요한복음 13장 마라티 IRV
- 1 आता, वल्हांडण सणाअगोदर असे झाले की, येशूने आता या जगांतून पित्याकडे निघून जाण्याची वेळ आली आहे, हे जाणून, या जगातील स्वकीयांवर त्याची जी प्रीती होती, ती त्याने शेवटपर्यंत केली.
- 2 शिमोनाचा पुत्र यहूदा इस्कार्योत याच्या मनात येशूला विश्वासघाताने शत्रूच्या हाती द्यावे असे सैतानाने आधीच घातले होते.
- 3 येशू जाणत होता की, पित्याने त्याच्या हातात सर्व दिले होते आणि तो देवाकडून आला होता व देवाकडे जात होता;
- 4 येशू भोजनावरून उठला, त्याने आपली बाह्यवस्त्रे एकीकडे ठेवली आणि एक कापड घेऊन आपल्या कमरेला बांधला.
- 5 त्यानंतर येशू एका गंगाळात पाणी ओतून आणि तो शिष्यांचे पाय धुऊ लागला व कमरेला बांधलेल्या कापडाने पुसू लागला.
- 6 मग तो शिमोन पेत्राकडे आला, तेव्हा तो त्यास म्हणाला, “प्रभूजी, आपण माझे पाय धुता काय?”
- 7 येशूने त्यास उत्तर दिले, ‹“मी काय करतो ते तुला आता कळत नाही, पण ते तुला पुढे कळेल.”›
- 8 पेत्र त्यास म्हणाला, “तुम्हास माझे पाय कधीही धुवावयाचे नाहीत.” येशूने त्यास उत्तर दिले, ‹“मी तुला धुतले नाही, तर तुला माझ्याबरोबर वाटा नाही.”›
- 9 शिमोन पेत्र त्यास म्हणाला, “प्रभूजी, माझे केवळ पायच धुऊ नका, तर हात आणि डोकेही धुवा.”
- 10 येशूने त्यास म्हटले, ‹“ज्याचे स्नान झाले आहे त्यास पायांशिवाय दुसरे काही धुवायची गरज नाही, तर तो सर्वांगी शुद्ध आहे; तुम्ही शुद्ध आहा, पण सगळे जण नाही.”›
- 11 कारण आपणाला विश्वासघाताने शत्रूच्या हाती कोण धरून देणार आहे हे त्यास ठाऊक होते, म्हणून तो म्हणाला, ‹“तुम्ही सगळे जण शुद्ध नाही.”›
- 12 मग त्याने त्यांचे पाय धुतल्यावर आपली बाह्यवस्त्रे घालून व तो पुन्हा खाली बसल्यावर त्यांना म्हणाला, ‹“मी तुम्हास काय केले ते तुम्हास समजले काय?›
- 13 ‹तुम्ही मला ‘गुरू’ आणि ‘प्रभू’ म्हणता आणि ते ठीक म्हणता, कारण मी तसाच आहे.›
- 14 ‹मग मी जर तुमचा प्रभू आणि गुरू असता तुमचे पाय धुतले तर तुम्हीपण एकमेकांचे पाय धुवावेत.›
- 15 ‹कारण मी तुम्हास केले तसे तुम्हीही करावे म्हणून मी तुम्हास उदाहरण दिले आहे.›
- 16 ‹मी तुम्हास खरे खरे सांगतो, दास आपल्या धन्यापेक्षा मोठा नाही; आणि पाठवलेला पाठवणाऱ्यापेक्षा मोठा नाही.›
- 17 ‹या गोष्टी तुम्हास समजतात तर त्याप्रमाणे वागल्याने तर तुम्ही धन्य आहात.›
- 18 ‹मी तुमच्यातील सर्वांविषयी बोलत नाही. मी ज्यांना निवडले आहे त्यांना मी ओळखतो. तरी, ‘ज्याने माझी भाकर खाल्ली त्यानेच माझ्याविरुद्ध आपली टाच उचलली,’ हा शास्त्रलेख पूर्ण झाला पाहिजे.›
- 19 ‹आतापासून हे होण्याच्या आधीच मी हे तुम्हास सांगून ठेवतो, यासाठी की जेव्हा हे होईल, तेव्हा तुम्ही विश्वास ठेवावा की, मी तो आहे.›
- 20 ‹मी तुम्हास खरे खरे सांगतो की, मी ज्याला पाठवतो त्याचा जो स्वीकार करतो तो माझा स्वीकार करतो आणि जो मला स्वीकारतो तो ज्याने मला पाठवले त्यास स्वीकारतो.”›
- 21 असे बोलल्यावर येशू आत्म्यात अस्वस्थ झाला आणि साक्ष देऊन म्हणाला, ‹“मी तुम्हास खरे खरे सांगतो, तुमच्यांतला एकजण मला विश्वासघात करून शत्रूच्या हाती धरून देईल.”›
- 22 तो कोणाविषयी बोलतो या संशयाने शिष्य एकमेकांकडे पाहू लागले.
