누가복음 1장 마라티 IRV
- 1 ज्या गोष्टींची आम्हास पक्की खातरी आहे त्या गोष्टी जे प्रारंभापासून प्रत्यक्ष पाहाणारे व शब्दाचे सेवक होते,
- 2 त्यांनी त्या जशा आम्हास सोपवून दिल्या त्या तशाच सांगाव्या म्हणून त्यांविषयीचा वृत्तांत अनुक्रमाने लिहून काढण्याचे काम पुष्कळांनी हाती घेतले आहे.
- 3 म्हणून हे थियफिला महाराज, मी सर्व गोष्टींचा मुळापासून चांगला शोध केल्यामुळे मलाही हे बरे वाटले की, या सर्व घटनांविषयीची माहिती आपणाला व्यवस्थित पणे माहिती लिहावी.
- 4 यासाठी की ज्या गोष्टींचे शिक्षण आपल्याला मिळाले आहे त्यांचा निश्चितपणा आपण पूर्णपणे जाणावा.
- 5 यहूदीया प्रांताचा राजा हेरोद याच्या दिवसात, जखऱ्या नावाचा कोणी याजक होता. तो अबीयाच्या याजक घराण्यातील असून त्याची पत्नी अहरोनाच्या वंशातील होती व तिचे नाव अलीशिबा होते.
- 6 ते दोघेही देवापुढे नीतिमान होते आणि प्रभूच्या सर्व आज्ञा व विधीत निर्दोषपणे चालत असत.
- 7 परंतु त्यांना मूल नव्हते कारण अलीशिबा वांझ होती, शिवाय ते दोघेही फार म्हातारे झाले होते.
- 8 मग असे झाले की, तो आपल्या वर्गाच्या अनुक्रमाने देवापुढे त्याचे याजकाचे काम करत असता,
- 9 याजकांच्या रीतीप्रमाणे परमेश्वराच्या भवनात धूप जाळण्यासाठी चिठ्ठ्या टाकून त्याची निवड करण्यात आली.
- 10 आणि लोकांचा सगळा जमाव धूप जाळण्याच्या वेळेस बाहेर प्रार्थना करीत उभा होता.
- 11 तेव्हा परमेश्वराचा दूत, धूपवेदीच्या उजव्या बाजूला उभा असलेला त्याच्या दृष्टीस पडला.
- 12 त्यास पाहून जखऱ्या भयभीत झाला.
- 13 परंतु देवदूत त्यास म्हणाला, जखऱ्या भिऊ नको, कारण तुझी प्रार्थना ऐकण्यात आली आहे आणि तुझी पत्नी अलीशिबा हिच्याकडून तुला पुत्र होईल, तू त्याचे नाव योहान ठेव.
- 14 तेव्हा तुला आनंद व उल्लास होईल आणि त्याच्या जन्माने पुष्कळ लोक हर्षित होतील.
- 15 कारण तो परमेश्वराच्या दृष्टीने महान होईल आणि तो द्राक्षरस किंवा मद्य कधीच पिणार नाही व तो आईच्या गर्भात असतांनाच पवित्र आत्म्याने भरलेला असेल.
- 16 तो इस्राएलाच्या संतानांतील अनेकांना, प्रभू त्यांचा देव याच्याकडे वळविण्यास कारणीभूत ठरेल.
- 17 आणि देवासाठी सिद्ध झालेले असे लोक तयार करायला, वडिलांची अंतःकरणे मुलांकडे आणि आज्ञा न मानणार्यांना नीतिमानांच्या ज्ञानाकडे वळवून प्रभूसाठी तयार केलेली प्रजा उभी करावयाला तो एलीयाच्या आत्म्याने आणि सामर्थ्याने त्यांच्यापुढे चालेल.
- 18 मग जखऱ्या देवदूताला म्हणाला, “हे घडणारच असे मी कशावरुन समजू? कारण मी वृद्ध मनुष्य आहे आणि माझी पत्नीसुद्धा उतारवयात आहे.”
- 19 देवदूताने त्यास उत्तर दिले, “मी देवाच्या पुढे उभा राहणारा गब्रीएल आहे आणि तुझ्याशी बोलायला व तुलाही सुवार्ता सांगायला मला पाठविण्यात आले आहे.
- 20 पाहा, हे घडेपर्यंत तुला बोलता येणार नाही व तू मुका राहशील कारण माझे शब्द जे योग्यवेळी पूर्णपणे खरे ठरणार आहेत त्या माझ्या शब्दांवर तू विश्वास ठेवला नाहीस.”
- 21 तेव्हा जखऱ्याची वाट पाहणाऱ्या लोकांस तो परमेश्वराच्या भवनात इतका वेळ का राहिला याचे आश्चर्य वाटले.
- 22 तो बाहेर आल्यावर त्यास त्यांच्याबरोबर बोलता येईना. तेव्हा त्यांना जाणिव झाली की, परमेश्वराच्या भवनात त्याने दृष्टांत पाहिला आहे. तो त्यांना खुणा करत होता परंतु तो तसाच मुका राहीला.
