고린도전서 12장 마라티 IRV
- 1 बंधूनो आत्मिक दानांविषयी, तुम्ही अज्ञानी असावे अशी माझी इच्छा नाही.
- 2 जेव्हा तुम्ही परराष्ट्रीय होता, तेव्हा जसे चालवले जात होता तसे तुम्ही या मुक्या मूर्तींकडे नेले जात होता. हे तुम्हास ठाऊक आहे.
- 3 म्हणून मी तुम्हास सांगत आहे की, देवाच्या आत्म्याने बोलणारा कोणीही मनुष्य असे म्हणत नाही की, “येशू शापित असो.” आणि पवित्र आत्म्याशिवाय कोणीही “येशू प्रभू आहे,” असे म्हणू शकत नाही.
- 4 आता कृपादानांचे निरनिराळे प्रकार आहेत, पण आत्मा एकच आहे.
- 5 तसेच सेवा करण्याचे निरनिराळे प्रकार आहेत, पण प्रभू एकच आहे.
- 6 आणि कार्यांचे निरनिराळे प्रकार आहेत पण सर्वात सर्व कार्ये करणारा तो देव एकच आहे.
- 7 पण आत्म्याचे प्रकटीकरण हे सर्वांस उपयोगी होण्यास एकेकाला दिले आहे.
- 8 कारण एकाला आत्म्याच्याद्वारे ज्ञानाचे वचन मिळते, आणखी एकाला त्याच आत्म्याच्या इच्छेप्रमाणे विद्येचे वचन दिले जाते.
- 9 दुसर्याला त्याच आत्म्याच्या योगे विश्वास, आणखी एकाला त्याच आत्म्याच्या योगे निरोगी करण्याची कृपादाने,
- 10 आणखी एकाला चमत्कार करण्याची शक्ती व दुसऱ्याला भविष्य सांगण्याची शक्ती, तर दुसऱ्याला आत्म्या आत्म्यातील फरक ओळखण्याची, आणखी एकाला विविध प्रकारच्या भाषा बोलण्याची, आणखी एकाला भाषांतर करून अर्थ सांगण्याची शक्ती दिली आहे.
- 11 पण या सर्वात तोच एक आत्मा कार्य करतो. तो आपल्या इच्छेप्रमाणे प्रत्येक जणाला कृपादान वाटून देतो.
- 12 कारण शरीर ज्याप्रमाणे एक असून त्याचे अवयव पुष्कळ असतात आणि एका शरीराचे अवयव पुष्कळ असून एक शरीर असते त्याप्रमाणेच ख्रिस्त आहे.
- 13 कारण आपण यहूदी किंवा ग्रीक होतो, दास किंवा स्वतंत्र होतो तरी एका आत्म्याने आपण सर्वाचा एका शरीरात बाप्तिस्मा झाला आहे आणि सर्वांना एकाच पवित्र आत्म्याने भरण्यात आले.
- 14 कारण शरीर हे एक अवयव नसून पुष्कळ अवयव मिळून एक आहे.
- 15 जर पाय म्हणेल, ‘मी हात नाही म्हणून शरीराचा नाही’, तर त्यावरून तो शरीराचा नाही असे नाही.
- 16 आणि कान म्हणेल, ‘मी डोळा नाही म्हणून शरीराचा नाही’, तर त्यावरून तो शरीराचा नाही असे नाही.
- 17 सर्व शरीर डोळा असते तर ऐकणे कुठे असते? आणि सर्व ऐकणे असते तर वास घेणे कुठे असते?
- 18 पण, शरीरातील प्रत्येक अवयव देवाने त्याच्या इच्छेप्रमाणे लावून ठेवला आहे.
- 19 ते सगळे मिळून एक अवयव असते, तर शरीर कुठे असते?
- 20 पण, आता पुष्कळ अवयव आहेत तरी एक शरीर असे आहेत,
- 21 आणि डोळा हाताला म्हणू शकणार नाही की, ‘मला तुझी गरज नाही’, तसेच डोके पायांना म्हणू शकणार नाही की, ‘मला तुमची गरज नाही.’
- 22 तर उलट, शरीराचे जे अवयव अधिक अशक्त दिसतात ते आवश्यक आहेत.
- 23 आणि शरीराचे जे भाग आपण कमी मानाचे मानतो त्यांना पुष्कळ अधिक मानाचे आवरण घालतो आणि आपल्या कुरूप भागांना पुष्कळ अधिक रूप लाभते.
- 24 कारण आपल्या शोभून दिसणार्या अवयवांना गरज नाही पण ज्या भागांना गरज आहे त्यांना पुष्कळ अधिक मान देऊन देवाने शरीर जुळवले आहे.
- 25 म्हणजे शरीरात कोणेतेही मतभेद नसावे तर अवयवांनी एकमेकांची सारखीच काळजी घ्यावी.
- 26 आणि एक अवयव दुखत असला तर त्याच्याबरोबर सर्व अवयव दुख सोसतात आणि एका अवयवाचे गौरव झाले तर त्याच्याबरोबर सर्व अवयव आनंद करतात.
- 27 आता, तुम्ही ख्रिस्ताचे शरीर असून आणि वैयक्तिकरीत्या अवयव आहात.
- 28 आणि देवाने मंडळीत असे काही नेमले आहेत प्रथम प्रेषित, दुसरे संदेष्टे, तिसरे शिक्षक; त्यानंतर चमत्कार, त्यानंतर रोग काढण्याची कृपादाने, सहाय्यक सेवा, व्यवस्था आणि विविध प्रकारच्या भाषा बोलणारे असे नेमले आहेत.
- 29 सगळेच प्रेषित आहेत काय? सगळेच संदेष्टे आहेत काय? सगळेच शिक्षक आहेत काय? सगळेच चमत्कार करणारे आहेत काय?
- 30 सगळ्यांनाच रोग काढण्याची कृपादाने मिळालीत काय? सगळेच अन्य भाषा बोलतात काय? सगळेच अर्थ सांगतात काय?
- 31 पण तुम्ही अधिक मोठी कृपादाने मिळवण्याची इच्छा बाळगा आणि शिवाय, मी तुम्हास एक अधिक चांगला मार्ग दाखवतो.