시편 118편 마라티 IRV
- 1 परमेश्वरास धन्यवाद द्या, कारण तो चांगला आहे, कारण त्याची दया सर्वकाळ टिकणारी आहे.
- 2 इस्राएलाने आता म्हणावे, “त्याची दया सर्वकाळ टिकणारी आहे.”
- 3 अहरोनाच्या घराण्याने म्हणावे, “त्याची दया सर्वकाळ टिकणारी आहे.”
- 4 परमेश्वराची उपासना करणाऱ्यांनी म्हणावे, “त्याची दया सर्वकाळ टिकणारी आहे.”
- 5 मी संकटात असता परमेश्वरास हाक मारली. परमेश्वराने मला उत्तर दिले आणि मला सोडवले.
- 6 परमेश्वर माझ्याबरोबर आहे; मी घाबरणार नाही; मनुष्य माझे काय करू शकेल?
- 7 माझे सहाय्य करणारा परमेश्वर माझ्या बाजूला आहे; माझा द्वेष करणाऱ्यावर विजय झालेला मी बघेन.
- 8 मनुष्यावर भरवसा ठेवण्यापेक्षा परमेश्वराच्या आश्रयास जाणे अधिक चांगले आहे.
- 9 मनुष्यावर भरवसा ठेवण्यापेक्षा परमेश्वरास शरण जाणे हे अधिक चांगले आहे.
- 10 सर्व राष्ट्रांनी मला घेरले आहे; परमेश्वराच्या नावात मी त्यांचा संहार करीन.
- 11 त्यांनी मला घेरले आहे; होय, त्यांनी मला घेरले आहे. परमेश्वराच्या नावात मी त्यांना नाहीसे करीन.
- 12 त्यांनी मला मधमाश्याप्रमाणे घेरले आहे; जशी काट्यांमध्ये जेवढ्या लवकर आग लागते तेवढ्याच लवकर ते नाहीसे होतील. परमेश्वराच्या नावात मी त्यांना नाहीसे करीन.
- 13 मी पडावे म्हणून त्यांनी माझ्यावर हल्ला केला, परंतु परमेश्वराने मला मदत केली.
- 14 परमेश्वर माझे सामर्थ्य आणि आनंद आहे. आणि तो माझे तारण झाला आहे.
- 15 उत्सवाचा आणि तारणाचा शब्द नितीमानाच्या तंबूत ऐकू येत आहे; परमेश्वराचा उजवा हात विजय मिळवतो.
- 16 परमेश्वराचा उजवा हात उंचावला आहे; परमेश्वराचा उजवा हात विजय मिळवतो.
- 17 मी मरणार नाही, पण जगेन आणि परमेश्वराची कृत्ये जाहीर करीन.
- 18 परमेश्वराने मला जबर शिक्षा केली; परंतु त्याने मला मृत्यूच्या हाती दिले नाही.
- 19 माझ्यासाठी धार्मिकतेचे दरवाजे उघडा; मी त्यामध्ये प्रवेश करीन आणि मी परमेश्वरास धन्यवाद देईन.
- 20 हे परमेश्वराचे दार आहे; नितीमान त्यातून प्रवेश करतील.
- 21 मी तुला धन्यवाद देईन, कारण तू मला उत्तर दिले आहे आणि तू माझे तारण झाला आहेस.
- 22 इमारत बांधणाऱ्यांनी जो दगड नाकारला होता, तोच कोनाशिला झाला आहे.
- 23 परमेश्वराने हे केले आहे; आमच्या दृष्टीने ते अतिशय अद्भुत आहे.
- 24 परमेश्वराने नेमलेला दिवस हाच आहे; ह्यात आपण आनंद व उल्लास करू.
- 25 हे परमेश्वरा, आम्ही तुला विनंती करतो, आता आमचे तारण कर; हे परमेश्वरा आम्ही तुला विनंती करतो, आता आमचा उत्कर्ष कर.
- 26 परमेश्वराच्या नावाने येणारा धन्यवादित असो; परमेश्वराच्या घरातून आम्ही तुला आशीर्वाद देतो.
- 27 परमेश्वर देव आहे. त्याने आपल्याला प्रकाश दिला आहे; यज्ञाचा पशू वेदीच्या शिंगास दोरीने बांधा.
- 28 तू माझा देव आहेस आणि मी तुला धन्यवाद देईन. तू माझा देव आहेस; मी तुला उंचावीन.
- 29 अहो, तुम्ही परमेश्वरास धन्यवाद द्या; कारण तो चांगला आहे; कारण त्याची दया सर्वकाळ टिकणारी आहे.