- 23 मग असे झाले की त्याच्या सेवेचा कालावधी पूर्ण झाल्यावर तो घरी परत गेला.
- 24 त्या दिवसानंतर त्याची पत्नी अलीशिबा गरोदर राहिली व पाच महिने लपून राहिली, ती म्हणाली,
- 25 लोकांमध्ये माझा होणारा अनादर दूर करण्यासाठी प्रभूने माझ्याकडे पाहिले तेव्हा त्याने माझ्यासाठी असे केले.
- 26 अलीशिबेच्या गरोदरपणाच्या सहाव्या महिन्यात देवाने गब्रीएल दूताला गालील प्रांतातील नासरेथ नावाच्या गावी,
- 27 एका कुमारीकडे पाठवले. तिची दाविदाच्या घराण्यातील योसेफ नावाच्या मनुष्याशी मागणी झाली होती आणि त्या कुमारीचे नाव मरीया होते.
- 28 देवदूत तिच्याकडे येऊन म्हणाला, अभिवादन! तुझ्यावर कृपा झालेली आहे. प्रभू तुझ्याबरोबर आहे.
- 29 परंतु ती त्याच्या शब्दाने अस्वस्थ झाली आणि या अभिवादनाचा अर्थ काय असावा याचे ती नवल करू लागली.
- 30 देवदूत तिला म्हणाला, “मरीये, भिऊ नकोस, देवाने तुझ्यावर कृपा केली आहे.
- 31 पाहा! तू गरोदर राहशील आणि तुला मुलगा होईल त्याचे नाव तू येशू ठेव.
- 32 तो महान होईल व त्यास थोर देवाचा पुत्र म्हणतील आणि प्रभू देव त्यास त्याचा पिता दावीद याचे राजासन देईल.
- 33 तो याकोबाच्या घराण्यावर सर्वकाळासाठी राज्य चालवील आणि त्याच्या राज्याचा अंत होणार नाही.”
- 34 तेव्हा मरीया दूताला म्हणाली, हे कसे होईल? कारण मला पुरूष ठाऊक नाही.
- 35 देवदूत तिला म्हणाला, पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि थोर देवाचे सामर्थ्य तुझ्यावर सावली करील आणि म्हणून जे पवित्र बाळ जन्मास येईल, त्यास देवाचा पुत्र म्हणतील.
- 36 बघ, तुझी नातेवाईक अलीशिबा ही सुद्धा म्हातारपणात गरोदर असून तिला पुत्रगर्भ राहीला आहे आणि जिला वांझ म्हणले जाई तिला आता सहावा महिना आहे.
- 37 कारण देवाला कोणतीही गोष्ट अशक्य नाही.
- 38 मरीया म्हणाली, खरोखर “मी प्रभूची दासी आहे, आपल्या म्हणण्याप्रमाणे मला होवो.” मग देवदूत तिच्यापासून निघून गेला.
- 39 त्या दिवसात मरीया उठली आणि घाईने यहूदीया प्रांताच्या डोंगराळ भागातील एका नगरात गेली.
- 40 तिने जखऱ्याच्या घरात प्रवेश केला आणि अलीशिबेला अभिवादन केले.
- 41 जसे मरीयेचे अभिवादन अलीशिबेने ऐकले तिच्या उदरातील बाळाने उडी मारली आणि अलीशिबा पवित्र आत्म्याने भरली.
- 42 ती उंच स्वर काढून मोठ्याने म्हणाली, “स्त्रियांमध्ये तू धन्यवादित आहेस आणि तुझ्या पोटचे फळ धन्य आहे.
- 43 माझ्या प्रभूच्या मातेने मजकडे यावे हा मान मला कोठून?”
- 44 जेव्हा तुझ्या अभिवादनाची वाणी माझ्या कानी पडली, तेव्हा माझ्या उदरातील बाळाने आनंदाने उडी मारली
- 45 जिने विश्वास ठेवला ती धन्य आहे, कारण ज्या गोष्टी प्रभूने तिला सांगितल्या त्याची पूर्णता होईल?
- 46 मरीया म्हणाली, “माझा जीव प्रभूला थोर मानतो,
- 47 आणि देव जो माझा तारणारा याच्या ठायी माझा आत्मा आनंदीत झाला आहे.
- 48 कारण त्याने आपल्या दासीची दैन्य अवस्था पाहीली. आतापासून मला सर्व पिढ्या धन्य म्हणतील.
- 49 कारण जो सर्वसमर्थ आहे त्याने माझ्यासाठी मोठी कामे केली आहेत; आणि त्याचे नाव पवित्र आहे.
- 50 जे त्याचे भय धरतात त्यांच्यावर त्याची दया पिढ्यानपिढ्या आहे
- 51 त्याने त्याच्या हाताने सामर्थ्याची कार्ये केली आहेत; जे गर्विष्ठ अंतःकरणाचे आहेत त्यांची त्याने पांगापांग केली आहे.
- 52 त्याने राज्य करणाऱ्यांना त्यांच्या राजासनांवरून ओढून काढले आहे आणि गरीबास उंचावले आहे.
