시편 6편 마라티 IRV
- 1 हे परमेश्वरा, रागाच्या भरात मला शासन करू नकोस, किंवा तुझ्या संतापात मला शिक्षा करू नकोस.
- 2 हे परमेश्वरा माझ्यावर दया कर, कारण मी अशक्त आहे. हे परमेश्वरा मला निरोगी कर, कारण माझी हाडे ठणकत आहेत.
- 3 माझा जीव फार घाबरला आहे. परंतू हे परमेश्वरा, असे किती काळ चालणार आहे?
- 4 हे परमेश्वरा, कडक धोरण सोड, माझ्या जीवाला वाचव! तुझ्या प्रेमदयेच्या विपुलतेने मला तार.
- 5 कारण मरणात तुझे कोणीही स्मरण करत नाही. मृतलोकांत तुझी उपकारस्तुती कोण करणार?
- 6 मी माझ्या कण्हण्याने दमलो आहे. रात्रभर मी माझे अंथरुण आसवांनी ओले करतो. मी माझे अंथरुण अश्रूंनी धुवून काढतो.
- 7 शोकामुळे माझे डोळे अंधूक झाले आहेत. माझ्या सर्व शत्रूंमुळे ते जीर्ण झाले आहेत.
- 8 अहो लोकांनो, जे तुम्ही अन्यायाचे कृत्य करता, माझ्यापासून निघून जा. कारण परमेश्वराने माझे रडणे ऐकले आहे.
- 9 परमेश्वराने माझ्या दयेची याचना ऐकली आहे; त्याने माझ्या प्रार्थनेचा स्वीकार केला आहे.
- 10 माझे सर्व शत्रू लाजवले जातील आणि फार घाबरतील. ते माघारे फिरतील आणि अकस्मात लज्जित होतील.