시편 44편 마라티 IRV
- 1 हे देवा, आम्ही तुझ्याबद्दल ऐकले आहे. आमच्या वडिलांनी ते आम्हास सांगितले आहे, की पुरातन दिवसात तू, त्यांच्या दिवसात काय कार्य केलेस.
- 2 तू तुझ्या हाताने राष्ट्रांना घालवून दिलेस, परंतु आपल्या लोकांस स्थापिले, तू लोकांस पीडले परंतु आपल्या लोकांस तू वाढवले.
- 3 कारण त्यांनी आपल्या तलवारीने देश मिळवला नाही. आणि त्यांच्या बाहूंनी त्यांना तारले नाही. परंतू तुझा उजवा हात, तुझा भुज, तुझ्या मुखाच्या प्रकाशाने त्यांना तारले, कारण तू त्यांच्यावर अनुकूल होतास.
- 4 देवा, तू माझा राजा आहेस, याकोबाला विजय मिळावा म्हणून आज्ञा दे.
- 5 तुझ्या मदतीने आम्ही शत्रूला मागे ढकलू. जे आमच्याविरूद्ध उठतात, तुझ्या नावाने आम्ही आमच्या शत्रूंना तुडवून टाकू.
- 6 कारण माझ्या धनुष्यबाणांवर माझा विश्वास नाही. किंवा माझी तलवार मला वाचवू शकेल.
- 7 परंतु तू आम्हांला आमच्या शत्रूंपासून वाचवले आहेस. आणि जे आमचा द्वेष करतात त्यांना लाजवले आहेस.
- 8 देवाच्या ठायी रोज आम्ही आमचा अभिमान बाळगला आहे, आणि तुझ्या नावाला आम्ही सर्वकाळ महिमा देऊ. (सेला)
- 9 परंतु आता तू आम्हास फेकून दिले आहे, आणि आमची अप्रतिष्ठा होऊ दिली आहे. आणि तू आमच्या सैन्यासोबत पुढे जात नाहीस.
- 10 तू आमच्या शत्रूंपुढे आम्हास मागे हटण्यास लावले, आणि आमचा द्वेष करणारे त्यांच्यासाठी लूट घेतात.
- 11 तू आम्हास भक्ष्याकरता योजलेल्या मेंढ्यासारखे केले आहे, आणि आम्हास देशात विखरून टाकले आहेस.
- 12 तू तुझ्या लोकांस कवडीमोलाने विकलेस, आणि असे करून तू आपली संपत्ती देखील वाढवली नाही.
- 13 तू शेजाऱ्यांमध्ये आम्हांस निंदा आणि आमच्या सभोवती असणाऱ्यांमध्ये आम्हांस हसण्याजोगे आणि थट्टा असे केले आहे.
- 14 राष्ट्रांमध्ये तू आम्हास अपमान असे केले आहे, लोक आम्हास बघून आपले डोके हलवतात.
- 15 सर्व दिवस माझी अप्रतिष्ठा माझ्या समोर असते. आणि माझ्या मुखावरच्या लज्जेने मला झाकले आहे.
- 16 कारण माझ्या निंदकाच्या आणि अपमानाच्या शब्दाने, शत्रू आणि सुड घेणाऱ्यांमुळे माझे मुख लज्जेने झाकले आहे.
- 17 हे सर्व आमच्यावर आले आहे, तरी आम्ही तुला विसरलो नाही, किंवा करारांत खोटे वागलो नाही.
- 18 आमचे हृदय मागे फिरले नाही, आमची पावले तुझ्यापासून दूर गेली नाहीस.
- 19 तरी तू आम्हास कोल्हे राहतात त्या जागेत चिरडलेस, आणि मृत्यूछायेने आम्हास झाकले आहेस.
- 20 जर आम्ही आमच्या देवाचे नाव विसरलो असेल किंवा आमचे हात अनोळखी देवाकडे पसरवले असतील,
- 21 तर देव हे शोधून काढणार नाही काय? कारण तो हृदयातील गुप्त गोष्टी जाणतो.
- 22 खरोखर, आम्ही दिवसभर तुझ्यासाठी मारले जात आहोत. मारण्यासाठी नेल्या जाणाऱ्या मेंढ्यांप्रमाणे आम्ही आहोत.
- 23 प्रभू, ऊठ तू का झोपला आहेस? ऊठ, आम्हास कायमचा सोडून जाऊ नकोस.
- 24 तू आमच्यापासून आपले मुख का लपवतोस? आणि आमचे दु:ख आणि आमच्यावरचे जुलूम तू का विसरतोस?
- 25 कारण आमचा जीव धुळीस खालपर्यंत गेला आहे, आणि आमचे पोट भूमीला चिकटले आहे.
- 26 आमच्या साहाय्याला ऊठ! आणि तुझ्या प्रेमदयेस्तव आम्हास वाचव.