시편 36편 마라티 IRV
- 1 दुष्टाचा अपराध त्याच्या हृदयात सांगत असतो की, त्याच्या दृष्टीत देवाचे काही भय नाही.
- 2 त्याचे अपराध उघडकीस येणार नाही आणि त्याचा द्वेष केला जाणार नाही, अशा भ्रमात तो राहत असतो.
- 3 त्याचे शब्द कपटी आणि पापमय असतात. तो शहाणा होण्यास किंवा सत्कृत्ये करण्यास इच्छीत नाही.
- 4 तो आपल्या बिछान्यावर पडून असता, तो अपराधाच्या योजना आखतो. तो वाईट मार्गाच्या योजना करतो, तो वाईटाचा धिक्कार करत नाही.
- 5 हे परमेश्वरा, तुझे खरे प्रेम आकाशापेक्षाही उत्तुंग आहे; तुझी एकनिष्ठता आभाळापर्यंत पोहचली आहे.
- 6 परमेश्वरा तुझे न्यायीपण उंच पर्वतासारखे आहे. तुझा न्याय खोल समुद्रासारखा आहे. परमेश्वरा तू मनुष्यास आणि प्राण्यांस दोघांस राखतो.
- 7 देवा! तुझी प्रेमदया किती मौल्यवान आहे. मानवजात तुझ्या पंखांच्या सावलित आश्रय घेते.
- 8 ते तुझ्या घरातल्या समृद्धीमुळे तृप्त होतील. तू आपल्या बहुमोल नदीतून त्यांना मनसोक्त पिण्यास देशील.
- 9 कारण जीवनाचा झरा तुझ्याजवळ आहे. तुझ्या प्रकाशात आम्ही प्रकाश पाहू.
- 10 राजे तुला ओळखतात त्यांच्याकरिता तू आपली प्रेमदया विस्तीर्ण कर, तुझी सुरक्षितता सरळांसोबत असू दे.
- 11 गर्विष्ठांचे पाय माझ्याजवळ येऊ देऊ नकोस. दुष्टाचा हात मला घालवून न देवो.
- 12 तेथे दुष्ट पडले आहेत, ते पाडले गेले आहेत आणि ते कधीही उभे राहू शकणार नाहीत.