사도행전 24장 마라티 IRV
- 1 पाच दिवसानंतर महायाजक हनन्या, काही वडील आणि तिर्तुल्ल नावाचा कोणीएक वकील हे खाली आले; आणि त्यांनी सुभेदारापुढे पौलाविरुद्ध फिर्याद केली.
- 2 जेव्हा पौल शासकासमोर उभा राहिला तेव्हा तिर्तुल्ल त्याच्यावर दोषारोप ठेवून म्हणाला, “फेलिक्स महाराज, आपल्यामुळे आम्हास फार शांतता मिळाली आहे आणि आपल्या दूरदर्शीपणामुळे या राष्ट्रात सुधारणा होत आहेत.
- 3 म्हणून त्यांचे आम्ही पूर्ण कृतज्ञतेने, सर्व प्रकारे व सर्वत्र स्वागत करतो.
- 4 तरी आपला अधिक वेळ न घेता मी विनंती करतो की, मेहरबानी करून आमचे थोडक्यात ऐकावे.
- 5 हा मनुष्य म्हणजे एक पिडा आहे असे आम्हास आढळून आले आहे आणि जगातल्या सर्व यहूदी लोकात हा बंड उठवणारा असून नासोरी पंथाचा पुढारी आहे.
- 6 ह्याने परमेश्वराचे भवनही विटाळण्याचा प्रयत्न केला; त्यास आम्ही धरले; व आमच्या नियमाशास्त्राप्रमाणे याचा न्याय करण्यास आम्ही पाहत होतो.
- 7 पण लुसिया सरदाराने येऊन मोठ्या जबरदस्तीने ह्याला आमच्या हातातून काढून नेले.
- 8 आणि याची चौकशी आपण कराल तर ज्या गोष्टींचा दोषारोप आम्ही त्याच्यावर करतो त्या सर्वांविषयी त्याच्याकडूनच आपणाला समजेल.”
- 9 तेव्हा या सर्व गोष्टी अशाच आहेत, असे म्हणून दुसऱ्या यहूद्यांनी ही दुजोरा दिला.
- 10 मग सुभेदाराने बोलण्यास खुणविल्यावर पौलाने उत्तर दिले, “आपण पुष्कळ वर्षापासून या लोकांचे न्यायाधीश आहात हे मला ठाऊक आहे, म्हणून मी आपल्यासंबंधीच्या गोष्टीचे संतोषाने समर्थन करतो.
- 11 आपल्याला पूर्णपणे कळून येईल की, मला यरूशलेम शहरात उपासना करायला जाऊन अजून बारापेक्षा अधिक दिवस झाले नाहीत.
- 12 आणि परमेश्वराच्या भवनात, सभास्थानात किंवा नगरात कोणाबरोबर वादविवाद करतांना किंवा बंडाळी माजवतांना मी त्यांना आढळलो नाही.
- 13 ज्या गोष्टींचा दोषारोप ते माझ्यावर आता करत आहेत, त्या गोष्टी त्यांना आपणापुढे शाबीत करता येत नाहीत.
- 14 तरी मी आपणाजवळ इतके कबूल करतो की, ज्या मार्गाला ते पाखंड म्हणतात त्या मार्गाप्रमाणे जे जे नियमशास्त्रानुसार आहे व जे जे संदेष्ट्यांच्या लेखांत आहे त्या सर्वांवर विश्वास ठेवून मी पूर्वजांच्या देवाची सेवा करतो.
- 15 आणि नीतिमानांचे व अनीतिमानांचे पुनरुत्थान होईल, अशी जी आशा धरतात तीच आशा मी देवाकडे पाहून धरतो.
- 16 ह्यामुळे देवासंबंधाने व मनुष्यांसंबंधाने माझा विवेकभाव सतत शुद्ध राखण्याचा मी यत्न करत असतो.
- 17 मी पुष्कळ वर्षांनी आपल्या लोकांस दानधर्म करण्यास व यज्ञार्पणे वाहण्यास आलो.
- 18 शुद्धीकरणाच्या विधीत मी व्रतस्थ असा परमेश्वराच्या भवनात आढळलो, माझ्याबरोबर लोकांचा घोळका नव्हता किंवा दंगा होत नव्हता; पण तेथे आशिया प्रांतातले कित्येक यहूदी होते.
- 19 त्यांचे माझ्याविरूद्ध काही असते तर त्यांनी आपणा पूढे येऊन माझ्यावर दोषारोप करायचा होता.
- 20 किंवा मी न्यायसभेपूढे उभा राहीलो असता माझा कोणता अपराध ह्यांना दिसून आला ते ह्यांनी तरी सांगावे;
- 21 ह्यांच्यामध्ये उभे राहून, मरण पावलेल्यांचा पुनरुत्थानाविषयी माझा न्याय आज तुमच्यापुढे होत आहे, हे शब्द मी मोठ्याने बोललो, हा एवढा उद्गार अपराध असला तर असेल.”
- 22 फेलिक्सास त्या मार्गाची चांगली माहीती असल्यामुळे त्याने खटला तहकूब करून म्हटले, “लुसीयाचा सरदार येईल तेव्हा तुमच्या प्रकरणाचा निकाल करीन.”
- 23 आणि त्याने शताधिपतीला हुकुम केला की, ह्याला पहाऱ्यात ठेवावे; तरी ह्याला मोकळीक असावी आणि ह्याच्या स्वकीयांना याची सेवा करण्यास मनाई नसावी.
- 24 मग काही दिवसानंतर फेलिक्स आपली यहूदी पत्नी द्रुसिल्ला हिच्यासह आला व त्याने पौलाला बोलावून ख्रिस्त येशूवरील विश्वासाविषयी त्याच्यापासून ऐकून घेतले.
- 25 तेव्हा नीतिमत्त्व, इंद्रियदमन व पुढे होणारा न्याय ह्यांविषयी तो भाषण करत असता, फेलिक्साने भयभीत होऊन म्हटले, “आता जा, संधी सापडली म्हणजे तुला बोलावीन.”
- 26 आणखी आपणास पौलाकडून पैसे मिळतील अशी आशाही त्यास होती, म्हणून तो त्यास पुनःपुन्हा बोलावून घेवून त्याच्याबरोबर संभाषण करत असे.
- 27 पुढे दोन वर्षांनंतर फेलिक्साच्या जागेवर पुर्क्य फेस्त हा आला; तेव्हा यहूद्यांची मर्जी संपादन करण्याच्या इच्छेने फेलिक्स पौलाला कैदेतच ठेवून गेला.