잠언 2장 마라티 IRV
- 1 माझ्या मुला, जर तू माझी वचने स्वीकारशील आणि माझ्या आज्ञा तुझ्याजवळ संग्रह करून ठेवशील,
- 2 ज्ञानाचे ऐकशील. आणि ज्ञानाकडे तुझे मन लावशील.
- 3 जर तू विवेकासाठी आरोळी करशील, आणि तुझा आवाज त्यासाठी मोठ्याने उच्चारशील;
- 4 जर तू रुप्याप्रमाणे त्याचा शोध घेशील, आणि जसे तू गुप्तधन मिळविण्याचा प्रयत्न करतो तसेच ज्ञानाचा शोध घेशील;
- 5 तर तुला परमेश्वराच्या भयाची जाणीव होईल, आणि देवाविषयीचे ज्ञान तुला सापडेल.
- 6 कारण परमेश्वर ज्ञान देतो, त्याच्या मुखातून सुज्ञता आणि ज्ञान येतात.
- 7 जे त्यास संतोषवितात त्यांना तो पूर्ण ज्ञान देतो, जे प्रामाणिकपणे चालतात त्यांना तो ढाल आहे,
- 8 तो न्यायाच्या मार्गाचे रक्षण करतो, आणि जे त्याच्याबरोबर विश्वसनीय आहेत त्याच्या मार्गात टिकून राहतील.
- 9 मग धर्म, निती व सात्विकता तुला समजेल, आणि प्रत्येक चांगला मार्ग कळेल.
- 10 ज्ञान तुझ्या हृदयात प्रवेश करील, आणि तुझ्या आत्म्याला ज्ञान आनंदित करील.
- 11 दूरदर्शीपणा तुझ्यावर पहारा करील, आणि समंजसपणा तुला सांभाळेल.
- 12 ते तुला वाईट मार्गापासून सोडविल, कपटी गोष्टी बोलणाऱ्यापासून, सोडवायला तो तुला संभाळील,
- 13 ते चांगले मार्ग सोडून, अंधकाराच्या मार्गांनी चालत आहेत.
- 14 जेव्हा ते दुष्कर्म करतात ते आनंदित होतात, आणि दुष्कर्माच्या विकृतीवरून ते उल्लासतात.
- 15 ते वाकडे मार्ग अनुसरतात, आणि ते फसवणूक करून त्यांच्या वाटा लपवतात.
- 16 ज्ञान आणि दूरदर्शीपणा तुला अनितीमान स्त्रीपासून वाचवील, जी स्त्री धाडस करायला बघते आणि खुशामतीच्या शब्दांनी स्तुती करते.
- 17 तिने आपला तरुणपणाचा सोबती सोडला आहे, आणि आपल्या देवाचा करार विसरली आहे.
- 18 कारण तिचे घर मरणाकडे खाली वाकले आहे. आणि तिच्या वाटा तुला त्या कबरेत असलेल्याकडे घेऊन जातात.
- 19 जे सर्व कोणी तिच्याकडे जातात ते पुन्हा माघारी येत नाहीत. आणि त्यांना जीवनाचा मार्ग सापडत नाही.
- 20 म्हणून तू चांगल्या लोकांच्या मार्गाने चालावे, व जे योग्य मार्गाने जातात त्याच्यामागे जावे.
- 21 कारण योग्य करतात तेच देशात घर करतील, आणि जे प्रामाणिक आहेत तेच त्यामध्ये राहतील.
- 22 परंतु दुष्टांना त्यांच्या वतनातून छेदून टाकले जाईल, आणि जे विश्वासहीन त्यांना त्यांच्या वतनापासून दूर नेले जाईल.