욥기 20장 마라티 IRV
- 1 नंतर सोफर नामाथी उत्तर देऊन म्हणाला,
- 2 “माझे विचार मला उत्तर द्यायला भाग पाडत आहेत. कारण त्याबद्दलची काळजी माझ्या मनात आहे.
- 3 तुझ्या उत्तरांनी तू आमचा अपमान केला आहेस, परंतु उत्तर कसे द्यायचे ते माझे मन मला शिकवते जी माझ्या समजण्यापलीकडे आहे.
- 4 तुला हे सत्य प्राचीन काळापासुन माहीती आहे, जेव्हा देवाने मनुष्याची स्थापना पृथ्वीवर केली, तेव्हा पासून,
- 5 दुष्टांचा जयजयकार फार कमी काळासाठी असतो, अधर्म्याचा आनंद केवळ क्षणिक असतो.
- 6 त्याचा माहातम्य गगनाला जाऊन भिडेल, आणि त्याचे मस्तक ढगांपर्यंत पोहोचू शकेल.
- 7 परंतु त्याच्या विष्ठेप्रमाणे त्याचा नाश होईल. जे लोक त्यास ओळखतात ते विचारतील, ‘तो कुठे गेला?’
- 8 तो एखाद्या स्वप्नासारखाउडून जाईल व तो कोणालाही सापडणार नाही. त्यास घालवून देण्यात येईल आणि एखाद्या रात्रीच्या स्वप्नासारखा तो विसरलाही जाईल.
- 9 ज्या लोकांनी त्यास पाहिले होते, त्यांना तो पुन्हा दिसणार नाही. त्याचे कुटुंब पुन्हा कधी त्याच्याकडे बघणार नाही,
- 10 दुष्ट मनुष्याने गरीब लोकांकडून जे काही घेतले होते ते त्याची मुले परत करतील. दुष्ट मनुष्याचे स्वत:चे हातच त्याची संपत्ती परत करतील.
- 11 तो तरुण होता तेव्हा त्याची हाडे मजबूत होती. परंतु आता इतर अवयवांप्रमाणे त्यांची सुध्दा माती होईल.
- 12 दुष्टाला वाईट गोष्टी चांगल्या वाटतात. तो त्यांची चव नीट कळावी म्हणून त्या आपल्या जिभेखाली ठेवतो.
- 13 दुष्ट मनुष्यास वाईट गोष्टी आवडतात म्हणून तो त्यांना सोडीत नाही. तो त्या आपल्या तोंडात ठेवतो.
- 14 परंतु त्या वाईट गोष्टीच त्याच्या पोटात विष होतील. त्याच्या आत त्याचे सर्पाच्या विषासारखे जहर होईल.
- 15 त्याने धन गिळले तरी तो ती ओकून टाकील, देव त्यास ती पोटातून ओकायला भाग पाडेल.
- 16 तो फुरशाचे विष चोखील, सर्पाचा दंशच त्यास मारुन टाकील.
- 17 नंतर मधाने आणि दुधाने भरुन वाहाणाऱ्या नद्या बघण्याचे सौख्य तो अनुभवू शकणार नाही.
- 18 त्याचा नफा परत करणे भाग पडेल. त्याने जे सुख मिळवण्यासाठी कष्ट केले ते सुख भोगण्याची परवानगी त्यास मिळणार नाही.
- 19 कारण त्याने गरीबांना कष्ट दिले. त्यांना वाईट वागवले. त्याने त्यांची काळजी घेतली नाही. त्यांच्या वस्तू हिसकावून घेतल्या. दुसऱ्यांनी बांधलेली घरे त्यांनी बळकावली.
- 20 कारण त्यास माहीती आहे त्यास कोणतेच समाधान नसते. म्हणून त्यास आपल्या कोणत्याही गोष्टीविषयी निभावून जाता येणार नाही.
- 21 तो खातो तेव्हा काहीही शिल्लक ठेवीत नाही. त्याचे यश टिकणार नाही.
- 22 जेव्हा भरपूर असेल तेव्हा तो संकटानी दबून जाईल. गरीबीमध्ये असणाऱ्यांचे हात त्याच्यावर येतील.
- 23 दुष्ट मनुष्याने त्यास हवे तितके खाल्ल्यानंतर देव त्याचा क्रोधाग्नी त्याच्यावर फेकेल. देव दुष्टावर त्याच्या शिक्षेचा पाऊस पाडेल.
- 24 दुष्ट मनुष्य तलवारीला भिऊन पळून जाण्याचा प्रयत्न करेल. परंतु पितळी बाण त्याचा बळी घेईन.
- 25 पितळी बाण त्याच्या शरीरातून आरपार जाईल. त्याचे चकाकणारे टोक त्याचे पित्ताशय भेदील आणि तो भयभीत होईल.
- 26 त्याच्या खजिन्यावर पूर्ण कोळोख येईल. मानवाने उत्पन्न केला नाही असा अग्नी त्याचा नाश करेल. त्याच्या घरातल्या सर्व वस्तूंचा नाश करेल.
- 27 आकाश त्याचा अधर्म प्रकट करील, पृथ्वी त्याच्याविरुध्द साक्ष देईल.
- 28 पुराने त्याच्या घरातील संपत्ती नष्ट होईल, देवाच्या क्रोधाच्या दिवशी त्याची संपत्ती वाहून जाईल.
- 29 देवाकडून नेमलेला हा दुष्टमनुष्याचा वाटा आहे, देवाने ठेवलेले हे त्याचे वतन आहे.”