- 23 तेव्हा ज्याच्यावर येशूची प्रीती होती असा त्याच्या शिष्यांतील एकजण येशूच्या उराशी टेकलेला होता.
- 24 म्हणून ज्याच्याविषयी तो बोलतो तो कोण आहे हे आम्हास सांग, असे शिमोन पेत्राने त्यास खुणावून म्हटले.
- 25 तेव्हा तो तसाच येशूच्या उराशी टेकलेला असता त्यास म्हणाला, “प्रभूजी, तो कोण आहे?”
- 26 येशूने उत्तर दिले, ‹“मी ज्याला हा घास ताटात बुचकळून देईन, तोच तो आहे.”› आणि त्याने तो घास ताटात बुचकळून, तो शिमोनाचा पुत्र यहूदा इस्कार्योत याला दिला.
- 27 आणि घास दिल्याबरोबर सैतान त्यांच्यामध्ये शिरला. मग येशूने त्यास म्हटले, ‹“तुला जे करावयाचे आहे ते लवकर करून टाक.”›
- 28 पण त्याने त्यास असे कशासाठी सांगितले हे भोजनास बसलेल्यातील कोणालाही समजले नाही.
- 29 कारण यहूदाजवळ डबी होती म्हणून सणासाठी आपणांस गरज आहे ते विकत घ्यावे किंवा गरिबांस काहीतरी द्यावे असे येशू सांगतो आहे, असे कित्येकांस वाटले.
- 30 मग घास घेतल्यावर तो लगेच बाहेर गेला; त्यावेळी रात्र होती.
- 31 तो बाहेर गेल्यावर येशू म्हणाला, ‹“आता मनुष्याच्या पुत्राचे गौरव झाले आहे आणि त्याच्याठायी देवाचे गौरव झाले आहे;›
- 32 ‹देव आपल्याठायी त्याचे गौरव करील. तो त्याचे लवकर गौरव करील.›
- 33 ‹मुलांनो, मी अजून थोडा वेळ तुमच्याबरोबर आहे; तुम्ही माझा शोध कराल; आणि मी यहूदी अधिकाऱ्यांना सांगितले की, ‘मी जाईन तिकडे तुम्हास येता येणार नाही.’ तसे तुम्हासही आता सांगतो.›
- 34 ‹मी एक नवी आज्ञा तुम्हास देतो; तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी. जशी मी तुमच्यावर प्रीती केली तशी तुम्हीही एकमेकांवर प्रीती करावी.›
- 35 ‹तुमची एकमेकांवर प्रीती असली म्हणजे यावरुन सर्व ओळखतील की, तुम्ही माझे शिष्य आहात.”›
- 36 शिमोन पेत्र त्यास म्हणाला, “प्रभूजी, आपण कोठे जाता?” येशूने त्यास उत्तर दिले, ‹“मी जाईन तिकडे, आता, तुला माझ्यामागे येता येणार नाही; पण नंतर तू येशील.”›
- 37 पेत्र त्यास म्हणाला, “प्रभूजी, मला आपल्यामागे आताच का येता येणार नाही? मी आपल्यासाठी माझा जीव देईन.”
- 38 येशूने त्यास उत्तर दिले, ‹“माझ्यासाठी तू आपला जीव देशील काय? मी तुला खरे खरे सांगतों, तू मला तीनदा नाकारशील तोपर्यंत कोंबडा आरवणार नाही.”›