욥기 40장 마라티 IRV
- 1 परमेश्वर ईयोबाला नियमीत बोलत राहीला, तो म्हणाला,
- 2 “तू सर्वशक्तिमान देवाशी वाद घातलास. तू मला चूक केल्याबद्दल दोषी ठरवलेस. आता तू चुकलास हे तू कबूल करशील का? तू मला उत्तर देशील का?
- 3 मग ईयोबने परमेश्वरास उत्तर देऊन म्हटले,
- 4 मी अगदी नगण्यआहे. मी काय बोलू? मी तुला उत्तर देऊ शकत नाही. मी माझा हात माझ्या तोंडावर ठेवतो.
- 5 पाहा, मी एकदा बोललो होतो पण आता अधिक बोलणार नाही. मी दोनदा बोललो पण मी आता अधिक बोलणार नाही.
- 6 नंतर परमेश्वर वादळातून पुन्हा ईयोबशी बोलला तो म्हणाला:
- 7 तू आता कंबर कसून उभा राहा आणि मी जे प्रश्र विचारतो त्याची उत्तरे द्यायला सिध्द हो.
- 8 मी न्यायी नाही असे तुला वाटते का? मी काही चूक केल्याचा आरोप करून तू स्वत:चे निरपराधित्व सिध्द करु पाहत आहेस.
- 9 तुझे बाहू देवाच्या बाहूइतके शक्तीशाली आहेत का? देवाच्या आवाजासारखा तुझा आवाज गडगडाटी आहे का?
- 10 तू स्वत:ला महीमा व प्रताप यांचे भुषण कर, तेज व वैभव हे धारण कर.
- 11 तुझ्या रागाला भरती येवू दे, आणि प्रत्येक गर्वीष्ठास तू खाली आण आणि गर्विष्ठ लोकांस शिक्षा करु शकतोस. गर्विष्ठांना मान खाली घालायला लावू शकतोस.
- 12 होय त्या गर्विष्ठांकडे बघ आणि त्यांना नम्र कर वाईट लोकांस जागच्या जागी चिरडून टाक.
- 13 त्यांना चिखलात पुरुन टाक त्यांचे तोंडे काळोखात राहतील असे त्यांना बांधून टाक.
- 14 मग मी तुझी सत्यता जाणेल, मग तुझाच उजवा हात तुझा बचाव करील.
- 15 तू बेहेमोथ कडे बघ. मी तुला आणि बेहेमोथला एकाच वेळी निर्माण केले. तो बैलासारखे गवत खातो.
- 16 त्याच्या अंगात बरीच शक्ती आहे. त्याच्या पोटातले स्नायू खूप बळकट आहेत.
- 17 त्याची शेपटी गंधसरूच्या झाडासारखी उभी राहते. त्याच्या पायातले स्नायूही बळकट आहेत.
- 18 त्याची हाडे पितळेसारखी बळकट आहेत. त्यांचे पाय म्हणजे जणू लोखंडाच्या कांबी.
- 19 बेहेमोथ हा अतिशय आश्चर्यकारक प्राणी मी निर्माण केला आहे. परंतु मी त्याचा पराभव करु शकतो.
- 20 डोंगरावर जिथे जंगली श्वापदे खेळतात तिथले गवत खातो.
- 21 तो कमळाच्या झाडाखाली झोपतो. दलदलीतल्या लव्हाळ्यात लपतो.
- 22 कमळाचे झाड त्यास आपल्या सावलीत लपवते तो नदीजवळ उगवणाऱ्या एका वृक्षाखाली (विलोवृक्ष) राहतो.
- 23 नदीला पूर आला तर बेहेमोथ पळून जात नाही यार्देन नदीचा प्रवाह त्याच्या तोंडावर आदळला तरी तो घाबरत नाही विश्वासात स्थिर राहतो.
- 24 त्यास कोणी गळ टाकून धरू शकेल. किंवा त्यास सापळ्यात अडकवू शकेल.”