마가복음 4장 마라티 IRV
- 1 पुन्हा येशू सरोवराच्या किनाऱ्यावर शिक्षण देऊ लागला, तेव्हा त्याच्याजवळ फार मोठा समुदाय जमला, म्हणून तो सरोवरातील एका तारवात जाऊन बसला आणि सर्व लोक सरोवरकिनारी जमिनीवर होते.
- 2 तो त्यास दाखले देऊन पुष्कळ गोष्टी शिकवू लागला आणि तो त्यांना म्हणाला;
- 3 ‹“ऐका, एक पेरणारा पेरणी करण्यास निघाला;›
- 4 ‹आणि तो पेरत असताना असे झाले की, काही बी वाटेवर पडले, ते पक्ष्यांनी येऊन खाऊन टाकले.›
- 5 ‹काही बी खडकाळ जमिनीत पडले, तेथे त्यास फारशी माती नव्हती. माती खोल नसल्यामुळे ते लगेच उगवले.›
- 6 ‹पण सूर्य वर आल्यावर ते उन्हाने करपले व मूळ नसल्याकारणाने ते वाळून गेले.›
- 7 ‹काही बी काटेरी झुडपांमध्ये पडले व काटेरी झुडपांनीच वाढून त्याची वाढ खुंटवली, म्हणून त्यास काही पीक आले नाही.›
- 8 ‹काही बी चांगल्या जमिनीत पडले ते उगवले, मोठे झाले व त्यास पीक आले; आणि त्याचे तीसपट, साठपट, शंभरपट असे उत्पन्न आले.”›
- 9 तो म्हणाला, ‹“ज्याला ऐकण्यास कान आहेत तो ऐको.”›
- 10 तो एकांती असता त्याच्याबरोबर बारा जणांसह जे होते त्यांनी त्यास दाखल्यांविषयी विचारले.
- 11 तो त्यांना म्हणाला, ‹“देवाच्या राज्याचे रहस्यदान तुम्हास दिले आहे, परंतु बाहेरच्यांना सर्वकाही दाखल्यांनी सांगण्यात येते.›
- 12 ‹यासाठी की त्यांनी पाहत असता पाहावे परंतु त्यांना दिसू नये,› ‹आणि ऐकत असता त्यांनी ऐकावे, पण समजू नये.› ‹नाही तर कदाचित त्यांची माने फिरतील आणि देव त्यांना क्षमा करील.”›
- 13 तो म्हणाला, ‹“हा दाखला तुम्हास समजला नाही काय, तर मग इतर बाकीचे दाखले तुम्हास कसे समजतील?›
- 14 ‹पेरणारा वचन पेरतो.›
- 15 ‹वाटेवर वचन पेरले जाते तेथील लोक हे आहेत की, त्यांनी ऐकल्याबरोबर सैतान येऊन त्यांच्यातले पेरलेले वचन हिरावून घेतो.›
- 16 ‹तसेच खडकाळ जमिनीत पेरलेले हे आहेत की, वचन ऐकताच ते आनंदाने ग्रहण करतात;›
- 17 ‹तथापि त्यांच्यामध्ये मूळ नसल्याकारणाने ते थोडा काळच टिकाव धरतात; मग वचनामुळे संकट आले किंवा छळ झाला म्हणजे ते लगेच अडखळतात.›
- 18 ‹काटेरी झुडपांमध्ये पेरलेले हे आहेत की, ते वचन ऐकून घेतात, ›
- 19 ‹परंतु संसाराची चिंता, संपत्तीचा मोह व इतर गोष्टींचा लोभ ही त्यांच्यामध्ये शिरून वचनाची वाढ खुंटवतात आणि ते निष्फळ होते.›
- 20 ‹चांगल्या जमिनीत पेरलेले हे आहेत की, ते वचन ऐकून त्याचा स्वीकार करतात मग कोणी तीसपट, कोणी साठपट, कोणी शंभरपट असे पीक देतात.”›