- 53 त्याने भूकेल्यास चांगल्या पदार्थांने तृप्त केले आहे. आणि धनवानास रिकाम्या हाताने परत पाठवले आहे.
- 54 दयेपोटी त्याने आपला सेवक इस्राएल याला साहाय्य केले आहे.
- 55 आपल्या पूर्वजास त्याने सांगितल्याप्रमाणे अब्राहाम व त्याचे संतान यांच्यावरील दया सर्वकाळ स्मरण करावी. त्याने आपला सेवक इस्राएल याला साहाय्य केले आहे.”
- 56 अलीशिबेबरोबर तीन महीने राहिल्यानंतर मरीया आपल्या घरी परत गेली.
- 57 अलीशिबेची प्रसूतीची वेळ आल्यावर, तिने एका मुलास जन्म दिला.
- 58 प्रभूने तिच्यावर मोठी दया केली आहे, हे तिच्या शेजाऱ्यांनी व नातेवाईकांनी ऐकले आणि ते तिच्या आनंदात सहभागी झाले.
- 59 मग असे झाले की, आठव्या दिवशी मुलाची सुंता करण्यासाठी ते आले असता, त्याच्या पित्याच्या नावाप्रमाणे ते बाळाचे नाव देखील जखऱ्या ठेवणार होते.
- 60 परंतु त्याच्या आईने उत्तर दिले, नाही त्याऐवजी त्याचे नाव योहान ठेवायचे आहे.
- 61 ते तिला म्हणाले, तुझ्या नातलगात या नावाचा कोणीच नाही.
- 62 नंतर त्यांनी त्याच्या वडिलांना हातवारे करून विचारले, याचे नाव काय ठेवावे, अशी तुझी इच्छा आहे
- 63 तेव्हा त्याने लिहिण्यासाठी पाटी मागितली आणि, त्याचे नाव योहान आहे, असे लिहीले यावरुन त्या सर्वांना खूपच आश्चर्य वाटले.
- 64 त्याच क्षणी त्याचे तोंड उघडले व त्याची जीभ मोकळी झाली आणि तो बोलू लागला व देवाला धन्यवाद देऊ लागला.
- 65 तेव्हा सर्व शेजारी भयभीत झाले आणि यहूदीया प्रांताच्या सर्व डोंगराळ प्रदेशात लोक या सर्व गोष्टींबद्दल बोलू लागले.
- 66 जे कोणी हे ऐकले ते प्रत्येकजण मनात विचार करत होते, ते म्हणाले, हे मूल पुढे कोण होणार आहे? प्रभू त्याच्याबरोबर आहे असे त्यांच्या लक्षात आले.
- 67 त्याचा पिता जखऱ्या पवित्र आत्म्याने भरला आणि त्यानेही भविष्यवाणी केली; तो म्हणाला,
- 68 “इस्राएलाचा देव प्रभू, ह्याची स्तुती असो, कारण त्याने आपल्या लोकांची भेट घेतली आणि लोकांची खंडणी भरून सुटका केली.
- 69 त्याने आपला सेवक दावीद याच्या घराण्यातून आमच्यासाठी सामर्थ्यशाली तारणारा दिला आहे.
- 70 हे देवाने त्याच्या पवित्र संदेष्ट्यांद्वारे युगाच्या प्रारंभापासून सांगितले होते.
- 71 जे आमचे शत्रू आहेत व जे आमचा द्वेष करतात त्यांच्यापासून सुटका करण्याचे अभिवचन त्याने आम्हास दिले.
- 72 आमच्या पूर्वजांवर दया दाखविण्यासाठी तो हे करणार आहे व आपल्या पवित्र कराराची आठवण ठेवणार आहे,
- 73 हा करार एक शपथ होती जी त्याने आमचा पूर्वज अब्राहामाला वाहिली.
- 74 ती अशी की, तुम्ही आपल्या शत्रूच्या हातातून सोडवले जाऊन,
- 75 माझ्यासमोर पवित्रतेने व नीतिमत्त्वाने आयुष्यभर माझी सेवा निर्भयपणे कराल, असे मी करीन.
- 76 हे बालका, तुला परात्पराचा संदेष्टा म्हणतील कारण प्रभूचे मार्ग सिद्ध करण्याकरीता तू त्यांच्यापुढे चालशील.
- 77 यासाठी की, त्याच्या लोकांस त्यांच्या पापांच्या क्षमेने तारणाचा अनुभव द्यावा.
- 78 देवाच्या दयेमुळे स्वर्गीय दिवसाची पहाट उजाडेल व मरणाच्या दाट छायेत जे जगत आहेत त्यांच्यावर प्रकाशेल.
- 79 तिच्याकडून जे अंधारात आहेत व मृत्युच्या छायेत बसले आहेत त्यांना प्रकाश देण्यासाठी आणि आमचे पाय शांतीच्या मार्गास लावण्यासाठी दिवसाचा उदय करून आमची भेट घेईल.”
- 80 मग तो मुलगा वाढत गेला आणि आत्म्यात सामर्थ्यशाली झाला. इस्राएल लोकांस प्रकट होण्याच्या दिवसापर्यंत तो अरण्यात राहिला.