시편 145편 마라티 IRV
- 1 माझ्या देवा, हे राजा, मी तुझी खूप स्तुती करीन; मी सदासर्वकाळ व कायम तुझ्या नावाचा धन्यवाद करीन.
- 2 प्रत्येक दिवशी मी तुझा धन्यवाद करीन. मी सदासर्वकाळ व कायम तुझ्या नावाचे स्तवन करीन.
- 3 परमेश्वर महान आणि परमस्तुत्य आहे; त्याची महानता अनाकलनीय आहे.
- 4 एक पिढी दुसऱ्या पिढीपुढे तुझ्या कृत्यांची प्रशंसा करीत राहील, आणि तुझ्या पराक्रमी कृतीचे वर्णन करतील.
- 5 ते तुझ्या राजवैभवाचा गौरवयुक्त प्रतापाविषयी बोलतील, मी तुझ्या अद्भुत कार्यांचे मनन करीन.
- 6 ते तुझ्या भयावह कृत्यांच्या पराक्रमाविषयी बोलतील, मी तुझ्या महिमेचे वर्णन करीन.
- 7 ते तुझ्या विपुल अशा चांगुलपणाविषयी सांगतील, आणि तुझ्या न्यायीपणाबद्दल गाणे गातील.
- 8 परमेश्वर दयाळू आणि कृपाळू आहे, तो मंदक्रोध व अतिदयाळू आहे.
- 9 परमेश्वर सर्वांना चांगला आहे; त्याची कृपा त्याने केलेल्या सर्व कृत्यांवर आहे.
- 10 हे परमेश्वरा, तू केलेली सर्व कृत्ये तुला धन्यवाद देतील; तुझे भक्त तुला धन्यवाद देतील.
- 11 ते तुझ्या राज्याच्या गौरवाविषयी सांगतील, आणि तुझ्या सामर्थ्याविषयी बोलतील.
- 12 हे यासाठी की, त्यांनी देवाची पराक्रमी कृत्ये आणि त्याच्या राज्याचे वैभवयुक्त ऐश्वर्य ही मानवजातीस कळवावी.
- 13 तुझे राज्य युगानुयुग राहणारे राज्य आहे. आणि तुझा राज्याधिकार पिढ्यानपिढ्या टिकणारा आहे.
- 14 पडत असलेल्या सर्वांना परमेश्वर आधार देतो, आणि वाकलेल्या सर्वांना तो उभे करतो.
- 15 सर्वांचे डोळे तुझ्याकडे लागतात. आणि तू त्यांना योग्य वेळी त्यांचे अन्न देतोस.
- 16 तू आपला हात उघडून प्रत्येक जिवंत प्राण्याची इच्छा तृप्त करतो.
- 17 परमेश्वर आपल्या सर्व मार्गात न्यायी आहे; आणि तो आपल्या सर्व कृत्यात दयाळू आहे.
- 18 जे कोणी त्याचा धावा करतात, जे सत्यतेने त्याचा धावा करतात, त्या सर्वांना परमेश्वर जवळ आहे.
- 19 तो त्याचे भय धरणाऱ्यांची इच्छा पुरवतो; तो त्यांची आरोळी ऐकून त्यांना वाचवतो.
- 20 परमेश्वर आपल्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांचे रक्षण करतो. परंतु तो वाईटांचा नाश करतो.
- 21 माझे मुख परमेश्वराची स्तुती करील. सर्व मानवजात त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद सदासर्वकाळ व कायम करो.