- 21 आणखी येशू त्यास म्हणाला, ‹“दिवा मापाखाली किंवा पलंगाखाली ठेवण्यासाठी आणतात काय? दिवठणीवर ठेवावा म्हणून आणतात ना?›
- 22 ‹प्रत्येक गोष्ट जी झाकलेले आहे ती उघड होईल आणि प्रत्येक गुप्त गोष्ट जाहीर होईल.›
- 23 ‹ज्याला कान आहेत तो ऐको.”›
- 24 तो त्यास म्हणाला, ‹“तुम्ही जे काही ऐकता त्याविषयी सावध राहा, ज्या मापाने तुम्ही मापून द्याल त्याच मापाने तुम्हास मापून देण्यात येईल.›
- 25 ‹कारण ज्याच्याजवळ आहे त्यास आणखी दिले जाईल व ज्या कोणाजवळ नाही त्याच्यापासून जे आहे तेही काढून घेतले जाईल.”›
- 26 आणखी तो म्हणाला, ‹“देवाचे राज्य असे आहे की, जणू काय एखादा मनुष्य जमिनीत बी टाकतो.›
- 27 ‹रात्री झोपी जातो व दिवसा उठतो आणि ते बी रुजते व वाढते हे कसे होते हे त्यास कळत नाही.›
- 28 ‹जमीन आपोआप पीक देते, पहिल्याने अंकुर, मग कणीस, मग कणसात भरलेला दाणा.›
- 29 ‹पीक तयार होते तेव्हा तो त्यास लगेच विळा लावतो कारण कापणीची वेळ आलेली असते.”›
- 30 आणखी तो म्हणाला, ‹“आपण देवाच्या राज्याची तुलना कशासोबत करू शकतो किंवा कोणत्या दाखल्यात ते मांडावे?›
- 31 ‹ते मोहरीच्या दाण्यासारखे आहे. जो जमिनीत पेरतेवेळी पृथ्वीवरील सर्व दाण्यात सर्वात लहान असला तरी,›
- 32 ‹तो पेरल्यावर उगवून सर्व झाडांत मोठा होतो. त्यास मोठ्या फांद्या येतात आणि आकाशातील पाखरे त्याच्यावर घरटी बांधू शकतात.”›
- 33 असले पुष्कळ दाखले देऊन, जसे त्यांच्याने ऐकवले तसे, तो त्यांना वचन सांगत असे.
- 34 आणि दाखल्यावाचून तो त्यांच्याबरोबर बोलत नसे. परंतु एकांती तो आपल्या शिष्यांना सर्वकाही समजावून सांगत असे.
- 35 त्यादिवशी संध्याकाळ झाल्यावर येशू त्याच्या शिष्यांस म्हणाला, ‹“आपण पलीकडे जाऊ या.”›
- 36 मग त्यांनी लोकसमुदायाला सोडले आणि तो तारवात होता तसेच ते त्यास घेऊन गेले. त्यांच्याबरोबर इतरही दुसरे तारू होते.
- 37 तेव्हा वाऱ्याचे मोठे वादळ सुटले आणि लाटा तारवावर अशा आदळू लागल्या की, ते पाण्याने भरू लागले.
- 38 परंतु येशू मागच्या बाजूस वरामावर उशास घेऊन झोपी गेला होता. ते त्यास जागे करून म्हणाले, “गुरुजी, आपण बुडत आहोत तरी आपणास काळजी वाटत नाही काय?”
- 39 मग तो उठला आणि त्याने वाऱ्याला धमकावले आणि समुद्राला म्हणाला, ‹“शांत हो! स्तब्ध राहा.”› मग वारा थांबला व तेथे मोठी शांतता पसरली.
- 40 तो त्यांना म्हणाला, ‹“तुम्ही का भिता? तुमच्याकडे अजूनही विश्वास कसा काय नाही?”›
- 41 परंतु ते अतिशय घाबरले आणि एकमेकास म्हणाले, “हा आहे तरी कोण, वारा आणि समुद्रदेखील याचे ऐकतात.” असा हा आहे तरी कोण?