잠언 14장 마라티 IRV
- 1 सुज्ञ स्त्री आपले घर बांधते, पण मूर्ख स्त्री आपल्या स्वतःच्या हाताने ते खाली पाडते.
- 2 जो सरळपणे चालतो तो परमेश्वराचे भय धरतो, पण जो कोणी आपल्या मार्गात अप्रामाणिक आहे तो त्यास तुच्छ मानतो.
- 3 मूर्खाच्या मुखातून त्याच्या गर्वाची काठी निघते, पण सुज्ञाची वाणी त्याची जोपासना करते.
- 4 गुरेढोरे नसले तर गोठा स्वच्छ राहतो, पण बैलाच्या बलाने विपुल पिक येऊ शकते.
- 5 विश्वासू साक्षीदार खोटे बोलत नाही, पण खोटा साक्षीदार मुखाने लबाड्या करतो.
- 6 निंदक ज्ञानाचा शोध करतो आणि काहीच मिळत नाही, पण जो कोणी बुद्धिमान आहे त्यास ज्ञान मिळवणे सोपे आहे.
- 7 मूर्ख मनुष्यापासून दूर जा, कारण त्याच्या वाणीत तुला काही ज्ञान सापडणार नाही.
- 8 शहाण्याने आपले मार्ग समजणे यामध्ये त्याची सुज्ञता आहे, परंतु मूर्खाचे मूर्खपण कपट आहे.
- 9 मूर्खाला पापार्पणाचे अर्पण थट्टा वाटते, पण सरळांमध्ये परस्पर कृपा असते.
- 10 हृदयाला आपल्या स्वतःच्या खेदाची जाणीव असते, आणि त्याच्या आनंदात परक्याला भाग नाही.
- 11 दुष्टाच्या घराचा नाश होईल, पण सरळांच्या तंबूची भरभराट होईल.
- 12 मनुष्यास एक मार्ग बरोबर आहे असे वाटते, पण त्याचा शेवट फक्त मरणाकडे नेतो.
- 13 हृदय हसू शकते पण तरी त्यामध्ये वेदना असतात, आणि आनंदाचा शेवट शोकात होतो.
- 14 जो कोणी अविश्वासू आहे त्यास त्याच्या वागणुकीचे फळ मिळेल, पण चांगल्या मनुष्यास जे काही त्याचे आहे तेच मिळेल.
- 15 भोळा प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवतो, पण शहाणा मनुष्य आपल्या पावलांविषयी विचार करतो.
- 16 शहाणा मनुष्य भय धरतो आणि वाईटापासून दूर राहतो, पण मूर्ख धिटाईने इशारा विचारात घेत नाही.
- 17 शीघ्रकोपी मूर्खासारख्या गोष्टी करतो, आणि जो वाईट योजना करतो त्या मनुष्याचा द्वेष होतो.
- 18 भोळ्यांना मूर्खपणाचे वतन मिळते, पण शहाणे ज्ञानाने वेढलेले असतात.
- 19 दुर्जन सज्जनापुढे नमतात, आणि नीतिमानाच्या दारापुढे दुष्ट नमतील.
- 20 गरीब मनुष्याचे स्वतःचे सोबतीसुद्धा द्वेष करतात, पण श्रीमंताला खूप मित्र असतात.
- 21 जो कोणी आपल्या शेजाऱ्याचा तिरस्कार करतो तो पापी आहे, परंतु जो कोणी गरीबावर दया दाखवतो तो आनंदी आहे.
- 22 जो दुष्ट योजना आखतो तो चुकीच्या मार्गाने जात नाही का? पण जो कोणी चांगले करण्याची योजना करतो, तो कराराचा विश्वास आणि विश्वसनियता स्वीकारतो.
- 23 सर्व कष्टात फायदा आहे, पण जेव्हा तेथे फक्त बोलतच राहिलात, ते दारिद्र्याकडे घेऊन जाईल.
- 24 शहाण्याची संपत्ती त्याचा मुकुट आहे, पण मूर्खांची मूर्खता केवळ मूर्खताच आणते.
- 25 खरा साक्षी जीव वाचवतो, पण खोटा साक्षीदार लबाड्या करतो तो दगलबाज आहे.
- 26 परमेश्वराच्या भयात दृढ विश्वास आहे, आणि त्याच्या मुलांसाठी ती आश्रयस्थान आहेत.
- 27 परमेश्वराचे भय जीवनाचा झरा आहे, याकरिता त्यांनी मरणाच्या जाळ्यापासून दूर रहावे.
- 28 प्रजावृद्धित राजाचे गौरव सापडते, पण प्रजेशिवाय राजपुत्राचा नाश आहे.
- 29 सहनशील मनुष्य खूप समजदार असतो, पण शीघ्रकोपी मूर्खता उंचावतो.
- 30 शांत अंतःकरण देहाचे जीवन आहे, पण मत्सराने हाडे कुजतात.
- 31 जो मनुष्य गरीबांवर जुलूम करतो तो त्याच्या निर्माणकर्त्याला शाप देतो, परंतु जो गरजवंतावर दया करतो तो त्याचा सन्मान करतो.
- 32 दुष्ट आपल्या वाईट कृतीने खाली आणला जातो, पण नीतिमानाला मरणाच्या वेळेसही आश्रय मिळतो.
- 33 बुद्धिमानाच्या अंतःकरणात ज्ञान स्थिर असते, पण मूर्खाच्या अंतर्यामात जे असते ते कळून येते.
- 34 योग्य ते केल्याने राष्ट्राची उन्नती होते, पण पाप लोकांस कलंक आहे.
- 35 शहाणपणाने वागणाऱ्या सेवकावर राजाची मर्जी असते, पण जो लज्जास्पद कृत्य करतो त्याच्यासाठी त्याचा राग आहे.