시편 51편 마라티 IRV
- 1 हे देवा, तू आपल्या प्रेमदयेमुळे माझ्यावर दया कर, तुझ्या पुष्कळ दयाळूपणाच्या कृत्यांनी माझ्या अपराधांचे डाग पुसून टाक.
- 2 देवा माझे अपराध धुऊन टाक, आणि मला माझ्या पापांपासून शुद्ध कर.
- 3 कारण माझे अपराध मला माहित आहेत. आणि माझी पातके नित्य माझ्यासमोर आहेत.
- 4 तुझ्याविरूद्ध, फक्त तुझ्याविरूद्ध मी पाप केले आहे, आणि तुझ्या दृष्टीने जे वाईट ते मी केले आहे. जेव्हा तू बोलतोस तर तू सत्य बोलतो. तू न्याय करतो तेव्हा योग्य करतो.
- 5 पाहा! मी जन्मापासूनच पापी आहे, आणि पापांतच माझ्या आईने माझा गर्भ धारण केला.
- 6 पाहा! तू माझ्या हृदयात सत्यतेची इच्छा धरतो, तू माझ्या हृदयास ज्ञानाची ओळख करून दे.
- 7 मला शुध्द करण्यासाठी तू एजोब वनस्पती वापर, मी शुद्ध होईन, मला धुऊन शुद्ध कर आणि मी बर्फापेक्षा शुद्ध होईन.
- 8 आनंद व हर्ष मला ऐकू दे, म्हणजे तू मोडलेली माझी हाडे हर्ष करतील.
- 9 माझ्या पापांकडे बघू नकोस, माझ्या सर्व अपराधांचे डाग पुसून टाक.
- 10 देवा, माझ्याठायी पवित्र हृदय निर्माण कर. आणि माझ्या मध्ये स्थीर असा आत्मा पुन्हा घाल.
- 11 तुझ्या उपस्थितीतून मला दूर लोटू नकोस, आणि तुझा पवित्र आत्मा माझ्यातून काढून घेऊ नकोस.
- 12 तू केलेल्या तारणाचा आनंद मला पुन्हा होऊ दे, आणि उत्सुक आत्म्याने मला सावरून धर.
- 13 तेव्हा मी पापी लोकांस तुझे मार्ग शिकविन आणि पापी तुझ्याकडे परिवर्तित होतील.
- 14 हे माझ्या तारणाऱ्या देवा, रक्तपाताच्या दोषापासून मला क्षमा कर, आणि मी तुझ्या न्यायीपणाबद्दल मोठ्याने ओरडेन.
- 15 प्रभू, माझे ओठ उघड, आणि माझे तोंड तुझी स्तुती वर्णन करेल.
- 16 कारण यज्ञाची आवड तुला नाही, नाहीतर मी ते दिले असते, होमार्पणाने तुला संतोष होत नाही.
- 17 देवाचा यज्ञ म्हणजे, तुटलेले हृदय, तुटलेले आणि पश्चातापी हृदय तू तुच्छ मानणार नाहीस.
- 18 हे देवा, तू प्रसन्न होऊन सियोनेचे चांगले कर. आणि यरूशलेमेच्या भींती पुन्हा बांध.
- 19 तेव्हा न्यायीपणाचे यज्ञ, होमार्पणे, आणि सकल होमार्पणे तुला आवडतील. तेव्हा तुझ्या वेदीवर बैल अर्पिले जातील.