욥기 8장 마라티 IRV

  1. 1 नंतर बिल्दद शूहीने उत्तर दिले आणि म्हणाला,
  2. 2 “तू किती वेळपर्यंत असा बोलत राहणार आहेस? तुझे शब्द सोसाट्याच्या वाऱ्यासारखे किती वेळेपर्यंत उडत राहतील.
  3. 3 देव नेहमीच न्यायी असतो का? सर्वशक्तिमान देव बरोबर असलेल्या धार्मिक गोष्टी कधीच बदलत नाही काय?
  4. 4 तुझ्या मुलांनी देवाविरुध्द काही पाप केले असेल म्हणून देवाने त्यांना त्यांच्या पापाची शिक्षा केली.
  5. 5 परंतु आता तू त्याच्याकडे लक्ष दे आणि त्या सर्वशक्तिमान देवाची दयेसाठी आवर्जून प्रार्थना कर.
  6. 6 तू जर चांगला आणि सरळ असलास तर तुला मदत करण्यासाठी तो त्वरीत येईल. तुझे कुटुंब तुला परत देईल.
  7. 7 जरी तुझी सुरुवात लहान असली, तरी तुझी अंतिम स्थिती अधिक मोठी असेल.
  8. 8 मी तुला विनंती करतो वडिलांच्या वेळेची माहिती विचार, त्यांनी जो शोध लावला तो तुझ्यासाठी लागू करून घे.
  9. 9 आपण अगदी कालच जन्माला आलो आहोत आणि काहीच माहित नाही, कारण छायेप्रमाणे आपले पृथ्वीतलावरचे दिवस आहेत.
  10. 10 ते काय तुला शिकविणार आणि सांगणार नाहीत काय? काय ते त्याच्या अंतकरणातून बोलणार नाही का?
  11. 11 लव्हाळी चिखलाशिवाय उंच वाढू शकतात का? गवत (बोरु) पाण्याशीवाय उगवू शकेल का?
  12. 12 ते अजूनही हिरवे आहेत आणि कापले नाही, ते दुसऱ्या झाडापेक्षा लवकर सुकून जातात.
  13. 13 म्हणून नास्तिक मनुष्याची आशा, जे सर्व देवाला विसरतात त्याचा मार्ग सुद्धा नष्ट होईल.
  14. 14 ज्याचा भरवसा नष्ट होतो. आणि ज्याचा विश्वास कोळ्याच्या जाळ्यासारखा तकलादु आहे.
  15. 15 तो आपल्या घरावर टेकला असता परंतू ते त्यास आधार देऊ शकणार नाही, त्याने ते पकडून धरले असता ते स्थिर राहायचे नाही.
  16. 16 तो सूर्यप्रकाश मिळालेल्या वनस्पतीसारखा हिरवागार आहे, तिच्या फांद्या सर्व बागेत पसरतात.
  17. 17 तिची मुळे खडकाभोवती आवळली जातात आणि खडकावरही उगवण्याचा प्रयत्न करतात.
  18. 18 परंतु जर हा व्यक्ती त्या जागेवरून हलवला गेला तर तो नष्ट होतो, मग ती जागा त्यास नाकारुन म्हणेल ‘मी तुला कधी पाहिले नाही.’
  19. 19 पाहा अशा रीतीने वागणाऱ्या वक्तीबद्दल हाच आनंद आहे की तिच्याच जागी धुळीतून दुसरे उगवतील.
  20. 20 पाहा, देव निरागस लोकांस सोडून देत नाही. तसेच तो वाईट मनुष्यांना मदतही करत नाही.
  21. 21 देव तुझे तोंड हास्याने भरुन टाकेल आणि तुझे ओठ आनंदाने ओरडतील!
  22. 22 जे तुझा द्वेष करतात ते लज्जेची वस्त्रे घालतील, दुष्ट मनुष्यांची राहूटी नष्ट होइल.”