시편 116편 마라티 IRV
- 1 मी परमेश्वरावर प्रेम करतो कारण तो माझी वाणी आणि माझ्या विनंत्या दयेसाठी ऐकतो.
- 2 कारण तो माझे ऐकतो, म्हणून मी जिवंत आहे तोपर्यंत मी त्यास हाक मारीन.
- 3 मृत्यूचे दोर माझ्याभोवती आवळले, आणि मला अधोलोकांच्या यातना झाल्या, संकट व क्लेश मला झाले.
- 4 नंतर मी परमेश्वराच्या नावाचा धावा केला, “हे परमेश्वरा, मी तुला विनंती करतो, मला वाचव.”
- 5 परमेश्वर कृपाळू आणि न्यायी आहे; आमचा देव कनवाळू आहे.
- 6 परमेश्वर भोळ्यांचे रक्षण करतो; मी दीनावस्थेत होतो तेव्हा त्याने माझे तारण केले.
- 7 हे माझ्या जिवा तू आपल्या विश्रामस्थानी परत ये; कारण परमेश्वराने तुझ्यावर पुष्कळ उपकार केले आहेत.
- 8 तू माझा जीव मृत्यूपासून, माझे डोळे अश्रूपासून, आणि माझे पाय अडखळण्यापासून मुक्त केले आहेत.
- 9 जीवंताच्या भूमित परमेश्वराची सेवा करणे मी चालूच ठेवीन.
- 10 मी फार पीडित आहे असे जेव्हा मी म्हणालो, तरी माझा त्याच्यावर विश्वास आहे.
- 11 मी अविचाराने म्हणालो की, सगळे माणसे खोटारडे आहेत.
- 12 परमेश्वराने माझ्यावर केलेल्या सर्व उपकाराची मी कशी परतफेड करू?
- 13 मी तारणाचा प्याला उंचावून परमेश्वराच्या नावाने हाक मारीन.
- 14 त्याच्या सर्व लोकांसमोर, मी परमेश्वरास केलेले नवस पूर्ण करीन.
- 15 परमेश्वराच्या दृष्टीने त्याच्या भक्तांचा मृत्यू अमोल आहे.
- 16 हे परमेश्वरा, मी खरोखर तुझा सेवक आहे; मी तुझा सेवक, तुझी दासी असलेल्या स्त्रीचा मुलगा आहे; माझी बंधने तू सोडली आहेस.
- 17 मी तुला उपकाराचा यज्ञ अर्पण करीन आणि मी परमेश्वराचे नामस्मरण करीन.
- 18 मी त्याच्या सर्व लोकांसमोर परमेश्वरास केलेले नवस पूर्ण करीन.
- 19 परमेश्वराच्या घराच्या अंगणात, यरूशलेमा तुझ्यामध्ये ते फेडीन. परमेश्वराची स्तुती करा.