시편 32편 마라티 IRV
- 1 ज्याच्या अपराधांना क्षमा केली गेली आहे, ज्याचे अपराध झाकले गेले आहेत ते आशीर्वादित आहेस.
- 2 परमेश्वर ज्याच्या ठायी काही अपराध गणत नाही, आणि ज्याच्या आत्म्यात कपट नाही तो सुखी आहे.
- 3 मी गप्प राहिलो, तेव्हा पूर्ण दिवस माझ्या, ओरडण्याने माझी हाडे जर्जर झाली.
- 4 कारण रात्रंदिवस तुझा हात माझ्यावर भारी होता. उन्हाळ्यात उष्णतेमुळे माझी शक्ती सुकून गेली आहे.
- 5 तेव्हा मी परमेश्वरासमोर माझे अपराध कबूल केले, आणि मी माझा अपराध लपवला नाही, मी म्हणालो, परमेश्वरासमोर मी आपले पाप कबूल करीन, आणि तू मला माझ्या सर्व अपराधांबद्दल क्षमा केलीस.
- 6 याच कारणास्तव प्रत्येक देवभक्त तू पावशील तेव्हा तुझी प्रार्थना करो. संकटे जेव्हा महापुरासारखी येतात तेव्हा ती तुझ्या भक्तांपर्यंत नक्कीच जाणार नाहीत.
- 7 तू माझे लपण्याचे ठिकाण आहेस. तू मला संकटांपासून वाचवशील, विजयाच्या गीताने तू मला वेढशील. (सेला)
- 8 परमेश्वर म्हणतो, “मी तुला बोध करीन आणि ज्या मार्गात, तू चालावे तो मी तुला शिकवीन. तुझ्यावर माझी नजर ठेवून मी तुला बोध करीन.
- 9 म्हणून घोड्यासारखा व गाढवासारखा मूर्ख होऊ नकोस, ज्यांना काही समजत नाही. त्यांना आवरण्यासाठी लगाम व बागदोर असलाच पाहिजे. नाहीतर ते तुमच्या जवळ येणार नाहीत.”
- 10 वाईट लोकांस खूप दु:ख भोगावे लागेल, परंतु जे परमेश्वरावर विश्वास ठेवतात त्यांच्या भोवती देवाच्या खऱ्या प्रेमाचे कडे आहे.
- 11 अहो न्यायी जनहो, परमेश्वराच्या ठायी आनंद व हर्ष करा. अहो सरळ जनहो हर्षाने तुम्ही जल्लोष करा.