고린도후서 3장 마라티 IRV
- 1 आम्ही पुन्हा आमची स्वतःची प्रशंसा करू लागलो आहोत काय? किंवा आम्हास, दुसर्यांप्रमाणे, तुमच्याकरिता किंवा तुमच्याकडून शिफारसपत्रांची गरज आहे काय?
- 2 तुम्ही स्वतःच आमची शिफारसपत्रे आहात; आमच्या अंतःकरणावर लिहिलेले, प्रत्येकाने वाचलेले व प्रत्येकाला माहीत असलेले.
- 3 शाईने नव्हे, तर जिवंत देवाच्या आत्म्याने कोरलेले दगडी पाट्यांवर नव्हे, तर मानवी मांसमय हृदयाच्या पाट्यांवर कोरलेले, आमच्या सेवेच्या योगे तयार झालेले ख्रिस्ताचे पत्र आहात, असे तुम्ही दाखवून देता.
- 4 आणि ख्रिस्तामुळे देवाच्या ठायी आमचा असा विश्वास आहे.
- 5 आम्ही स्वतः कोणतीही गोष्ट आपण होऊनच ठरविण्यास समर्थ आहोत असे नव्हे, तर आमच्या अंगची पात्रता देवाकडून आलेली आहे.
- 6 त्याने आम्हास नव्या कराराचे सेवक होण्यास पात्र केले. तो लेखाद्वारे केलेला नाही, पण पवित्र आत्म्याद्वारे केलेला आहे कारण लेख मारून टाकतो पण पवित्र आत्मा जिवंत करतो.
- 7 पण दगडावर कोरलेल्या अक्षरात लिहिलेली मरणाची सेवा इतकी गौरवी झाली की, इस्राएल लोक मोशेच्या तोंडावरील तेज, जे नाहीसे होत चालले होते, त्या तेजामुळे त्याच्या तोंडाकडे दृष्टी लाववत नव्हती.
- 8 तर तिच्यापेक्षा पवित्र आत्म्याची सेवा अधिक गौरवयुक्त कशी होणार नाही?
- 9 कारण ज्या सेवेचा परिणाम दंडाज्ञा ती जर तेजोमय होती, तर जिचा परिणाम नीतिमत्त्व ती तिच्यापेक्षा किती विशेषकरून अधिक तेजोमय असणार.
- 10 इतकेच नव्हे, तर “जे तेजस्वी होते ते” या तुलनेने हीनदीन ठरले.
- 11 कारण जे नाहीसे होणार होते ते जर तेजयुक्त आहे, तर जे शाश्वत ते कितीतरी अधिक तेजस्वी असणार.
- 12 तर मग आम्हास अशी आशा असल्यामुळे आम्ही फार धिटाईने बोलतो.
- 13 आम्ही मोशेप्रमाणे करीत नाही; त्याने तोंडावर आच्छादन घातले ते ह्यासाठी की, जे नाहीसे होत चालले होते ते इस्राएल लोकांस शेवटपर्यंत बघता येऊ नये.
- 14 पण त्यांची मने कठीण केली गेली कारण आजवर ते आच्छादन, तसेच जुन्या कराराच्या वाचनात, न काढलेले राहिले आहे; ते ख्रिस्तात नाहीसे झाले आहे.
- 15 पण आजपर्यंत ते आच्छादन, ते मोशेचे ग्रंथ वाचन करीत असता, त्यांच्या मनावर घातलेले असते.
- 16 पण ते जेव्हा प्रभूकडे वळेल तेव्हा ते आच्छादन काढले जाईल.
- 17 आणि प्रभू आत्मा आहे व जेथे प्रभूचा आत्मा आहे तेथे मोकळेपणा आहे.
- 18 पण आपल्या तोंडावर आच्छादन नसून आपण सर्वजण, जणू आरशात पाहिल्याप्रमाणे, प्रभूच्या तेजाकडे पाहत असता, कलेकलेने त्याच्या प्रतिरूपात आपले रूपांतर होत आहे. हे प्रभूच्या आत्म्याकडून होत आहे.