시편 10편 마라티 IRV
- 1 हे परमेश्वरा, तू दूर का उभा आहेस? संकटकाळी तू स्वत:ला का लपवतोस?
- 2 कारण दुष्ट आपल्या गर्विष्ठपणामुळे पीडलेल्यांचा पाठलाग करतो, परंतु कृपया असे होवो की दुष्टांनी जे संकल्प योजिले आहेत, त्यामध्ये ते सापडो.
- 3 कारण दुष्ट आपल्या हृदयाच्या इच्छेचा अभिमान बाळगतो; दुष्ट लोभी व्यक्तीस धन्य म्हणतो व परमेश्वरास तुच्छ मानतो आणि नाकारतो.
- 4 दुष्ट मनुष्य गर्विष्ठ असतो, ह्यास्तव तो देवाला शोधत नाही. कारण देवाबद्दल त्यास काही काळजी नाही, म्हणून तो देवाचा विचार करत नाही.
- 5 त्याचे मार्ग उन्नतीचे असतात, परंतु तुझे धार्मिक नियम त्याच्या आवाक्याबाहेरचे आहेत, तो आपल्या सर्व शत्रूंवर फुत्कारतो.
- 6 तो आपल्या हृदयात असे म्हणतो, मी कधीच चुकणार नाही; संपूर्ण पिढ्यांत माझ्यावर आपत्ती येणारच नाही.
- 7 त्याचे मुख शाप, कपट, जुलूम, हानिकारक शब्दांनी भरलेले आहेत. त्यांची जीभ जखमी व नाश करते.
- 8 तो गावाजवळ टपून बसतो, गुप्त ठिकाणात तो निर्दोष्याला ठार मारतो; त्याचे डोळे लाचारावर टपून असतात.
- 9 जसा सिंह गर्द झाडात लपतो, तसाच तो दडून बसतो. तो दीनाला धरायला टपून बसतो. तो दीनाला आपल्या जाळ्यात ओढून धरून घेतो.
- 10 त्याचे बळी पडणारे ठेचले आणि झोडले जातात. ते त्याच्या बळकट जाळ्यात पडतात.
- 11 तो आपल्या हृदयात असे बोलतो, देव आपल्याला विसरला आहे, त्याने आपले मुख झाकले आहे, तो पाहण्याचा त्रास करून घेणार नाही.
- 12 हे परमेश्वरा, देवा, ऊठ! तू आपला हात न्यायासाठी चालव. गरीबांना विसरु नकोस.
- 13 दुष्ट देवाला तुच्छ का मानतो? तो मला जबाबदार धरणार नाही, असे तो मनात का म्हणतो?
- 14 तू ते पाहिले आहे, कारण तू आपल्या हाती ते घ्यावे म्हणून तू उपद्रव आणि दु:ख पाहतो, लाचार तुला आपणास सोपवून देतो, तू अनाथांचा वाचवणारा आहे.
- 15 दुष्ट आणि वाईट मनुष्याचा भुज तोडून टाक, त्याच्या वाईट कृत्यांबद्दल त्यास जबाबदार धर, ज्याने असा विचार केला होता की तू ते शोधणार नाही.
- 16 परमेश्वर सदासर्वकाळ राजा आहे, राष्ट्रे त्याच्या भूमीतून बाहेर घालवली आहेत.
- 17 हे परमेश्वरा, पीडितांचे तू ऐकले आहे; तू त्यांचे हृदय सामर्थ्यवान केले आहे, तू त्यांची प्रार्थना ऐकली आहे.
- 18 पोरके आणि पीडलेले यांचे तू रक्षण केले आहे, म्हणजे मनुष्य पृथ्वीवर आणखी भयाचे कारण होऊ नये.