누가복음 24장 마라티 IRV
- 1 आठवड्याच्या पहिल्या दिवशी त्या स्त्रिया अगदी पहाटेस कबरेकडे आल्या आणि त्यांनी स्वतः तयार केलेले सुगंधी मसाले आणले.
- 2 त्यांना धोंड कबरेवरुन लोटलेला आढळला.
- 3 त्या आत गेल्या, परंतु त्यांना प्रभू येशूचे शरीर सापडले नाही.
- 4 यामुळे त्या अवाक झाल्या असतानाच, अचानक लखलखीत कपडे घातलेले दोन पुरूष त्यांच्या बाजूला उभे राहिले.
- 5 तेव्हा अतिशय भयभीत होऊन त्यांनी आपले चेहरे जमिनीकडे केली असता ते त्यांना म्हणाले, जो जिवंत आहे त्याचा शोध तुम्ही मरण पावलेल्यांमध्ये का करता?
- 6 तो येथे नाही; तो उठला आहे! तो गालील प्रांतात असताना त्याने तुम्हास काय सांगितले याची आठवण करा.
- 7 ते असे की, ‹“मनुष्याच्या पुत्राला धरुन पापी लोकांच्या हाती द्यावे, त्यास वधस्तंभावर खिळावे आणि तिसऱ्या दिवशी त्याने उठावे.”›
- 8 नंतर स्त्रियांना येशूच्या शब्दाची आठवण झाली.
- 9 त्या कबरेपासून परतल्या आणि त्यांनी या सर्व गोष्टींचे वर्तमान अकरा प्रेषितांना व इतर सर्वांना सांगितले.
- 10 त्या स्त्रिया मग्दालीया नगराची मरीया, योहान्ना आणि याकोबाची आई मरीया या होत्या. त्या आणि इतर स्त्रियांसुद्धा ज्या त्यांच्याबरोबर होत्या, प्रेषितांना या गोष्टी सांगत होत्या.
- 11 पण प्रेषितांना त्यांचे सांगणे मूर्खपणाचे वाटले आणि त्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही.
- 12 पण पेत्र उठला आणि कबरेकडे पळाला. त्याने खाली वाकून पाहिले पण त्यास तागाच्या गुंडाळण्याच्या वस्त्राशिवाय काही आढळले नाही. जे घडले त्याविषयी तो स्वतःशीच आश्चर्य करीत दूर गेला.
- 13 त्याच दिवशी त्याच्यातील दोघे शिष्य यरूशलेम शहरापासून सुमारे अकरा किलोमीटर अंतरावर असलेल्या अम्माऊस नावाच्या गावाला चालले होते.
- 14 ते एकमेकांशी या घडलेल्या सर्व गोष्टीविषयी बोलत होते.
- 15 ते बोलत असताना आणि या गोष्टींची चर्चा करीत असताना येशू स्वतः आला आणि त्यांच्याबरोबर चालू लागला.
- 16 पण त्यांचे डोळे त्यास ओळखण्यापासून बंद करण्यात आले होते.
- 17 येशू त्यांना म्हणाला, ‹“चालत असताना तुम्ही एकमेकांबरोबर बोलत आहात त्या गोष्टी कोणत्या आहेत?”› चालता चालता ते थांबले. ते अतिशय दुःखी दिसले.
- 18 त्यांच्यातील एकजण ज्याचे नाव क्लयपा होते, तो त्यास म्हणाला, “या दिवसांमध्ये घडलेल्या गोष्टी माहीत नसलेले असे यरूशलेम शहरात राहणारे तुम्ही एकटेच आहात काय?”
- 19 येशू त्यांना म्हणाला, ‹“तुमच्या मते कोणत्या गोष्टी?”› ते त्यास म्हणाले, “नासरेथकर येशूविषयीच्या सर्व गोष्टी. हाच तो मनुष्य जो आपल्या कृत्यांनी आणि शब्दांनी देवासमोर आणि मनुष्यांसमोर एक महान संदेष्टा झाला.
- 20 आणि आम्ही चर्चा करीत होतो की, कसे आमच्या मुख्य याजकांनी आणि अधिकाऱ्यांनी त्यास मरणदंड भोगण्यासाठी स्वाधीन केले आणि त्यांनी त्यास वधस्तंभी खिळले.
- 21 आम्ही अशी आशा केली होती की, तोच एक आहे जो इस्राएलाची मुक्तता करील आणि या सगळ्याशिवाय हे सर्व घडून गेलेल्या गोष्टीला आज तीन दिवस झालेत.
- 22 आणि आमच्या परिवारातील काही स्त्रियांनी आम्हास आश्चर्यचकित केले आहे. आज अगदी पहाटे त्या कबरेकडे गेल्या,
- 23 परंतु त्यांना त्याचे शरीर सापडले नाही. त्यांनी येऊन आम्हास सांगितले की, त्यांना देवदूतांचे दर्शन झाले आणि देवदूतांनी सांगितले की, तो जिवंत आहे.
- 24 तेव्हा आमच्यातील काही कबरेकडे गेले आणि स्त्रियांनी जसे सांगितले होते, तसेच त्यांना आढळले, पण त्यांनी त्यास पाहिले नाही.”
