히브리서 6장 마라티 IRV
- 1 म्हणून आपण ख्रिस्ताविषयीच्या प्राथमिक बाबीसंबंधी बोलत राहण्याचे सोडून देऊ व प्रौढतेप्रत जाऊ. पुन्हा एकदा देवावरचा विश्वास, निर्जीव गतजीवनाचा पश्चात्ताप,
- 2 बाप्तिस्म्यांचे, डोक्यावर हात ठेवण्याचे, मृतांचे पुनरुत्थान आणि सार्वकालिक न्यायनिवाडा शिकवण, या मूलभूत गोष्टींचा पाया आपण पुन्हा घालू नये.
- 3 देव होऊ देईल तर हे आपण करू.
- 4 कारण ज्यांना एकदा प्रकाश मिळाला, ज्यांनी स्वर्गीय दानांचा अनुभव घेतला आहे व जे पवित्र आत्म्याचे भागीदार झाले आहेत,
- 5 आणि ज्यांनी देवाच्या वचनाची व येणाऱ्या युगाच्या सामर्थ्याची रुची अनुभवली आहे,
- 6 त्यानंतर ख्रिस्तापासून जर ते दूर गेले तर त्यांना पश्चात्तापाकडे वळवणे अशक्य आहे, कारण त्यांच्या स्वतःच्या हानिकरता ते देवाच्या पुत्राला पुन्हा वधस्तंभावर खिळतात व लोकांच्या अवकृपेच्या समोर त्यास आणतात.
- 7 कारण जी जमीन वेळोवेळी पडणाऱ्या पावसाचे पाणी पिते व ज्या लोकांकडून तिची लागवड होते त्यांच्यासाठी धान्य उपजविते तिला देवाकडून आशीर्वाद प्राप्त होतो.
- 8 पण जी जमीन काटे व कुसळे उपजविते, ती निरुपयोगी आहे व तिला शाप मिळण्याची भिती असते; तिचा अग्नीने नाश होईल.
- 9 प्रियजनहो, आम्ही या गोष्टी तुम्हास सांगत आहोत, पण खरोखर आम्ही तुमच्याकडून अधिक चांगल्याची अपेक्षा करतो. आम्हास अशी खात्री आहे की, ज्या तारणाचा भाग असलेल्या गोष्टी आहेत त्या तुम्ही कराल.
- 10 कारण तुम्ही केलेली पवित्र जनांची सेवा, त्या सेवेत तुम्ही अजूनही दाखवीत असलेले सातत्य, तुमचे काम व त्याच्या लोकांस दानाद्वारे व इतर मदत करण्याद्वारे तुम्ही त्याच्या नावावर केलेली प्रीती ही सर्व विसरण्याइतका देव अन्यायी नाही.
- 11 पण आमची अशी इच्छा आहे की, तुमच्या आशेच्या पूर्तीची पूर्ण खात्री होण्याकरता तुमच्यातील प्रत्येकाने शेवटपर्यंत कार्याची अशीच आवड दाखवावी.
- 12 आम्हास असे वाटते की, तुम्ही आळशी बनू नये. तर जे लोक विश्वासाद्वारे व धीराद्वारे देवाने दिलेल्या अभिवचनाचा वारसा मिळवतात अशा लोकांचे अनुकरण करणारे तुम्ही व्हावे.
- 13 जेव्हा देवाने अब्राहामाला वचन दिले, तेव्हा त्याच्यापेक्षा कोणी मोठा नसल्याने देवाने स्वतःच्याच नावाने शपथ वाहिली.
- 14 तो म्हणाला, “मी तुला भरपूर आशीर्वाद देईनच आणि मी तुझ्या वंशजांना महान रीतीने बहुगुणित करीनच करीन.”
- 15 म्हणून धीराने वाट पाहिल्यानंतर देवाने जे वचन त्यास दिले होते ते त्यास प्राप्त झाले.
- 16 लोक, नेहमी शपथ वाहताना आपल्यापेक्षा जो मोठा असतो त्याच्या नावाचा उपयोग करतात कारण शपथ ही विदित केलेल्या सत्याची खात्री पटवणे व सर्व वादाचा शेवट करणे यासाठी असते.
- 17 आपल्या योजनेचे कधीही न बदलणारे स्वरूप वचनाच्या वारसदारांना कळावे अशी देवाची इच्छा आहे. म्हणून त्याने वाहिलेल्या शपथेच्या द्वारे याबाबत हमी दिली.
- 18 देवाने असे केले यासाठी की, ज्यांच्याविषयी लबाडी करणे देवासाठी अशक्य आहे अशा दोन न बदलणाऱ्या कृतींमुळे जे आपण आश्रयाकरता निघालो आहोत, त्या आपणास त्या आशेसंबधाने अधिक उत्तेजन प्राप्त व्हावे.
- 19 आम्हासही आशा जणू काय भक्कम, सुरक्षित अशा नांगरासारखी आत्म्याला आहे व ही आशा परमेश्वराच्या भवनाच्या पडद्यामागील आतील बाजूस प्रवेश करते,
- 20 तेथे आमच्यापुढे धावत येशू आमच्यासाठी आत गेलेला आहे. तो मलकीसदेकाप्रमाणे युगानुयुगासाठी महायाजक झाला आहे.