욥기 22장 마라티 IRV
- 1 मग अलीफज तेमानीने उत्तर दिले व तो म्हणाला,
- 2 “देवासाठी मनुष्य उपयुक्त होऊ शकेल काय? ज्ञानी मनुष्य देवाला उपयोगी होऊ शकतो काय?
- 3 तुमच्या धार्मिक जगण्याने सर्वसमर्थाला काही आनंद होतो काय? तू चांगला राहीलास तर त्यास काही लाभ होईल काय?
- 4 तो तुझा भक्तीभाव पाहून तुझा निषेध करतो आणि तुला न्यायाकडे नेतो का?
- 5 तुझे पाप मोठे नाही काय? तुझ्या दुष्टाईला अंत नाही ना?
- 6 तू विनाकारण आपल्या भावाचे गहाण अडकवून ठेवले, उघड्यांची वस्त्रे तू हिरावून घेतली.
- 7 तू थकलेल्यास पाणी दिले नाही आणि भुकेल्या लोकांस अन्न दिले नाही.
- 8 जरी तू, शक्तीमान मनुष्य असशील, सर्व भूमी तुझी असेल, जरी तू एक सन्मानीत मनुष्य असशील.
- 9 तू विधवांना काहीही न देता घालवून दिले असशील, पोरक्याचे बाहू मोडले असशील.
- 10 म्हणूनच तुझ्या भोवती सापळे आहेत आणि अचानक आलेल्या संकटानी तू घाबरुन जात आहेस.
- 11 म्हणूनच सर्वत्र इतका अंधार आहे की तुला काही दिसत नाही आणि तू पुराच्या पाण्याने चोहोबाजूंनी वेढला आहेस.
- 12 देव उंच स्वर्गात नाही काय? तारे किती उंचावर आहेत ते बघ, ते कीती उंच आहेत.
- 13 आणि तू म्हणतो देवाला काय माहीती आहे? दाट अंधाराच्या आडून तो कसा न्याय करतो.
- 14 दाट ढग त्यास झाकत आहेत, म्हणजे त्याने आपल्याला बघू नये.
- 15 तू जूनाच मार्ग धरणार आहेस काय, ज्यावर दुष्टजण चालले.
- 16 त्यांची वेळ येण्यापूर्वीच त्यांचा नाश करण्यात आला, त्यांचा पाया नदीसारखा वाहून गेला.
- 17 जे देवाला म्हटले, ‘आमच्या पासून निघून जा तो सर्वशक्तिमान देव आम्हास काय करु शकतो?’
- 18 आणि त्यानेच त्यांची घरे चांगल्या वस्तूंनी भरली होती. परंतू दुष्टाची योजना माझ्यापासुन दूर आहे.
- 19 धार्मिक त्यांचा नाश पाहून संतोष पावतील. निर्दोष त्यांचा उपहास करतात.
- 20 आणि म्हणतात खरोखरच आमच्या विरूद्ध जे उठले त्यांचा नाश झाला आहे. त्यांची संपत्ती आगीत नष्ट होत आहे.
- 21 तू आता देवाला शरण जा. त्याच्याशी सलोखा कर. तू हे केलेस तर तुला खूप चांगल्या गोष्टी मिळतील.
- 22 मी तुला विनंती करतो त्याच्या तोंडच्या सूचनांचा स्विकार कर. त्याचे शब्द आपल्या हृदयात ठेव.
- 23 तू सर्वशक्तिमान देवाकडे परत येशील, तर तुझी बांधणी होईल. जर तू अधार्मीकता आपल्या तंबूपासून दूर ठेवशील.
- 24 तुझ्याजवळ असलेल्या संपत्तीला मातीमोल मानशील, तू तुझ्या सर्वात चांगल्या ओफीरच्या सोन्याला दरीतल्या दगडाएवढी किंमत देशील.
- 25 म्हणजे सर्वशक्तिमान देवच तुझे धन असा होईल आणि तो तुला मोलवान रूपे असा होईल.
- 26 तेव्हा तू सर्वशक्तिमानच्या ठायी आनंद पावशील, तू तुझे मुख देवाकडे वर करशील.
- 27 तू त्याची प्रार्थना करशील आणि तो तुझे ऐकेल आणि तू आपले नवस फेडशील.
- 28 जी गोष्ट तू मनात आणशील तेव्हा ती सिध्दीस जाईल. प्रकाश तुझ्या मार्गात चमकेल.
- 29 देव गर्वीष्ठांना नम्र करील, आणि तो नम्र लोंकाची सुटका करील.
- 30 जो निर्दोष नाही त्यालाही तो वाचवतो, तुझ्या हाताच्या निर्मळतेमुळे ते बचावले जातील.”