예레미야애가 5장 마라티 IRV
- 1 हे परमेश्वरा, आमची अवस्था काय झाली याकडे लक्ष लाव. आमच्या अप्रतिष्ठेकडे नजर टाक.
- 2 आमचे वतन परक्यांच्या हातात गेले आहे. आमची घरे परदेशीयांना दिली गेली आहेत.
- 3 आम्ही अनाथ झालो. आम्हास वडील नाहीत. आमच्या मातांची स्थिती विधवांसारखी झाली आहे.
- 4 आम्हास पिण्याच्या पाण्यासाठी रूपे द्यावे लागतात; आमचेच लाकूड आम्हास विकले जाते.
- 5 आमचा पाठलाग करणारे आमच्या मानगुटीस बसले आहेत. आम्ही दमलो आहोत. आम्हास विश्रांती नाही.
- 6 पोटभर भाकरी मिळविण्यासाठी आम्ही मिसर व अश्शूर यांच्यासमोर आम्ही आपले हात पुढे केले.
- 7 आमच्या पूर्वजांनी तुझ्याविरुध्द पाप केले. आता ते नाहीत. पण त्यांच्या पापाची फळे आता आम्ही भोगत आहोत.
- 8 गुलाम आमच्यावर राज्य करतात. त्यांच्या हातातून आम्हास कोणीही वाचवायला नाही.
- 9 राणात चालू असलेल्या तलवारीमुळे आम्ही आपला जीव मुठीत घेऊन आपले अन्न मिळवतो.
- 10 आमची कातडी भट्टीप्रमाणे तापली आहेत. भुकेमुळे आम्हास ताप चढला आहे.
- 11 सियोनेतील स्त्रियांवर आणि यहूदा नगरातील कुमारीवर त्यांनी अत्याचार केला;
- 12 त्यांनी आमच्या राजपुत्रांना फासावर दिले; आमच्या वडीलधाऱ्यांचा त्यांनी सन्मान केला नाही.
- 13 आमच्या तरुणांना त्यांनी पिठाच्या जात्यावर दळावयास लावले. ते तरुण लाकडाच्या ढिगाऱ्याखाली अडखळले.
- 14 वृध्द आता नगरीच्या द्वारात बसत नाहीत. तरुण गायनवादन करीत नाहीत.
- 15 आमच्या नृत्याचे रूपांतर आता मृतांच्या शोकात झाले आहे. आमच्या हृदयात आनंदाचा अंशही नाही.
- 16 आम्ही पाप केल्यामुळे आमच्या डोक्यावरचा मुकुट खाली पडला आहे. म्हणून आम्हास हाय.
- 17 या सर्व गोष्टीमुळे आमचे मन खचले आहे. आम्हास डोळ्यांनी स्पष्टपणे दिसत नाही.
- 18 सियोनचे डोंगर ओसाड झाले आहेत. सियोनच्या डोंगरावर कोल्हे वावरतात.
- 19 पण परमेश्वरा, तुझी सत्ता निरंतन आहे. तुझे राजसिंहासन चिरकाल राहील.
- 20 परमेश्वर तू आम्हास कायमचा विसरला आहेस असे दिसते. तू आम्हास दीर्घकाल सोडून गेला आहेस.
- 21 परमेश्वरा, आम्हास तुझ्याकडे परत वळव. आम्ही आमच्या पातकाकरिता पश्चाताप करितो. पूर्वीप्रमाणेच आमच्या जुन्या दिवसाची पुनर्स्थापना कर.
- 22 तोपर्यंत आमचा धिक्कार होऊन आमच्याप्रती तुझा क्रोध अतिभयंकर असेल.