욥기 38장 마라티 IRV
- 1 नंतर परमेश्वर वावटळीतून ईयोबाशी बोलला आणि तो म्हणाला,
- 2 कोण आहे जो माझ्या योजनांवर अंधार पाडतो, म्हणजे ज्ञानाविना असलेले शब्द?
- 3 आता तू पुरूषासारखी आपली कंबर बांध, मी तुला प्रश्न विचारील, आणि तू मला उत्तर दे.
- 4 मी पृथ्वी निर्माण केली तेव्हा तू कुठे होतास? तू स्वत:ला इतका शहाणा समजत असशील तर मला उत्तर दे.
- 5 जग इतके मोठे असावे हे कोणी ठरवले ते सांग? मोजण्याच्या दोरीने ते कोणी मोजले का?
- 6 तीचा पाया कशावर घातला आहे? तिची कोनशिला कोणी ठेवली?
- 7 जेव्हा ते घडले तेव्हा पहाटेच्या ताऱ्यांनी गायन केले आणि देवपुत्रांनी आनंदाने जयजयकार केला.
- 8 जेव्हा समुद्र पृथ्वीच्या पोटातून बाहेर पडला तेव्हा दरवाजे बंद करून त्यास कोणी अडवला?
- 9 त्यावेळी मी त्यास मेघांनी झाकले आणि काळोखात गुंडाळले.
- 10 मी समुद्राला मर्यादा घातल्या आणि त्यास कुलुपांनी बंद केलेल्या दरवाजाबाहेर थोपविले.
- 11 मी म्हणालो, तू इथपर्यंतच येऊ शकतोस या पलिकडे मात्र नाही. तुझ्या उन्मत्त लाटा इथेच थांबतील.
- 12 तुझ्या आयुष्यात तू कधीतरी पहाटेला आरंभ करायला आणि दिवसास सुरु व्हायला सांगितलेस का?
- 13 तू कधीतरी पहाटेच्या प्रकाशाला पृथ्वीला पकडून दुष्ट लोकांस त्यांच्या लपायच्या जागेतून हुसकायला सांगितलेस का?
- 14 पहाटेच्या प्रकाशात डोंगरदऱ्या नीट दिसतात. दिवसाच्या प्रकाशात या जगाचा आकार अंगरख्याला असलेल्या घडीप्रमाणे ठळक दिसतात
- 15 दुष्टांपासून त्यांचा प्रकाश काढून घेतला आहे आणि त्यांचा उंच भूज मोडला आहे.
- 16 सागराला जिथे सुरुवात होते तिथे अगदी खोल जागेत तू कधी गेला आहेस का? समुद्राच्या तळात तू कधी चालला आहेस का?
- 17 मृत्युलोकात नेणारे दरवाजे तू कधी पाहिलेस का? काळोख्या जगात नेणारे दरवाजे तू कधी बघितलेस का?
- 18 ही पृथ्वी किती मोठी आहे ते तुला कधी समजले का? तुला जर हे सर्व माहीत असेल तर मला सांग.
- 19 प्रकाश कुठून येतो? काळोख कुठून येतो?
- 20 तू प्रकाशाला आणि काळोखाला ते जिथून आले तेथे परत नेऊ शकशील का? तिथे कसे जायचे ते तुला माहीत आहे का?
- 21 तुला या सर्व गोष्टी नक्कीच माहीत असतील तू खूप वृध्द आणि विद्वान आहेस मी तेव्हा या गोष्टी निर्माण केल्या तेव्हा तू जिवंत होतास होय ना?
- 22 मी ज्या भांडारात हिम आणि गारा ठेवतो तिथे तू कधी गेला आहेस का?
- 23 मी बर्फ आणि गारांचा साठा संकटकाळासाठी, युध्द आणि लढाईच्या दिवसांसाठी करून ठेवतो.
- 24 सूर्य उगवतो त्याठिकाणी तू कधी गेला आहेस का? पूर्वेकडचा वारा जिथून सर्व जगभर वाहातो तिथे तू कधी गेला आहेस का?
- 25 जोरदार पावसासाठी आकाशात पाट कोणी खोदले? गरजणाऱ्या वादळासाठी कोणी मार्ग मोकळा केला?
- 26 वैराण वाळवंटात देखील कोण पाऊस पाडतो?
- 27 निर्जन प्रदेशात पावसाचे खूप पाणी पडते आणि गवत उगवायला सुरुवात होते.
- 28 पावसास वडील आहेत का? दवबिंदू कुठून येतात?
- 29 हिम कोणाच्या गर्भशयातून निघाले आहे? आकाशातून पडणाऱ्या हिमकणास कोण जन्म देतो?
- 30 पाणी दगडासारखे गोठते. सागराचा पृष्ठभागदेखील गोठून जातो.
- 31 तू कृत्तिकांना बांधून ठेवू शकशील का? तुला मृगशीर्षाचे बंध सोडता येतील का?
- 32 तुला राशीचक्र योग्यवेळी आकाशात आणता येईल का? किंवा तुला सप्तऋर्षो त्यांच्या समूहासह मार्ग दाखवता येईल का?
- 33 तुला आकाशातील नियम माहीत आहेत का? तुला त्याच नियमांचा पृथ्वीवर उपयोग करता येईल का?
- 34 तुला मेघावर ओरडून त्यांना तुझ्यावर वर्षाव करायला भाग पाडता येईल का?
- 35 तुला विद्युतलतेला आज्ञा करता येईल का? ती तुझ्याकडे येऊन. आम्ही आलो आहोत काय आज्ञा आहे? असे म्हणेल का? तुझ्या सांगण्याप्रमाणे ती हवे तिथे जाईल का?
- 36 लोकांस शहाणे कोण बनवतो? त्यांच्यात अगदी खोल शहाणपण कोण आणतो?
- 37 ढग मोजण्याइतका विद्वान कोण आहे? त्यांना पाऊस पाडायला कोण सांगतो?
- 38 त्यामुळे धुळीचा चिखल होतो आणि धुळीचे लोट एकमेकास चिकटतात.
- 39 तू सिंहासाठी अन्न शोधून आणतोस का? त्यांच्या भुकेल्या पिल्लांना तू अन्न देतोस का?
- 40 ते सिंह त्यांच्या गुहेत झोपतात. ते गवतावर दबा धरुन बसतात आणि भक्ष्यावर तुटून पडतात.
- 41 कावळ्याला कोण अन्न देतो? जेव्हा त्याची पिल्ले देवाकडे याचना करतात आणि अन्नासाठी चारी दिशा भटकतात तेव्हा त्यांना कोण अन्न पुरवतो?