잠언 12장 마라티 IRV
- 1 ज्याला शिक्षण प्रिय त्यास ज्ञान प्रिय, परंतु जो कोणी शासनाचा द्वेष करतो तो मूर्ख आहे.
- 2 परमेश्वर चांगल्या मनुष्यास कृपा देतो, पण वाईट योजना करणाऱ्याला तो दोषी ठरवतो.
- 3 दुष्टतेने मनुष्य स्थिर होत नाही, पण नीतिमानाचे उच्चाटण होणार नाही.
- 4 सद्गुणी पत्नी आपल्या पतीचा मुकुट आहे, परंतु जी कोणी लाज आणणारी ती त्याची हाडे सडविणाऱ्या रोगासारखी आहे.
- 5 नीतिमानाच्या योजना यथान्याय असतात, पण दुष्टांचा सल्ला कपटाचा असतो.
- 6 दुष्टांचे शब्द रक्तपात घडून आणण्यासाठी दबा धरून थांबतात, परंतु न्यायीचे शब्द त्यास सुरक्षित ठेवतात.
- 7 दुर्जन उलथून टाकले जातात आणि नाहीसे होतात, पण नीतिमानाचे घर टिकते.
- 8 मनुष्याची प्रशंसा त्याच्या सुज्ञतेप्रमाणे होते, पण जो विकृत निवड करतो त्याचा तिरस्कार होतो.
- 9 जो आपणास प्रतिष्ठित दाखवतो पण त्याच्याकडे अन्न नसते; त्यापेक्षा ज्याची प्रतिष्ठा बेताची असून फक्त सेवक असतो तो चांगला समजायचा.
- 10 नीतिमान आपल्या प्राण्यांविषयीच्या गरजांची काळजी घेतो, पण दुष्टाचे दयाळूपणही क्रूर असते.
- 11 जो कोणी आपल्या शेतात कष्ट करतो त्याच्याकडे विपुल अन्न असते, पण जो निरर्थक योजनेमागे धावतो तो बुद्धिहीन आहे.
- 12 दुसऱ्यापासून चोरल्याची इच्छा दुर्जन करतो, पण नितीमानाचे फळ ते स्वतःपासून येते.
- 13 दुष्ट मनुष्य आपल्या पापी बोलल्याने पाशात पडतो, पण नीतिमान संकटातून निसटतो.
- 14 मनुष्य आपल्या मुखाच्या फळाकडून चांगल्या गोष्टींच्या योगे तृप्त होतो, त्यास आपल्या हातांच्या कामाचे प्रतिफळ मिळेल.
- 15 मूर्खाचा मार्ग त्याच्या दृष्टीने नीट असतो, परंतु सुज्ञ मनुष्य सल्ला ऐकून घेतो.
- 16 मूर्ख त्याचा राग लागलाच दाखवतो, पण जो दूरदर्शी आहे तो अपमानाकडे दुर्लक्ष करतो.
- 17 जो कोणी खरे बोलतो तो जे काय योग्य आहे ते सांगतो, पण खोटा साक्षीदार लबाड सांगतो.
- 18 कोणी असा असतो की, तलवार भोसकावी तसे अविचाराचे भाषण करतो, पण सुज्ञाची जिव्हा आरोग्य आणते.
- 19 सत्याची वाणी सर्वकाळ टिकेल, पण लबाड बोलणारी जिव्हा क्षणिक आहे.
- 20 वाईट योजणाऱ्यांच्या अंतःकरणात कपट असते, परंतु शांतीचा सल्ला देणाऱ्यांच्या मनात हर्ष असतो.
- 21 नीतिमानावर संकटे येत नाहीत, परंतु दुर्जनावर अडचणी येतात.
- 22 खोटे बोलणाऱ्या वाणीचा परमेश्वरास वीट आहे, पण जे कोणी प्रामाणिकपणे राहणारे त्यास आनंद देतात.
- 23 शहाणा मनुष्य आपले ज्ञान गुप्त ठेवतो, पण मूर्खाचे हृदय मूर्खपणा ओरडून सांगते.
- 24 उद्योग्याचे हात अधिकार चालवतील, पण आळशाला गुलामासारखे राबावे लागेल.
- 25 मनुष्याचे हृदय काळजीच्या भाराने त्यास खाली दाबून टाकते, पण चांगला शब्द त्यास आनंदित करतो.
- 26 नीतिमान आपल्या मित्राला मार्ग दाखवतो, पण दुष्टाचे मार्ग त्यांना बहकावतो.
- 27 आळशी आपण धरलेली शिकार भाजित नाही, पण उद्योगी मनुष्य मौल्यवान संपत्ती संपादन करतो.
- 28 न्यायीपणाच्या मार्गात जीवन सापडते, आणि त्यांच्या वाटेत मरण नाही.