시편 104편 마라티 IRV
- 1 हे माझ्या जिवा, परमेश्वराचा धन्यवाद कर. हे परमेश्वरा, माझ्या देवा, तू अत्यंत थोर आहेस; तू तेजस्विता आणि गौरव पांघरले आहेस.
- 2 जसे वस्राने तसे तू आपणाला प्रकाशाने झाकतोस; तंबूच्या पडद्याप्रमाणे तू आकाश पसरतोस.
- 3 तू आपल्या खोल्यांच्या तुळ्या जलांमध्ये ठेवतो; तू मेघांना आपले रथ करतोस; तू वाऱ्यांच्या पंखावर चालतोस.
- 4 तू वाऱ्याला आपले दूत करतोस, अग्नीच्या ज्वालांस आपले सेवक करतोस
- 5 त्याने पृथ्वीचा पाया घातला आहे, आणि ती कधीही हलणार नाही.
- 6 तू पृथ्वीला वस्राप्रमाणे पाण्याने आच्छादिले आहेस; पाण्याने पर्वत झाकले आहेत.
- 7 तुझ्या धमकीने पाणी मागे सरले आहे; तुझ्या गर्जनेच्या आवाजाने ती पळाली.
- 8 ती पर्वतावरून जाऊन खाली दरितून वाहात गेली, त्यांच्यासाठी नेमलेल्या जागी ती जाऊन राहिली.
- 9 तू त्यांना घालून दिलेल्या मर्यादा त्यांना ओलांडता येत नाही; ते पृथ्वीला पुन्हा झाकून टाकणार नाहीत.
- 10 तो दऱ्यातून झरे वाहवितो; डोंगरामधून प्रवाह वाहत जातात.
- 11 ते रानातल्या सर्व पशूंना पाणी पुरवितात; रानगाढवे आपली तहान भागवितात.
- 12 नदीकिनारी पक्षी आपले घरटे बांधतात; ते फांद्यामध्ये बसून गातात.
- 13 तो आपल्या वरच्या खोल्यातून पर्वतावर पाण्याचा वर्षाव करतो. पृथ्वी त्याच्या श्रमाच्या फळाने भरली आहे.
- 14 तो गुरांढोरासाठी गवत उगवतो, आणि मनुष्यांसाठी वनस्पतीची लागवड करतो; यासाठी की, मनुष्याने जमिनितून अन्न उत्पन्न करावे.
- 15 तो मनुष्यास आनंदित करणारा द्राक्षरस, त्याचा चेहरा चमकविणारे तेल, आणि त्याचे जीवन जिवंत ठेवणारे अन्नही त्याने उत्पन्न करावी.
- 16 परमेश्वराचे वृक्ष, जे लबानोनाचे गंधसरू त्याने लावले आहेत, ते रसभरित आहेत;
- 17 तेथे पक्षी आपली घरटी बांधतात. करकोचा देवदारूचे झाड तिचे घर करतो.
- 18 रानबकऱ्या उंच पर्वतावर राहतात; खडक सशांचे आश्रयस्थान आहे.
- 19 त्याने ऋतुमान समजण्यासाठी चंद्र नेमला आहे; सूर्याला त्याची मावळण्याची वेळ कळते.
- 20 तू रात्रीला काळोख करतोस, तेव्हा जंगलातील सर्व जनावरे बाहेर येतात.
- 21 तरुण सिंह आपल्या भक्ष्यासाठी गर्जना करतात, आणि देवाकडे आपले अन्न मागतात.
- 22 जेव्हा सूर्य उगवतो, तेव्हा ते परत जातात, आणि आपल्या गुहेत झोपतात.
- 23 दरम्यान लोक आपल्या कामासाठी बाहेर जातात, आणि ते संध्याकाळपर्यंत कष्ट करतात.
- 24 हे परमेश्वरा, तुझी कृत्ये किती अधिक आणि किती विविध प्रकारची आहेत! ती सर्व तुझ्या ज्ञानाने केली आहेत; पृथ्वी तुझ्या समृद्धीने भरली आहे.
- 25 त्यावर हा समुद्र, खोल आणि अफाट आहे, त्यामध्ये लहान व मोठे असंख्य प्राणी गजबजले आहेत.
- 26 तेथे त्यामध्ये जहाजे प्रवास करतात आणि त्यामध्ये खेळण्यासाठी जो लिव्याथान तू निर्माण केला तोही तेथे आहे.
- 27 योग्य वेळी तू त्यांना त्यांचे अन्न द्यावे म्हणून ते सर्व तुझ्याकडे पाहतात.
- 28 जेव्हा तू त्यांना देतोस, ते जमा करतात; जेव्हा तू आपला हात उघडतोस तेव्हा त्यांची उत्तम पदार्थांनी तृप्ती होते.
- 29 जेव्हा तू आपले तोंड लपवतोस तेव्हा ते व्याकुळ होतात; जर तू त्यांचा श्वास काढून घेतला, तर ते मरतात आणि परत मातीस मिळतात.
- 30 जेव्हा तू आपला आत्मा पाठवतोस, तेव्हा ते उत्पन्न होतात, आणि तू भूप्रदेश पुन्हा नवीन करतोस.
- 31 परमेश्वराचे वैभव सर्वकाळ राहो; परमेश्वरास आपल्या निर्मितीत आनंद होवो.
- 32 तो पृथ्वीवर खाली बघतो आणि ती थरथर कापते; तो पर्वताला स्पर्श करतो आणि ते धुमसतात.
- 33 मी माझ्या आयुष्यभर परमेश्वरास गाणे गाईन. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत माझ्या देवाचे मी गुणगान करीन.
- 34 माझे विचार त्यास गोड वाटो; परमेश्वराजवळ मला आनंद होईल.
- 35 पृथ्वीवरून पापी नष्ट होवोत, आणि दुष्ट आणखी न उरोत. हे माझ्या जिवा परमेश्वराचा धन्यवाद कर. परमेश्वराची स्तुती करा.