욥기 35장 마라티 IRV
- 1 अलीहूने आपले बोलणे चालू ठेवले. तो म्हणाला,
- 2 “तू निष्पाप आहे असा तू विचार करतोस काय? मी देवापेक्षा अधीक नितीमान आहे असा तू विचार करतोस काय?
- 3 तू देवाला विचारतोस ‘जर मी नितीमान असण्याचा मला काय लाभ मिळेल? मी जर पाप केले नाहीतर त्यामुळे माझे काय चांगले होणार आहे?’
- 4 मी तुला उत्तर देतो, तू आणि तुझे मित्र यांना देखील.
- 5 वरती आकाशाकडे बघ, तुझ्यापेक्षा उंच असणाऱ्या ढगांकडे बघ.
- 6 जर तू पाप केलेस तर त्यामुळे देवाला कसली इजा होत नाही? तुझ्याकडे पापांच्या राशी असल्या तरी त्यामुळे देवाला काही होत नाही?
- 7 आणि तू खूप नितीमान असलास तरी तू देवाला काही देऊ शकत नाहीस? तुझ्याहातून त्यास काहीच मिळत नाही?
- 8 तुझे दुष्टपण कदाचित मनुष्यास ईजा पोहचवेल, जसा तू मनुष्य आहेस, आणि तुझे नितीमत्वाचा कदाचीत एखाद्या मनुष्याच्या पुत्राला लाभ होईल.
- 9 पुष्कळशा वाईट कृत्यामुळे लोकांस दु:ख झाले तर ते ओरडतील. ते सामर्थ्यवान लोकांकडे जातात आणि मदतीची याचना करतात.
- 10 परंतु कोणीही असे म्हणणार नाहीत, मला निर्माण करणारा देव कुठे आहे? जो रात्रीला गीत देतो,
- 11 ‘देवाने आम्हास आकाशातील पशुपक्ष्यांपेक्षा शहाणे बनवले आहे तेव्हा तो कुठे आहे?’ पृथ्वीवरील जंगली प्राण्यापेक्षा जो मला अधीक शिकवतो,
- 12 त्यामुळे त्यांनी देवाकडे मदत मागितली तरी देव त्यांना उत्तर देणार नाही कारण ते लोक अतिशय गर्विष्ठ आहेत.
- 13 देव त्यांच्या तुच्छ याचनेकडे लक्ष देणार नाही सर्वशक्तिमान देव त्यांच्याकडे लक्ष देणार नाही.
- 14 तेव्हा, तू जेव्हा असे म्हणशील की देव तुला दिसत नाही तेव्हा देव तुझ्याकडे लक्ष देणार नाही तर तू त्याची वाट पाहत रहा!
- 15 तो तुला किती थोडक्यात उत्तर देईल जर तू असे म्हणालास तो क्रोधाने कोणालाही शिक्षा करीत नाही, आणि तो लोकांच्या गर्वीष्ठपणाकडे फारसे लक्ष देत नाही.
- 16 म्हणून ईयोब मुर्खपणाचे बोलण्यासाठी त्याचे मुख उघडतो. तो ज्ञानाविना त्याचे शब्द बोलत राहतो.”