시편 144편 마라티 IRV
- 1 परमेश्वर माझा खडक त्यास धन्यवाद असो, जो माझ्या हाताला युद्ध करण्यास; आणि माझ्या बोटास लढाई करण्यास शिक्षण देतो.
- 2 तो माझा दयानिधी व माझा दुर्ग, माझा उंच बुरुज आणि मला सोडवणारा, माझी ढाल आहे आणि मी त्याचा आश्रय घेतो; तो लोकांस माझ्या सत्तेखाली आणतो.
- 3 हे परमेश्वरा, मानव तो काय की तू त्याची ओळख ठेवावी? किंवा मनुष्य तो काय की तू त्याच्याविषयी विचार करावा?
- 4 मनुष्य एका श्वासासारखा आहे; त्याचे दिवस नाहीशा होणाऱ्या सावलीसारखे आहेत.
- 5 हे परमेश्वरा, तू आपले आकाश लववून खाली उतर; पर्वतांना स्पर्श कर आणि त्यातून धूर येऊ दे.
- 6 विजांचे लखलखाट पाठवून, माझ्या शत्रूला पांगवून टाक; तुझे बाण मारून, त्यांचा पराभव करून त्यांना माघारी पाठव.
- 7 वरून आपले हात लांब कर; महापुरातून, या परक्यांच्या हातून, मला सोडवून वाचव.
- 8 त्यांचे मुख असत्य बोलते, आणि त्यांचा उजवा हात असत्याचा आहे.
- 9 हे देवा, मी तुला नवे गाणे गाईन. दशतंतु वीणेवर मी तुझी स्तवने गाईन;
- 10 तूच राजांना तारण देणारा आहे; तूच आपला सेवक दावीद याला दुष्टाच्या तलवारीपासून वाचवले.
- 11 मला या परक्यांच्या हातातून मुक्त कर व मला वाचव. त्यांचे मुख असत्य बोलते; आणि त्यांचा उजवा हात असत्याचा आहे.
- 12 आमची मुले आपल्या तारुण्याच्या भरांत उंच वाढलेल्या रोपांसारखी आहेत. आमच्या मुली राजवाड्याच्या कोपऱ्यातील कोरलेल्या खांबाप्रमाणे आहेत.
- 13 आमची कोठारे प्रत्येक प्रकारच्या वस्तुंनी भरलेली असावीत. आणि आमच्या शेतात आमची मेंढरे सहस्रपट, दशसहस्रपट वाढावीत.
- 14 मग आमचे बैल लादलेले असावेत; दरोडे, धरपकड व आकांत हे आमच्या रस्त्यात नसावेत;
- 15 ज्यांना असे आशीर्वाद आहेत ते लोक आशीर्वादित आहेत; ज्या लोकांचा देव परमेश्वर आहे ते आनंदी आहेत.