잠언 5장 마라티 IRV
- 1 माझ्या मुला, माझ्या ज्ञानाकडे लक्ष लाव; माझ्या सुज्ञानाकडे काळजीपूर्वक आपला कान लाव.
- 2 म्हणून तू दूरदर्शीपणाविषयी शिक्षण घे, आणि तुझे ओठ तुझ्या विद्येचे रक्षण करतील.
- 3 कारण व्यभिचारिणी स्त्रीच्या ओठातून मध टिपकतो, आणि तिचे तोंड तेलापेक्षा गुळगुळीत असते,
- 4 पण शेवटी ती दवण्यासारखी कडू आहे, आणि दुधारी तलवारी सारखी धारदार होते.
- 5 तिचे पाय मृत्यूकडे खाली जातात; तिची पावले सर्व मार्गात अधोलोकात लागतात.
- 6 म्हणून तिला जीवनाची नीट वाट सापडत नाही. तिची पावले भटकतात, ती कोठे जाते हे तिला समजत नाही.
- 7 आणि आता, माझ्या मुलांनो, माझे ऐका; माझ्या तोंडची वचने ऐकण्यापासून दूर जाऊ नका.
- 8 तू आपला मार्ग तिच्यापासून दूर राख, आणि तिच्या घराच्या दाराजवळ सुध्दा जाऊ नको.
- 9 गेलास तर तुझी अब्रू इतरांच्या हाती जाईल, आणि तुझ्या आयुष्याची वर्षे क्रूरजनाच्या हाती जातील;
- 10 तुझ्या संपत्तीने परके मेजवाणी करतील, आणि तुझ्या श्रमाचे फळ दुसऱ्याच्या घरात जाईल.
- 11 जेव्हा तुझा देह व शरीर सर्वकाही नष्ट होईल, तेव्हा तुझ्या आयुष्याच्या शेवटी तू शोक करशील.
- 12 तू म्हणशील “मी शिस्तीचा कसा द्वेष केला, आणि माझ्या अंतःकरणाने शासन कसे तुच्छ मानले!
- 13 मी माझ्या शिक्षकांच्या आज्ञा पाळल्या नाहीत, किंवा मला शिकवणाऱ्याकडे कान दिला नाही.
- 14 मंडळी व सभा यांच्यादेखत मी बहुतेक पुर्णपणे नाश पावलो होतो.”
- 15 तू आपल्याच टाकितले पाणी पी, तुझ्या स्वतःच्या विहिरितले वाहते पाणी पी.
- 16 तुझे झरे बाहेर सर्वत्र वाहून जावे काय, आणि तुझ्या पाण्याचा प्रवाह सार्वजनिक चौकात वाहावा कां?
- 17 ते केवळ तुझ्यासाठीच असावेत, आणि तुझ्याबरोबर परक्यांसाठी नसावेत.
- 18 तुझ्या झऱ्याला आशीर्वाद प्राप्त होवो, आणि तरुणपणी केलेल्या पत्नीसह तू संतुष्ट रहा.
- 19 कारण ती सुंदर हरीणी आणि आकर्षक रानशेळी आहे. तिचे स्तन तुला सर्वदा आनंदाने भरोत; तू तिच्या प्रेमाने नेहमी आनंदीत रहा.
- 20 माझ्या मुला, व्यभिचारी स्त्रीने तुला कां आनंदित करावे; तू परक्या स्त्रीच्या उराचे आलिंगन कां करावे?
- 21 मनुष्य काय करतो हे परमेश्वर सर्वकाही पाहतो, तो त्याच्या सर्व वाटांकडे लक्ष देतो.
- 22 दुष्ट मनुष्यास त्याची स्वतःचीच दुष्कर्मे धरतात, त्याची पापे दोरीप्रमाणे त्यास घट्ट पकडतील.
- 23 शिक्षणाची उणीव असल्या कारणाने तो मरेल; तो आपल्या महान मूर्खपणामुळे बहकून जाईल.