- 25 मग येशू त्यांना म्हणाला, ‹“संदेष्ट्यांनी सांगितलेल्या सर्व गोष्टींवर विश्वास ठेवण्यास तुम्ही अति मूर्ख आणि मंद आहात.›
- 26 ‹ख्रिस्तासाठी या सर्व गोष्टी सहन करणे आणि त्याच्या गौरवात जाणे आवश्यक नव्हते काय?”›
- 27 आणि म्हणून त्याने मोशेपासून सुरुवात करून आणि सर्व संदेष्टयापर्यंत सांगून, शास्त्रलेखात त्याच्याविषयी काय लिहिले आहे ते सर्व त्याने त्यांना स्पष्ट करून सांगितले.
- 28 ज्या खेड्याकडे ते जात होते, त्याच्याजवळ ते आले आणि येशूने असा बहाणा केला की, जणू काय तो पुढे जाणार आहे.
- 29 परंतु जास्त आग्रह करून ते म्हणाले, “आमच्याबरोबर राहा कारण संध्याकाळ झालीच आहे आणि दिवसही मावळला आहे.” मग तो त्यांच्याबरोबर रहावयास आत गेला.
- 30 जेव्हा तो त्यांच्याबरोबर जेवायला मेजासभोवती बसला, त्याने भाकर घेतली आणि उपकार मानले. नंतर त्याने ती मोडली व ती त्यांना तो देऊ लागला.
- 31 तेव्हा त्यांचे डोळे उघडले आणि त्यांनी त्यास ओळखले. पण तो त्यांच्यातून अदृश्य झाला.
- 32 मग ते एकमेकांना म्हणू लागले, “तो वाटेवर आपणाशी बोलत असताना व शास्त्रलेखाचा उलगडा करीत होता तेव्हा आपल्या अंतःकरणाला आतल्या आत उकळी येत नव्हती काय?”
- 33 मग ते लगेच उठले व यरूशलेम शहरास परत गेले. तेव्हा त्यांना अकरा प्रेषित व त्यांच्याबरोबर असलेले इतर एकत्र जमलेले आढळले.
- 34 प्रेषित आणि इतरजण म्हणाले, “खरोखर प्रभू उठला आहे! आणि शिमोनाला दिसला आहे.”
- 35 नंतर त्या दोन शिष्यांनी वाटेत काय घडले ते त्यांना सांगितले आणि तो भाकर मोडत असताना त्यांनी त्यास कसे ओळखले ते सांगितले.
- 36 ते या गोष्टी त्यांना सांगत असतानाच येशू त्यांच्यामध्ये उभा राहिला आणि त्यास म्हणाला, ‹“तुम्हास शांती असो.”›
- 37 ते दचकले आणि भयभीत झाले. त्यांना असे वाटले की, ते भूत पाहत आहेत.
- 38 तो त्यांना म्हणाला, ‹“तुम्ही असे अस्वस्थ का झालात? तुमच्या मनात शंका का निर्माण झाल्या?›
- 39 ‹माझे हात व पाय पाहा तुम्हास मी दिसतो तोच मी आहे. मला स्पर्श करा आणि पाहा की, मला आहे तसे हाडमांस भूताला नसते.”›
- 40 असे बोलून त्याने त्यास आपले हातपाय दाखवले. तरीही त्यांच्या आनंदामुळे त्यांना ते खरे वाटेना.
- 41 तरी आनंदामुळे विश्वास न धरता आश्चर्यचकित झाले तेव्हा येशू त्यांना म्हणाला, ‹“येथे तुमच्याजवळ खाण्यासाठी काय आहे?”›
- 42 मग त्यांनी त्यास भाजलेला माशाचा तुकडा दिला.
- 43 त्याने तो घेतला व त्यांच्यासमोर खाल्ला.
- 44 तो त्यांना म्हणाला, ‹“याच त्या गोष्टी ज्या मी तुम्हाबरोबर असताना सांगितल्या होत्या की, मोशेचे नियमशास्त्र, संदेष्टे आणि स्तोत्रे यामध्ये माझ्याविषयी जे सांगितले आहे ते सर्व पूर्ण झालेच पाहिजे.”›
- 45 नंतर शास्त्रलेख समजण्यासाठी त्याने त्यांची मने उघडली.
- 46 मग तो त्यांना म्हणाला, ‹“पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, ख्रिस्ताने दुःख भोगावे आणि मरण पावलेल्यातून तिसऱ्या दिवशी उठावे, ›
- 47 ‹आणि यरूशलेम शहरापासून आरंभ करून सर्व राष्ट्रास त्याच्या नावाने पश्चात्ताप व पापांची क्षमा घोषित करण्यात यावी.›
- 48 ‹या गोष्टींचे तुम्ही साक्षी आहात.›
- 49 ‹पाहा, माझ्या पित्याने देऊ केलेली देणगी मी तुमच्याकडे पाठवतो; तुम्ही स्वर्गीय सामर्थ्याने युक्त व्हाल तोपर्यंत या शहरात राहा.”›
- 50 नंतर तो त्यांना बाहेर दूरवर बेथानीपर्यंत घेऊन गेला आणि त्याने हात वर करून आशीर्वाद दिला.
- 51 तो आशीर्वाद देत असतानाच तोपर्यंत आकाशात घेतला गेला.
- 52 नंतर त्यांनी त्याची उपासना केली व ते मोठ्या आनंदाने यरूशलेम शहरास परतले.
- 53 आणि ते परमेश्वराच्या भवनात देवाचा धन्यवाद सतत करत राहिले.