욥기 21장 마라티 IRV
- 1 नंतर ईयोबाने उत्तर दिले.
- 2 “मी काय म्हणतो ते निट ऐक म्हणजे माझे सांत्वन होईल.
- 3 मी बोलेन तेव्हा तू थोडा धीर धर, माझे बोलणे संपल्यावर तू माझी थट्टा करु शकतोस.
- 4 माझी लोकांविरुध्द तक्रार काय आहे? मी अधीर का होऊ नये?
- 5 माझ्याकडे बघ व आश्चर्यचकित हो, व तुझे हात तू आपल्या तोंडावर ठेव.
- 6 माझ्यावर आलेल्या त्रांसाचा विचार करायला लागलो म्हणजे मला भीती वाटते आणि माझ्या शरीराचा थरकाप होतो.
- 7 दुष्ट मनुष्यांना जास्त आयुष्य का असते? ते वृध्द आणि यशस्वी का होतात?
- 8 आणि त्याचे वंशज त्याच्या डोळ्यासमोर स्थापीत होतात, आणि त्याच्या डोळ्यासमोर त्याची मुलेबाळे नांदतात.
- 9 त्यांची घरे भितीपासून सुरक्षित असतात, देवाची काठी त्याच्यांवर पडत नाही.
- 10 त्यांच्या बैलाचे प्रजोत्पादन असफल होत नाही. त्यांच्या गायींना वासरे होतात आणि त्यांची वासरे अकाली मृत्युमुखी पडत नाहीत.
- 11 ते आपल्या मुलांना वासराप्रमाणे बाहेर खेळायला पाठवतात. त्यांची मुले सभोवती नाचत असतात.
- 12 ते डफ आणि वीणेच्या आवाजावर गातात आणि ते पावांचा नाद ऐकुण आनंदी होतात.
- 13 ते त्यांचे दिवस भरभराटीत घालवतात, नंतर ते शांतपणे खाली अधोलोकात जातात.
- 14 ते देवाला म्हणाले, आम्हास एकटे सोड आम्हास तुझ्या ज्ञानाच्या मार्गाची इच्छा नाही.
- 15 सर्वशक्तिमान कोण आहे, की त्याची उपासना आम्ही करावी? त्याची प्रार्थना करून आम्हास काय लाभ?
- 16 पाहा, त्याची भरभराट त्याच्या स्वतःच्या हाती नाही? दुष्ट मनुष्याचा सल्ला माझ्यापासुन दूर असो.
- 17 वांरवार दुष्टाचा दिप विझवला जातो, त्याची विपत्ती त्यांच्यावर येते? आणि असे कीतीतरी वेळ घडते की, देव त्याच्या क्रोधाने त्यांची पीडा त्यांना वाटून देतो.
- 18 ते कितीदा वाऱ्यापुढे धसकटासारखे होतात, किंवा ते वादळाने उडालेल्या भूशासारखे होतात.
- 19 पण तू म्हणतोस देव वडिलांच्या पापाबद्दल मुलाला शिक्षा करतो. तर त्याने त्यालाच प्रतिफळ द्यावे म्हणजेच त्यास त्याचा दोष कळेल.
- 20 त्याच्या डोळ्यांनीच तो आपला नाश पाहो, तो सर्वशक्तिमान देवाच्या रागाचे प्राशन करो.
- 21 जेव्हा त्याच्या आयुष्याची मद्दत कमी करण्यास येईल, तेव्हा त्याच्या मरणानंतर तो त्याच्या परीवाराची काळजी कशी करील?
- 22 देवाला कोणी ज्ञान शिकवू शकते का? तो तर उच्च पदावर असलेल्या लोकांचाही न्यायनिवाडा करतो.
- 23 एखादा मनुष्य त्याच्या पूर्ण शक्तीतच मरतो, पुर्णपणे शांतीत आणि सहजतेने.
- 24 त्याची भांडी दुधाने आणि त्याची हाडे मज्जारसाने ओलसर आहेत.
- 25 दुसरा मनुष्य मनाच्या कटूपणात मरतो, त्याने कधीच चांगले अनुभवलेले नसते.
- 26 शेवटी हे दोघेही बरोबरच मातीत जातील. किडे त्यांना झाकून टाकतील.
- 27 पाहा, मला तुमचे विचार माहीती आहेत, कोणत्या चुकांनी मला दु:ख द्यायची तुझी इच्छा आहे हे मला माहीत आहे.
- 28 तू कदाचित् म्हणशील ‘आता राजाचे घर कोठे आहे? दुष्ट ज्या तंबूत राहतो तो कोठे आहे.
- 29 तू कधीच प्रवास करणाऱ्या लोकांस विचारले नाहीस काय? ते काय चिन्ह देतील हे तुला ठावूक नाही काय,
- 30 दुष्ट मनुष्य नाशाच्या दिवसासाठी ठेवलेला आहे, आणि त्यास क्रोधाच्या दिवशी बाहेर आणतील.
- 31 त्याच्या तोंडावर त्याचा मार्ग कोण प्रकट करील? त्याने जे केले त्याची परत फेड कोण करील?
- 32 नंतर त्यास कबरेकडे नेतील, त्याच्या थडग्यावर पहारा ठेवतील.
- 33 खोऱ्यातील ढेकळे त्यास गोड लागतील, सर्व लोक त्याच्या पाठीमागे जातील जसे असंख्य लोक होऊन गेले तसे ते सर्व त्याच्या मागे जातील
- 34 मग तुमच्या मुर्खपणाने तुम्ही माझे सांत्वन कसे करु शकता, म्हणून तुमची उत्तरे काहीच नाही ती मुर्खपणाची आहेत.”