시편 34편 마라티 IRV
- 1 मी सर्व समयी परमेश्वरास स्तुती देईन. माझ्या मुखात नेहमी त्याची स्तुती असेल.
- 2 मी परमेश्वराची स्तुती करणार, विनम्र ऐकतील आणि आनंद करतील.
- 3 तुम्ही माझ्याबरोबर परमेश्वरास स्तुती द्या. आपण एकत्र त्याच्या नावाला उंचावू या.
- 4 मी परमेश्वराकडे मदतीसाठी गेलो आणि त्याने मला उत्तर दिले. आणि त्याने मला माझ्या सर्व भयांवर विजय दिला.
- 5 जे त्याच्याकडे पाहतील ते चकाकतील, आणि त्यांची मुखे कधीच लज्जीत होणार नाहीत.
- 6 या पीडलेल्या मनुष्याने आरोळी केली, आणि परमेश्वराने त्याचे ऐकले आणि त्यास त्याच्या सर्व संकटातून सोडवले.
- 7 परमेश्वराचे भय धरणाऱ्याभोवती तो छावणी करतो. आणि त्यास वाचवतो.
- 8 परमेश्वर किती चांगला आहे, ह्याचा अनुभव घेऊन पाहा. धन्य तो पुरुष जो त्याच्याठायी आश्रय घेतो.
- 9 जे तुम्ही त्याचे निवडलेले आहा, ते तुम्ही परमेश्वराचे भय धरा. त्याचे भय धरणाऱ्यांस कशाचीच कमतरता भासत नाही.
- 10 तरुण सिंहाना देखील उणे पडते आणि ते भुकेले होतात, परंतु जे परमेश्वरास शोधतात त्यांना कोणत्याही चांगल्या गोष्टींची उणीव पडणार नाही.
- 11 मुलांनो माझे ऐका आणि मी तुम्हास परमेश्वराचे भय कसे धरावे हे शिकवीन.
- 12 सुख पाहण्यासाठी आयुष्याची इच्छा धरतो आणि दिवसाची आवड धरतो तो मनुष्य कोण आहे?
- 13 तर वाईट बोलण्यापासून आवर, आणि तुझे ओठ खोटे बोलण्यापासून आवर.
- 14 वाईट कृत्ये करणे सोडून दे आणि चांगली कृत्ये कर. शांतीचा शोध कर आणि तिच्यामागे लाग.
- 15 परमेश्वराची दृष्टी नितीमानांवर आहे, त्याचे कान त्याच्या आरोळीकडे असतात.
- 16 परंतु परमेश्वर वाईट कृत्ये करणाऱ्याविरुध्द आहे. तो त्यांची आठवण पृथ्वीतून नाश करतो.
- 17 नितीमान आरोळी करतो आणि परमेश्वर ते ऐकतो, आणि तो तुम्हास तुमच्या सर्व संकटातून वाचवेल.
- 18 जे हृदयाने तुटलेले आहेत, त्यांच्याजवळ परमेश्वर आहे. आणि तो खिन्न झालेल्या आत्म्यास तारतो.
- 19 नितीमानाचे कष्ट पुष्कळ आहेत, परंतू परमेश्वर त्या सर्वांवर त्यांना विजय मिळवून देईल.
- 20 परमेश्वर त्याच्या सर्व हाडाचे रक्षण करेल. त्यांतले एकही हाड तो मोडू देणार नाही.
- 21 परंतु दुष्टाई दुष्टाला मारुन टाकील, जो नितीमानाचा द्वेष करतो तो दोषी ठरवला जाईल.
- 22 परमेश्वर त्याच्या सेवकाच्या आत्म्यांना तारेल. त्याच्यात आश्रय घेणारा कोणीही दोषी ठरवला जाणार नाही.