시편 47편 마라티 IRV
- 1 अहो सर्व लोकहो! तुम्ही टाळ्या वाजवा. विजयोत्सवाने देवाचा जयजयकार करा.
- 2 कारण परात्पर परमेश्वर भय धरण्यास योग्य आहे; तो सर्व पृथ्वीवर थोर राजा आहे.
- 3 तो लोकांस आमच्या ताब्यात देतो, आणि राष्ट्रांना आमच्या पायाखाली आणतो.
- 4 त्याने आमचे वतन आमच्यासाठी निवडले आहे, ज्या याकोबावर त्याने प्रीती केली तो त्याचे वैभव आहे.
- 5 जयघोष होत असता देव वर गेला, परमेश्वर तुतारीच्या आवाजात वर गेला.
- 6 देवाला स्तुतिगान गा, स्तुतिस्तवने गा; आमच्या राजाची स्तुतिगीते गा, स्तुतिगीते गा.
- 7 कारण देव सर्व पृथ्वीचा राजा आहे; त्याची स्तुतीपर गाणे उमजून गा.
- 8 देव राष्ट्रांवर राज्य करतो; देव आपल्या पवित्र सिंहासनावर बसला आहे.
- 9 अब्राहामाच्या देवाच्या लोकांचे अधिपती एकत्र जमले आहेत; कारण पृथ्वीवरील ढाली देवाच्या आहेत. तो अत्यंत उंच आहे.