고린도후서 6장 마라티 IRV
- 1 म्हणून त्याच्याबरोबर काम करणारे आम्हीदेखील तुम्हास अशी विनंती करतो की, तुम्ही देवाच्या कृपेचा स्वीकार व्यर्थ होऊ देऊ नका.
- 2 कारण तो म्हणतो, ‘मी अनुकूल समयी तुझे ऐकले, आणि तारणाच्या दिवशी तुझे सहाय्य केले.’ पाहा, आता अनुकूल समय आहे, पाहा, आता तारणाचा दिवस आहे.
- 3 या सेवेला दोष लावला जाऊ नये म्हणून आम्ही, कशात कोणाला, अडखळण्यास कारण होत नाही.
- 4 उलट सर्व स्थितीत देवाचे सेवक म्हणून, आम्ही आमच्याविषयीची खातरी पटवून देतो; आम्ही पुष्कळ सोशिकपणाने संकटात, आपत्तीत व दुःखात;
- 5 फटक्यांत, बंदिवासांत व दंगलीत; कष्टांत, जागरणांत व उपासांत;
- 6 शुद्धतेने व ज्ञानाने, सहनशीलतेने व ममतेने, पवित्र आत्म्याने व निष्कपट प्रीतीने;
- 7 खरेपणाच्या वचनाने व देवाच्या सामर्थ्याने, उजव्या हातात व डाव्या हातात नीतिमत्त्वाची शस्त्रे बाळगून,
- 8 गौरवाने व अपमानाने, अपकीर्तीने व सत्कीर्तीने, आम्ही आपली लायकी पटवून देतो. आमच्याविषयी खातरी पटवतो. फसव्या आणि तरी खरे आहोत,
- 9 अपरिचित आहोत आणि सुपरीचित आहोत, मरत आहोत आणि बघा, आम्ही जिवंत आहोत. जणू शिक्षा भोगीत होतो आणि तरी मरण पावलो नाही.
- 10 आम्ही दुःखीत, तरी सदोदित आनंद करणारे, आम्ही दरिद्री, तरी पुष्कळांना धनवान करणारे, आमच्याजवळ काही नसलेले आणि तरी सर्व असलेले असे आढळतो.
- 11 अहो करिंथकर बंधूंनो, तुमच्यासाठी आम्ही तोंड उघडले आहे आणि आमचे अंतःकरण मोठे झाले आहे.
- 12 आमच्यात तुम्ही संकुचित झाला नाही, पण तुम्ही स्वतःच्या कळवळ्याविषयी संकुचित झाला आहात.
- 13 आता तुम्हीही असलीच फेड करून तुमचेही अंतःकरण मोठे करा. हे मी तुम्हास मुले म्हणून सांगतो.
- 14 विश्वास न ठेवणार्यांबरोबर संबंध जोडून विजोड होऊ नका; कारण नीतिमान व अनाचार ह्यांची भागी कशी होणार? प्रकाश व अंधकार ह्यांचा मिलाप कसा होणार?
- 15 ख्रिस्ताची बलियालाशी एकवाक्यता कशी होणार? किंवा विश्वास ठेवणारा व विश्वास न ठेवणारा हे वाटेकरी कसे होणार?
- 16 आणि देवाच्या निवासस्थानाचा मूर्तीबरोबर मेळ कसा बसणार? कारण तुम्ही जिवंत देवाचे निवास्थान आहात कारण देवाने म्हणले आहे की, ‘मी त्यांच्यात राहीन आणि त्यांच्यात वावरेन; मी त्यांचा देव होईन आणि ते माझी प्रजा होतील.’
- 17 आणि म्हणून ‘प्रभू म्हणतो की, त्यांच्यामधून बाहेर या आणि वेगळे व्हा; अशुद्ध त्यास शिवू नका; म्हणजे मी तुम्हास स्वीकारीन.
- 18 आणि मी तुम्हास पिता होईन आणि तुम्ही माझे पुत्र व्हाल, असे सर्वसमर्थ प्रभू म्हणतो.’