골로새서 3장 마라티 IRV
- 1 म्हणून तुम्ही ख्रिस्ताबरोबर उठवले गेला आहात तर ख्रिस्त देवाच्या उजवीकडे जेथे बसला आहे तेथल्या वरील गोष्टी मिळविण्याचा प्रयत्न करा.
- 2 वरील गोष्टींकडे मन लावा, पृथ्वीवरील गोष्टींकडे लावू नका;
- 3 कारण तुम्ही मृत झला आहात आणि तुमचे जीवन ख्रिस्ताबरोबर देवामध्ये गुप्त ठेवलेले आहे.
- 4 आपले जीवन जो ख्रिस्त तो प्रकट केला जाईल तेव्हा तुम्हीही त्याच्याबरोबर गौरवात प्रकट केले जाल.
- 5 तर पृथ्वीवरील तुमचे अवयव म्हणजे जारकर्म, अमंगळपणा, कामवासना, कुवासना व लोभ ह्याला मूर्तीपूजा म्हणावे, हे जिवे मारा.
- 6 त्यामुळे देवाचा कोप होतो.
- 7 तुम्हीही पूर्वी त्या वासनांत जगत होता तेव्हा त्यांमध्ये तुम्ही चालत होता.
- 8 परंतु आता तुमच्यातील क्रोध, राग व दुष्टपण, निंदा आणि तुमच्या मुखाने शिवीगाळ करणे, हे सर्व आपणापासून दूर करा.
- 9 एकमेकांशी खोटे बोलू नका कारण तुम्ही जुन्या मनुष्यास त्याच्या कृतींसहित काढून टाकले आहे
- 10 आणि जो नवा मनुष्य, आपल्या निर्माण करणार्याच्या प्रतिरूपानुसार पूर्ण ज्ञानात नवा केला जात आहे, त्यास तुम्ही परिधान केले आहे.
- 11 ह्यात ग्रीक व यहूदी, सुंता झालेला व न झालेला, बर्बर व स्कुथी, दास व स्वतंत्र हा भेदच नाही, तर ख्रिस्त सर्वकाही आहे व सर्वांत आहे.
- 12 तेव्हा तुम्ही देवाचे पवित्र व प्रिय असे निवडलेले लोक आहात, म्हणून करूणायुक्त हृदय, दया, सौम्यता, लीनता व सहनशीलता धारण करा.
- 13 एकमेकांचे सहन करा आणि कोणाचे कोणाशी भांडण असल्यास एकमेकांची क्षमा करा; प्रभूने तुमची क्षमा केली तशी एकमेकांची क्षमा करा.
- 14 पूर्णता करणारे बंधन अशी जी प्रीती ती या सर्वांवर धारण करा.
- 15 ख्रिस्ताची शांती तुमच्या अंतःकरणात राज्य करो. तिच्याकरिता एक शरीर असे पाचारण्यांत आले आहे; आणि तुम्ही कृतज्ञ असा.
- 16 ख्रिस्ताचे वचन तुम्हांमध्ये भरपूर राहो. तुम्ही सर्व ज्ञानीपणाने एकमेकांस शिकवा व बोध करा; आपल्या अंतःकरणात देवाला स्तोत्रे, गीते व आत्मिक गीते कृपेच्या प्रेरणेने गा.
- 17 आणि बोलणे किंवा करणे जे काही तुम्ही कराल, ते सर्व प्रभू येशूच्या नावाने करा; आणि त्याच्याद्वारे देव जो पिता त्याचे उपकारस्तुती करा.
- 18 स्त्रियांनो, जसे प्रभूमध्ये योग्य आहे त्याप्रमाणे तुम्ही आपआपल्या पतीच्या अधीन असा.
- 19 पतींनो, आपआपल्या पत्नीवर प्रीती करा; तिच्याशी निष्ठूरतेने वागू नका.
- 20 मुलांनो, तुम्ही सर्व गोष्टींत आपल्या आई-वडीलांच्या आज्ञा पाळा कारण हे प्रभूला संतोष देणारे आहे.
- 21 वडिलांनो, तुम्ही आपल्या मुलांना चिडीस आणू नका; नाही तर, कदाचित ती निरुत्साही होतील.
- 22 दासांनो, दैहिक दृष्ट्या जे तुमचे मालक आहेत त्यांचे सर्व गोष्टींत आज्ञापालन करा. मनुष्यांना खुश करणार्या नोकरासारखे तोंडदेखल्या चाकरीने नका; तर सालस मनाने प्रभूची भीती बाळगून पाळा.
- 23 आणि जे काही तुम्ही करता ते मनुष्यांसाठी म्हणून करू नका तर प्रभूसाठी म्हणून जिवेभावे करा.
- 24 प्रभूपासून वतनरूप प्रतिफळ तुम्हास मिळेल तुम्ही हे तुम्हास माहित आहे. प्रभू ख्रिस्ताची सेवा करीत जा.
- 25 कारण अन्याय करणाऱ्याने जो अन्याय केला तोच त्यास मिळेल आणि पक्षपात होणार नाही.