시편 25편 마라티 IRV
- 1 हे परमेश्वरा, मी आपला जीव तुझ्याकडे उंचावतो.
- 2 माझ्या देवा, तुझ्यात माझा विश्वास आहे. मला निराश होऊ देऊ नको, माझे शत्रू माझ्यावर हर्ष न करोत.
- 3 तुझ्या विश्वासणाऱ्याची कधी निराशा होत नाही. परंतु जे कारण नसताना विश्वासघात करतात, ते लाजवले जातील.
- 4 हे परमेश्वरा तुझे मार्ग मला कळव, मला तुझे मार्ग शिकव.
- 5 तू आपल्या सत्यात मला मार्ग दाखव आणि मला शिकव. कारण तू माझा तारणारा देव आहेस मी रोज तुझी वाट पाहतो.
- 6 हे परमेश्वरा, तुझ्या दयाळू कृत्यांची आणि प्रेमदयेची आठवण कर.
- 7 हे परमेश्वरा, माझे तरुणपणाचे पाप आणि माझा बंडखोरपणा आठवू नको. तू आपल्या प्रेमदयेला अनुसरून आपल्या चांगुलपणामुळे माझी आठवण कर.
- 8 परमेश्वर चांगला आणि प्रामाणिक आहे. यास्तव तो पाप्यांस मार्ग शिकवतो.
- 9 तो नम्र जणांस न्यायाने मार्गदर्शन करतो. आणि दीनांना आपला मार्ग शिकवीतो.
- 10 जे त्याचे करार आणि वचने पाळतात त्यांच्यासाठी परमेश्वराचे मार्ग प्रेमदया व विश्वासयोग्य आहेत.
- 11 परमेश्वरा, तुझ्या नामास्तव, माझ्या अपराधांची क्षमा कर, कारण ते खूप आहेत.
- 12 परमेश्वराचे भय धरतो असा मनुष्य कोण आहे? प्रभू त्यास सूचना देईल, की त्याने कोणते मार्ग निवडावे.
- 13 त्याचे जीवन चांगुलपणात जाईल, आणि त्याची संतान भूमीचे वतन पावतील.
- 14 परमेश्वराचे सत्य त्याचे अनुकरण करणाऱ्यांबरोबर असते. आणि तो त्याचे करार कळवतो.
- 15 मी नेहमी परमेश्वराकडे आपली दृष्टी लावतो. कारण तो माझे पाय जाळ्यातून मुक्त करतो.
- 16 परमेश्वरा माझ्याकडे फिर आणि माझ्यावर दया कर. कारण मी एकटा आणि पीडलेला आहे.
- 17 माझ्या हृदयाचा त्रास वाढला आहे, संकटातून मला तू काढ.
- 18 परमेश्वरा, माझे दु:ख आणि कष्ट बघ, माझ्या सर्व पापांची क्षमा कर.
- 19 माझ्या सर्व शत्रूंकडे पाहा, कारण ते पुष्कळ आहेत. ते माझा कठोरपणे तिरस्कार करतात.
- 20 देवा, माझे रक्षण कर आणि मला वाचव. माझा तुझ्यावर विश्वास आहे, तेव्हा माझी निराशा करू नकोस.
- 21 तुझा प्रामाणिकपणा आणि सरळपणा माझे रक्षण करोत. कारण माझा तुझ्यावर विश्वास आहे.
- 22 देवा, इस्राएलाच्या लोकांस त्यांच्या सर्व त्रासांपासून सोडव.