनी परस्परांना मारले! तर आता मवाब्यांनो त्यांना लुटायला चला.”
- 24 मवाबी लोक इस्राएलांच्या छावणीपाशी आले असता, इस्राएल लोकांनी बाहेर येऊन मवाबी सैन्यावर हल्ला केला. तेव्हा मवाबी लोक पळत सुटले व इस्राएल लोक त्यांच्या प्रदेशातही त्यांना मारत गेले.
- 25 इस्राएल लोकांनी त्यांची नगरे उध्वस्त केली, त्यांच्या प्रत्येक शेतांत दगडांचा मारा करून ते बुजवले. त्यांनी पाण्याच्या सर्व विहिरी बुजवल्या व सर्व चांगली झाडे तोडून टाकली केली. फक्त कीर-हरेसमधे त्यांनी त्यांचे दगड राहू दिले. पण गोफण चालवणाऱ्या सैन्यांनी त्या नगरावर हल्ला केला.
- 26 या लढाईला तोंड देणे आपल्याला जड जात आहे हे मवाबाचा राजा मेशाने जाणले. तेव्हा त्याने तलवारधारी सातशे निवडक माणसे बरोबर घेतली आणि वेढा फोडून अदोमाच्या राजाला तो मारायला निघाला पण त्यास ते जमले नाही.
- 27 मग मवाबाच्या राजाने आपल्या थोरल्या मुलाला बरोबर घेतले, जो त्यानंतर त्याच्या गादीवर बसणार होता. नगराच्या तटबंदीच्या भिंतीवर या राजाने आपल्या मोठ्या मुलाचा यज्ञात बली दिला. तेव्हा इस्राएलवर मोठा कोप झाला. मग ते मवाबाचा राजा मेशा याला सोडून आपल्या देशात परत आले.