로마서 5장 마라티 IRV
- 1 आता आपण विश्वासाने नीतिमान ठरवले गेलो आहोत म्हणून आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे देवाबरोबर शांती आहे.
- 2 आपण उभे आहोत त्या कृपेतही त्याच्याद्वारे विश्वासाने आपल्याला प्रवेश मिळाला आहे व आपण देवाच्या गौरवाच्या आशेत अभिमान मिरवतो.
- 3 आणि इतकेच नाही तर आपण संकटांतही अभिमान मिरवतो; कारण आपण जाणतो की संकट धीर उत्पन्न करते,
- 4 आणि धीर प्रचीती व प्रचीती आशा उत्पन्न करते.
- 5 आणि आशा लज्जित करीत नाही; कारण आपल्या अंतःकरणात आपल्याला दिलेल्या पवित्र आत्म्याच्याद्वारे देवाची प्रीती ओतली जात आहे.
- 6 कारण आपण दुर्बळ असतानाच ख्रिस्त यथाकाळी अभक्तांसाठी मरण पावला.
- 7 कारण एखाद्या नीतिमान मनुष्यासाठी क्वचित कोणी मनुष्य मरेल कारण एखाद्या चांगल्या मनुष्यासाठी कदाचीत कोणी मरण्याचेही धाडस करील,
- 8 पण आपण पापी असताना ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावला, ह्यात देव त्याची आपल्यावरील प्रीती प्रस्थापित करतो.
- 9 मग आता आपण त्याच्या रक्ताने नीतिमान ठरवले गेलो आहोत, तर त्याहून अधिक हे आहे की त्याच्याद्वारे आपण देवाच्या क्रोधापासून तारले जाऊ.
- 10 कारण आपण वैरी होतो, तेव्हा जर आपला देवाबरोबर, त्याच्या पुत्राच्या मरणाने समेट केला गेला, तर त्याहून अधिक हे आहे की, आपला समेट केला गेल्यामुळे त्याच्या जीवनाने आपण निश्चित तारले जाऊ.
- 11 इतकेच नाही, पण आता ज्याच्या द्वारे आपण समेट स्वीकारला आहे तो आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे आपण देवाच्या ठायी अभिमान मिरवतो.
- 12 म्हणून एका मनुष्याद्वारे जगात पाप आले व पापाद्वारे मरण आले आणि सर्वांनी पाप केल्यामुळे सर्व मनुष्यांवर मरण आले.
- 13 करण नियमशास्त्रापुर्वी जगात पाप होते, पण नियमशास्त्र नसतेवेळी पाप हिशोबात येत नाही.
- 14 तरी मरणाने आदामापासून मोशेपर्यंत राज्य केले; आदामाच्या उल्लंघनाच्या रूपाप्रमाणे ज्यांनी पाप केले नव्हते त्यांच्यावरही राज्य केले आणि तो तर जो पुढे येणार होता त्याचा नमुना होता.
- 15 पण अपराधाची गोष्ट आहे तशी कृपादानाची नाही; कारण एकाच्या अपराधामुळे जर पुष्कळ मरण पावले, तर त्याहून अधिक हे आहे की, देवाची कृपा व येशू ख्रिस्त या एका मनुष्याच्या कृपेची देणगी पुष्कळांसाठी विपुल झाली.
- 16 आणि पाप करणार्या एकामुळे जसा परिणाम झाला, तशी देणगीची गोष्ट नाही; कारण एका अपराधामुळे दंडाज्ञेसाठी न्याय आला, पण अनेक अपराधांमुळे निर्दोषीकरणासाठी कृपादान आले.
- 17 कारण मरणाने, एका अपराधामुळे, एकाच्या द्वारे राज्य केले, तर त्याहून अधिक हे आहे की, जे कृपेची व नीतिमत्त्वाच्या देणगीची विपुलता स्वीकारतात, ते त्या एकाच्या, म्हणजे येशू ख्रिस्ताच्या द्वारे जीवनात राज्य करतील.
- 18 म्हणून जसे एकाच अपराधामुळे सर्व मनुष्यांना दंडाज्ञा ठरविण्यास कारण झाले, तसे एकाच निर्दोषीकरणामुळे सर्व मनुष्यांना जीवनासाठी नीतिमान ठरविण्यास कारण झाले.
- 19 कारण जसे एकाच्या आज्ञाभंगामुळे अनेक जण पापी ठरवले गेले, तसे एकाच्या आज्ञापालनामुळे अनेक जण नीतिमान ठरवले जातील.
- 20 शिवाय, अपराध वाढावा म्हणून नियमशास्त्र आत आले. पण जेथे पाप वाढले तेथे कृपा अधिक विपुल झाली.
- 21 म्हणजे, जसे पापाने मरणाच्या योगे राज्य चालविले तसे कृपेने नीतिमत्त्वाच्या योगे प्राप्त होणार्या सार्वकालिक जीवनासाठी आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे राज्य चालवावे.