마태복음 1장 마라티 IRV
- 1 अब्राहामाचा पुत्र दावीद याचा पुत्र जो येशू ख्रिस्त याची वंशावळ.
- 2 अब्राहामास इसहाक झाला, इसहाकास याकोब, याकोबास यहूदा व त्याचे भाऊ झाले.
- 3 यहूदास तामारेपासून पेरेस व जेरह झाले, पेरेसास हेस्रोन, हेस्रोनास अराम झाला.
- 4 अरामास अम्मीनादाब, अम्मीनादाबास नहशोन, नहशोनास सल्मोन,
- 5 सल्मोनास राहाबेपासून बवाज, बवाजास रूथपासून ओबेद, ओबेदास इशाय झाला.
- 6 आणि इशायास दावीद राजा झाला. उरीयाच्या पत्नीपासून दावीदास शलमोन झाला.
- 7 शलमोनास रहबाम, रहबामास अबीया, अबीयास आसा झाला.
- 8 आसास यहोशाफाट, यहोशाफाटास योराम आणि योरामास उज्जीया,
- 9 उज्जीयास योथाम, योथामास आहाज, आहाजास हिज्कीया,
- 10 हिज्कीयास मनश्शे, मनश्शेस आमोन, आमोनास योशीया,
- 11 आणि बाबेलास देशांतर झाले त्यावेळी योशीयास यखन्या व त्याचे भाऊ झाले.
- 12 बाबेलास देशांतर झाल्यानंतर यखन्यास शल्तीएल झाला, शल्तीएलास जरूब्बाबेल झाला.
- 13 जरूब्बाबेलास अबीहूद, अबीहूदास एल्याकीम, एल्याकीमास अज्जुर झाला.
- 14 अज्जुरास सादोक, सादोकास याखीम, याखीमास एलीहूद झाला.
- 15 एलीहूदास एलाजार झाला. एलाजारास मत्तान, मत्तानास याकोब,
- 16 याकोबास योसेफ झाला; जो मरीयेचा पती होता जिच्यापासून ख्रिस्त म्हटलेला येशू जन्मास आला.
- 17 अशाप्रकारे अब्राहामापासून दावीदापर्यंत सर्व मिळून चौदा पिढ्या, दावीदापासून बाबेलास देशांतर होईपर्यंत चौदा पिढ्या आणि बाबेलास देशांतर झाल्यापासून ख्रिस्तापर्यंत चौदा पिढ्या.
- 18 येशू ख्रिस्ताचा जन्म याप्रकारे झाला; त्याची आई मरीया हिची योसेफाशी मागणी झालेली होती, पण त्यांचा सहवास होण्यापूर्वी ती पवित्र आत्म्यापासून गर्भवती झालेली दिसून आली.
- 19 मरीयेचा पती योसेफ हा नीतिमान होता, परंतु समाजामध्ये तिचा अपमान होऊ नये अशी त्याची इच्छा होती, म्हणून त्याने गुप्तपणे तिच्यासोबतची मागणी मोडण्याचा निर्णय घेतला.
- 20 तो या गोष्टींविषयी विचार करीत असता त्यास स्वप्नात प्रभूच्या दूताने दर्शन देऊन म्हटले; “योसेफा, दावीदाच्या पुत्रा, तू मरीयेला आपली पत्नी म्हणून स्वीकार करण्यास घाबरू नकोस, कारण जो गर्भ तिच्या पोटी राहीला आहे तो पवित्र आत्म्यापासून आहे.
- 21 ती पुत्राला जन्म देईल आणि तू त्याचे नाव येशू ठेव, तो आपल्या लोकांस त्यांच्या पापांपासून तारील.”
- 22 प्रभूने संदेष्ट्यांच्याद्वारे जे सांगितले होते ते परिपूर्ण व्हावे यासाठी हे सर्व झाले, ते असे,
- 23 “पाहा कुमारी गर्भवती होईल व पुत्राला जन्म देईल, आणि त्यास इम्मानुएल हे नाव देतील.” या नावाचा अर्थ, “आम्हाबरोबर देव.”
- 24 तेव्हा झोपेतून उठल्यावर प्रभूच्या दूताने आज्ञा दिली होती तसे योसेफाने केले, त्याने तिचा आपली पत्नी म्हणून स्वीकार केला.
- 25 तरी मुलाचा जन्म होईपर्यंत त्याने तिच्याशी सहवास ठेवला नाही; आणि त्याने त्याचे नाव येशू ठेवले.