시편 94편 마라티 IRV
- 1 हे परमेश्वरा, देवा तुझ्याकडे सूड घेणे आहे, तुझ्याकडे सूड घेणे आहे; तू हे देवा आपले तेज प्रगट कर.
- 2 पृथ्वीच्या न्यायाधीशा, ऊठ, गर्विष्ठांना त्यांचे उचित प्रतिफल दे.
- 3 हे परमेश्वरा, दुष्ट किती काळ, दुष्ट किती काळ विजयोत्सव करतील?
- 4 ते बडबड करतात आणि उर्मटपणे बोलतात आणि फुशारकी मारतात.
- 5 हे परमेश्वरा, ते तुझ्या लोकांस चिरडतात; जे तुझ्या मालकीचे राष्ट्र आहे त्यांना ते पीडितात.
- 6 ते विधवांना आणि उपऱ्यांचा जीव घेतात, आणि ते अनाथांचा खून करतात.
- 7 ते म्हणतात की, परमेश्वर बघणार नाही, याकोबाचा देव लक्ष देत नाही.
- 8 अहो तुम्ही मूर्ख लोकांनो, समजून घ्या; मूर्खांनो, तुम्ही कधीपर्यंत शिकणार आहात?
- 9 ज्याने आपला कान घडविला तो ऐकणार नाही काय? ज्याने आपला डोळा बनविला तो पाहणार नाही काय?
- 10 जो राष्ट्रांना शिस्त लावतो, तो शिक्षा करणार नाही का? जो मनुष्यांना ज्ञान शिकवतो. तो अज्ञानी असणार का?
- 11 परमेश्वर मनुष्यांचे विचार जाणतो, ते भ्रष्ट आहेत.
- 12 हे परमेश्वरा ज्या मनुष्यास तू शिस्त लावतोस, ज्याला आपल्या नियमशास्रातून शिकवितोस तो आशीर्वादित आहे.
- 13 दुष्टासाठी खाच खणली जाईपर्यंत, तू त्यास संकटसमयी विसावा देशील.
- 14 कारण परमेश्वर आपल्या लोकांस किंवा आपल्या वतनाला सोडून देणार नाही.
- 15 कारण न्याय नितीमानाकडे वळेल; आणि सरळ मनाचे सर्व तो अनुसरतील.
- 16 माझ्यासाठी दुष्कर्म करणाऱ्याविरूद्ध कोण लढेल? अन्याय करणाऱ्याविरूद्ध माझ्यासाठी कोण उभा राहिल?
- 17 जर परमेश्वराने मला मदत केली नसती, तर माझा जीव निवांतस्थानी कधीच जाऊन पडला असता.
- 18 जेव्हा मी म्हणतो, माझा पाय घसरला आहे, तेव्हा, परमेश्वरा, तुझा विश्वासाचा करार मला उचलून धरतो.
- 19 जेव्हा माझे मन खूप चिंताग्रस्त होते तेव्हा तुझ्यापसून लाभणारे सांत्वन माझ्या जिवाला आनंदित करते.
- 20 जे दुष्टपणाचे राजासन कायद्याने अरिष्ट योजते ते तुझ्याशी संबंध ठेवाल काय?
- 21 ते नितीमानाच्या जिवाविरूद्ध एकवट होतात, आणि निर्दोष्यांस देहांत शिक्षा देतात;
- 22 परंतु परमेश्वर माझा उंच बुरुज आहे, आणि माझा देव मला आश्रयाचा खडक आहे.
- 23 त्याने त्यांचा अन्याय त्यांच्यावरच आणला आहे; आणि त्यांच्याच दुष्टपणात तो त्यांना नाहीसे करील. आमचा देव परमेश्वर त्यांना नाहीसे करील.