시편 95편 마라티 IRV
- 1 याहो या, आपण परमेश्वराचा जयजयकार करू; आपल्या तारणाचा खडक त्याचा हर्षाने जयजयकार करू.
- 2 उपकारस्तुती करीत त्याच्या सान्निध्यात प्रवेश करू; स्तुतीचे स्तोत्रे गात त्याचा जयजयकार करू.
- 3 कराण परमेश्वर महान देव आहे आणि सर्व देवांहून तो श्रेष्ठ महान राजा आहे.
- 4 त्याच्या हाती पृथ्वीची खोल स्थाने आहेत; पर्वताची उंच शिखरेही त्याचीच आहेत.
- 5 समुद्र त्याचाच आहे, कारण त्यानेच तो निर्माण केला, आणि त्याच्या हाताने कोरडी भूमी घडवली गेली.
- 6 याहो या, आपला निर्माणकर्ता परमेश्वर यापुढे गुडघे टेकू, त्याची उपासना करू, त्यास नमन करू;
- 7 कारण तो आपला देव आहे, आणि आपण त्याच्या कुरणातील लोक आणि त्याच्या हातातील मेंढरे आहोत. आज जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल तर किती बरे होईल.
- 8 मरीबा येथल्याप्रमाणे किंवा मस्साच्या दिवशी रानात केले तसे आपली मने कठीण करू नका,
- 9 तेव्हा तुमच्या वडिलांनी माझ्या अधिकाराला आव्हान दिले, आणि जरी त्यांनी माझी कृती पाहिली होती, तरी माझ्या सहनशीलतेची परीक्षा केली.
- 10 चाळीस वर्षे त्या पिढीवर मी रागावलो, आणि म्हणालो, हे बहकलेल्या मनाचे आहेत; त्यांनी माझे मार्ग जाणले नाहीत.
- 11 म्हणून मी आपल्या रागात शपथ वाहिली की, हे माझ्या विसाव्यात कधीही प्रवेश करणार नाहीत.