호세아 10장 마라티 IRV
- 1 इस्राएल एक जोमाने वाढणारा द्राक्षीचा वेल आहे. त्यास विपुल फळे येतात. जसजसे त्याची फळे वाढली तसतशी त्याने वेद्या बांधल्या. त्याची भूमी सुपीक झाली, तो त्याने सुंदर स्तंभ उभारले.
- 2 त्यांचे हृदय कपटी आहे, त्यांना त्यांची शिक्षा होईल परमेश्वर त्यांच्या वेद्या मोडून टाकेल त्याच्या पवित्र स्तंभाचा नाश करेल.
- 3 आता ते म्हणतील, “आम्हास राजा नाही, कारण आम्ही परमेश्वराचे भय मानले नाही आणि राजा आमच्यासाठी काय करणार?”
- 4 ते पोकळ शब्द बोलतात खोट्या शपथा वाहून करार करतात, म्हणून जसे शेताच्या तासात विषारी रानटी झुडूप उगवतात तसा त्यांच्यावर न्याय येईल.
- 5 शोमरोनाचे रहिवासी बेथआवेनच्या वासरांसाठी घाबरे होतील त्यांचे लोक त्यांच्यासाठी विलाप करतील, सोबतच त्यांचे मुर्तीपुजक पुजारी जे त्याच्या वैभवावर आनंद करत होते आता ते त्यांच्याबरोबर नाहीत.
- 6 ते अश्शूरास त्यांच्या महान राजासाठी भेट म्हणून नेण्यात येतील. एफ्राईम लज्जीत होईल, आणि मुर्तीच्या सल्ल्याने वागल्यामुळे इस्राएल लज्जीत होईल.
- 7 शोमरोनाचा राजा पाण्यावर तरंगणाऱ्या ढलण्यासारखा नाश पावेल.
- 8 दुष्टतेची श्रध्दास्थानाने आणि इस्राएलाची पापे नाश पावतील त्यांच्या वेदींवर काटे व काटेरी झुडपे उगवतील. लोक पर्वतास म्हणतील, “आम्हास झाका” आणि टेकडयास म्हणतील, “आमच्यावर पडा”
- 9 इस्राएला, गिबाच्या दिवसापासून तू पाप करत आहेस; तू तिथेच राहिला आहेस गिबाच्या दुष्टांसोबत झालेल्या लढाईत ते सापडले नाहीत?
- 10 मला वाटेल तेव्हा मी त्यास शिस्त लावीन, त्यांच्या विरोधात राष्ट्रे एकत्र येतील व त्यांच्या दोन्ही पापांसाठी त्यांना बेड्या टाकतील.
- 11 एफ्राईम ही प्रशिक्षित कालवड आहे तिला मळणी करायला आवडते म्हणून मी तिच्या गोऱ्या मानेवर जू ठेवीन. मी एफ्राईमावर जू ठेवीन, यहूदा नांगरील, याकोब ढेकळे फोडील.
- 12 तुम्ही आपणासाठी धार्मिकतेची पेरणी करा आणि कराराच्या विश्वासूपणाची फळे तोडा, तुमची पडीत भूमी नांगरुन काढा, कारण जोपर्यंत तो येऊन धार्मिकतेचा पाऊस पाडत नाही, तोपर्यंत परमेश्वरास शोधण्याचीच ही वेळ आहे.
- 13 तुम्ही दुष्टतेची नांगरणी केली, तुम्ही अन्यायाची कापणी केली, तुम्ही फसवणूकीचे फळ खाल्ले कारण तू तुझ्या योजनांवर आणि तुझ्या पुष्कळ सैनिकांवर विश्वास ठेवला.
- 14 म्हणून तुझ्या लोकांमध्ये युध्दाचा गलबला होईल आणि तुझी सर्व तटबंदीची शहरे नष्ट होतील. हे असे घडेल जसे शल्मनाने बेथ-आर्बिलाच्या युध्दात नाश केला तेव्हा आईला मुलांसह आपटून मारले गेले.
- 15 तुझ्या अती दुष्टपणामुळे बेथेल तुझ्यासोबत असेच करील. प्रभातसमयी इस्राएलाचा राजा पूर्णपणे नाश पावील.