욥기 39장 마라티 IRV
- 1 रानशेळी कधी व्यायतात ते तुला माहीत आहे का? हरीणी आपल्या बछड्याला जन्म देताना तू पाहिले आहेस का?
- 2 पहाडी बकरी आणि हरीणी किती महिने आपल्या पिलांना पोटात वाढवतात ते तुला माहीत आहे का? त्यांची जन्माला यायची वेळ कोणती ते तुला माहीत आहे का?
- 3 ते प्राणी लोळतात प्रसूतिवेदना सहन करतात आणि त्यांची पिल्ले जन्माला येतात.
- 4 ती बछडी शेतात मोठी होतात. नंतर ती सोडून जातात आणि पुन्हा कधीही परतून येत नाहीत.
- 5 रानटी गाढवांना कोणी सोडून दिले? त्यांची दोरी सोडून त्यांना कोणी मोकळे केले?
- 6 ज्याला मी वाळवंटात घर दिले, मी त्यांना राहण्यासाठी क्षारभूमी दिली.
- 7 गजबजलेल्या शहरांना हसतात (त्याला शहरातला गजबजाट आवडत नाही) आणि त्यांना कुठलाही मनुष्य आव घालू शकत नाही.
- 8 ते डोंगरात राहतात तेच त्यांचे कुरण आहे. ते आपले अन्न तिथेच शोधतात.
- 9 रानटी बैल तुझी सेवा करायला तयार होईल का? तो रात्री तुझ्या खळ्यावर राहील का?
- 10 दोरीने तुला रानटी बैलाला ताब्यात करता येईल काय? आणि तू त्यास तुझे शेत नांगरायला लावू शकशील का?
- 11 तो खूप बलवान असतो त्याच्यावर तू भरवसा ठेवशील काय, तू तुझे काम त्यांच्यानवर सोपवशील का?
- 12 तो तुझे धान्य शेतातून गोळा करेल आणि खळ्यात नेईल असा भरवसा तुला वाटतो का?
- 13 “शहामृगी आपले पंख आनंदाने फडफडवते परंतु तिला उडता येत नाही तिचे पंख आणि पिसे माया करायच्या कामी पडतात काय?
- 14 ती आपली अंडी जमिनीत घालते आणि ती वाळूत उबदार होतात.
- 15 आपल्या अंड्यांवरुन कोणी चालत जाईल किंवा रानटी प्राणी ती फोडतील हे ती विसरते.
- 16 ती आपल्या पिलांना सोडून जाते ती जणू स्वत:ची नाहीतच असे ती वागते. तिची पिल्ले मरण पावली तरी तिला त्याची पर्वा नसते काम निष्कळ झाल्याचे सुखदु:ख तिला नसते.
- 17 कारण मी देवाने तिला शहाणे केले नाही. आणि मीच तिला समज दिली नाही.
- 18 परंतु ती जेव्हा पळण्यासाठी उठते तेव्हा ती घोड्याला आणि घोडेस्वाराला हसते,
- 19 तू घोड्याला त्याची शक्ती दिलीस का? तू त्याच्या मानेवर त्याची आयाळ ठेवलीस का?
- 20 तू त्यास टोळाप्रमाणे लांब उडी मारायला सांगितलेस का? तो जोरात फुरफुरतो आणि लोक त्यास घाबरतात.
- 21 तो बलवान आहे म्हणून आनंदात असतो. तो आपल्या खुराने जमीन उकरतो आणि धावत युध्दभूमीवर जातो.
- 22 तो भीतीला हसतो, तो कशालाही भीत नाही तो युध्दातून कधीही पळ काढीत नाही.
- 23 सैनिकाचा भाता त्याच्या बाजूला हलत असतो त्याचा स्वार जे भाले आणि इतर शस्त्रे बाळगतो ते उन्हात चमकतात.
- 24 तो फार अनावर होतो. तो जमिनीवर जोरात धावतो तो जेव्हा रणशिंग फुंकलेले ऐकतो तेव्हा तो एका स्थळी स्थिर राहू शकत नाही.
- 25 रणशिंग ऐकू येते तेव्हा घोडा घाई करतो. त्यास दुरुनही लढाईचा वास येतो. सेनापतींनी दिलेल्या आज्ञा आणि युध्दातले इतर अनेक आवाज त्यास ऐकू येतात.
- 26 तू ज्ञानाने तू ससाण्याला पंख पसरुन दक्षिणेकडे उडायला शिकवलेस का?
- 27 आकाशात गरुडाला उंच उडायला शिकवणारा तूच का? तूच त्यास त्याचे घरटे उंच पहाडावर बांधायला सांगितलेस का?
- 28 तो उंच सुळक्यावर राहतो तीच त्याची तटबंदी आहे
- 29 त्याच्या तटबंदीवरुन आपले भक्ष्य शोधतो. गरुडाला एवढ्या उंचीवरुन आपले भक्ष्य दिसू शकते.
- 30 जेथे लोक मरण पावलेले असतात तेथे त्यांची पिल्ले रक्त पितात.”