시편 37편 마라티 IRV
- 1 दुष्टकृत्ये करणाऱ्यांवर चिडू नकोस, जे अनीतीने वागतात त्यांचा हेवा करू नकोस.
- 2 कारण ते लवकरच गवतासारखे वाळून जातील; व हिरव्या वनस्पतीसारखे सुकून जातील.
- 3 परमेश्वरावर विश्वास ठेव आणि जे चांगले आहे ते कर; देशात स्थिर हो आणि विश्वासूपणाने आपला व्यवसाय कर.
- 4 परमेश्वरामध्ये आनंद कर, आणि तो तुला तुझ्या हृदयाच्या इच्छेप्रमाणे देईल.
- 5 तू आपला मार्ग परमेश्वरावर सोपवून दे, त्याच्यावर विश्वास ठेव आणि तो तुझ्याकडून कृती करील.
- 6 तो तुझे न्यायीपण प्रकाशासारखे आणि तुझा निष्पापपणा मध्यान्हाप्रमाणे दाखवील.
- 7 परमेश्वरासमोर स्तब्ध राहा आणि धीराने त्याची वाट पाहा. जर मनुष्य दुष्ट योजना आखतो, कोणी आपले वाईट मार्ग सिद्धीस नेतो, तर काळजी करू नको.
- 8 रागावू नकोस, संताप करून घेऊ नकोस. त्याने फक्त त्रास होतो.
- 9 कारण दुष्टकृत्ये करणारे नाश पावतील, परंतु जे परमेश्वराची वाट पाहतात त्यांना देशाचे वतन मिळेल.
- 10 थोड्याच काळात दुष्ट नाहीसे होतील; तू त्यांच्या ठिकाणाकडे बघशील, परंतु ते सापडणार नाहीस.
- 11 परंतु नम्र पृथ्वीचे वतन मिळवतील, आणि मोठ्या समृद्धित ते हर्ष करतील.
- 12 दुष्ट मनुष्य नितीमानाच्या विरोधात योजना आखतो, आणि त्याच्याविरुध्द आपले दातओठ खातो.
- 13 प्रभू त्यास हसत आहे, कारण त्याचा दिवस येत आहे, हे तो पाहत आहे.
- 14 जे पीडलेले आणि गरजवंत आणि जे सरळ आहेत, त्यांना ठार मारण्यास दुष्टांनी आपली तलवार उपसली आहे आणि आपले धनुष्य वाकविले आहेत.
- 15 परंतु त्यांचे धनुष्य मोडले जातील व त्यांच्या तलवारी त्यांच्याच हृदयास छेदतील.
- 16 अनेक दुष्ट लोकांच्या विपुलतेपेक्षा, नितीमानाकडे जे थोडे ते उत्तम आहे.
- 17 कारण दुष्ट लोकांचे बाहू मोडले जातील परंतु परमेश्वर नितीमानांना आधार देईल.
- 18 परमेश्वर निर्दोषास दिवसेन दिवस बघतो, आणि त्यांचे वतन सदैव राहील.
- 19 वाईट समयी ते लज्जीत होणार नाहीत. जेव्हा दुष्काळ येईल तेव्हा त्यांच्याकडे खाण्यास पुरेसे असेल.
- 20 परंतु दुष्ट मनुष्य नाश पावतील, परमेश्वराचे शत्रू कुरणाच्या शोभेसारखे होतील; ते नाश होतील आणि धुरामध्ये नाहीसे होतील.
- 21 दुष्ट पैसे उसने घेतो परंतु त्याची परत फेड करत नाही. परंतु नितीमान मनुष्य उदारतेने देतो.
- 22 जे देवाकडून आशीर्वादित झालेले आहेत, ते भूमीचे वतन पावतील; आणि जे त्याच्याकडून शापित आहेत, ते छेदून टाकले जातील.
- 23 मनुष्याची पावले परमेश्वराकडून स्थिर केली जातात, असा मनुष्य ज्याचे मार्ग देवाच्या दृष्टीने प्रशंसनीय असतात.
- 24 जरी तो अडखळला, तरी तो खाली पडणार नाही. कारण परमेश्वर त्यास आपल्या हाताने सावरील.
- 25 मी तरुण होतो आणि आता म्हातारा झालो आहे; तरी नितीमान टाकलेला किंवा त्याच्या मुलांस भाकरी मागताना मी पाहिले नाही.
- 26 सारा दिवस तो दयाळूपणाने वागतो आणि उसने देतो, त्याची संतती आशीर्वादित असते.
- 27 वाईटापासून फिर आणि चांगले ते कर. तेव्हा तू सर्वकाळासाठी वाचवला जाशील.
- 28 कारण परमेश्वरास न्याय प्रिय आहे आणि तो विश्वासाने त्याच्यामागे चालणाऱ्यांस सोडत नाही. ते सर्वकाळासाठी राखून ठेवलेले आहेत. परंतु दुष्टाचे वंशज छेदले जातील.
- 29 नितीमान तर पृथ्वीचे वतन पावतील आणि सर्वकाळ त्यामध्ये वस्ती करतील.
- 30 नितीमान मनुष्याचे मुख ज्ञान बोलते, आणि न्याय वाढवते.
- 31 त्याच्या हृदयात त्याच्या देवाचे नियमशास्त्र असते, त्याचे पाय कधी घसरणार नाहीत.
- 32 परंतु दुष्ट मनुष्य हा नितीमान मनुष्यास बघतो, आणि त्यास मारण्याच्या शोधात असतो.
- 33 परंतु परमेश्वर त्यांना दुष्ट मनुष्याच्या हातात त्यागणार नाही. किंवा जेव्हा त्याचा न्याय होईल तेव्हा त्यास अपराधी ठरवणार नाही.
- 34 परमेश्वराची वाट पाहा आणि त्याचे मार्ग पाळ. आणि तो तुला वर उचलणार म्हणजे तुला भूमी मिळेल. जेव्हा दुष्ट छेदला जाणार तेव्हा तू पाहशील.
- 35 मी विस्तारलेल्या आणि सशक्त झाडासारखा एक दुष्ट मनुष्य पाहिला. जो आपले मूळ जमिनीत पसरवतो.
- 36 परंतु जेव्हा मी त्याच्यापासून पुन्हा गेलो, तर तो तेथे नव्हता. मी त्यास शोधले पण तो मला सापडला नाही.
- 37 प्रमाणिक माणसाकडे लक्ष लाव आणि सरळास निशाणी लाव. कारण शांततेत राहण्याऱ्या मनुष्याचे भविष्य चांगले असते.
- 38 पापी तर पूर्णपणे नाश पावतील, परंतू दुष्टाचा भावीकाळ छेदून टाकला जाईल.
- 39 नितीमानाचे तारण हे परमेश्वराकडून येते, संकटसमयी तो त्यांचे रक्षण करीन.
- 40 परमेश्वर त्यांना मदत करील आणि त्यांना तारील, तो त्यांचा वाईट लोकांपासून बचाव करतो, कारण त्यांनी परमेश्वराच्याठायी आश्रय घेतला आहे.